Monday, June 24, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनइक मुलाकात जरूरी है सनम ...

इक मुलाकात जरूरी है सनम …

माेरपीस: पूजा काळे

वैशाख संपून ज्येष्ठ लागलायं. तू मात्र दडी मारून बसला आहेस कुठं तरी…!! बरं शोधावं म्हटलं तर, ठावठिकाणा सांगून जाशील, तर शप्पथ…! वर्षातून हा असा एकदा येतोस. चार महिन्यांत तुझ्या वास्तव्याचं सुख माझ्या वाट्याला कितीसं येत रे…? या ऋतूतल्या भटकंतीत हे वर्षावररूपी दान दानपात्रात रित करायचं ही तुझी जुनीचं रित. माझ्यासाठी रंगीत फुलांचा नजराणा पेश करून वाटेला लागलं की संपलं तुझं काम. म्हटलं तर मी ही रागावू शकते हं…!! इथं तर मैत्रिणीसुद्धा माझी चेष्टा करतात. काय तर म्हणे, तळपत्या उन्हात ही पाऊसराणी चक्क छत्री उघडून चाललीयं रस्त्यावरून. जाऊ दे, यावर जास्त विचार करायचं सोडून दिलयं मी. पण काही सांगावा न धाडता, तू भेटायला येतोस मला अलवार, हे कुठं ठाऊक आहे त्यांना? ऐक ना…! नाराज आहेस का माझ्यावर…? मागे गमतीनं म्हटलं होतं तुला, कुठं पडायचं तिथं पड आणि तू गेलास गोव्यात, पंजाबात, महाराष्ट्रात. धू…धू…धुऊन काढलंस सगळ्यांना. जीवही घेतलेस. असा प्रकोप, प्रपात शोभत नाही तुला. धीरानं घे थोडं, दमानं घे थोडं. लोक पूजा करतात तुझी.

जीवन अनमोल करण्याचं सामर्थ्य तुझ्यात असताना, सणवार तोंडावर आले असताना तुझं नसणं आश्चर्यकारक आहे. लहरी कधीपासून झालास एवढा? सोड हा रुसवा-फुगवा. तुझ्यातल्या रिमझिम वर्षावाची वाट पाहतोय आम्ही आणि मी देखील! आजकाल वाऱ्याने वाहणं सोडलंय. धरा तप्त करण्यापेक्षा, घामाच्या धारेत चिंब भिजण्यापेक्षा तुझ्यात सामवायला आवडेल सगळ्यांना.  वैशाखी-वणव्याने तापून निघालेल्या धरीत्रीला मृगाची ओढ जशी; तशी माझ्या कवितेत प्रियकराशी रास न् रास बांधलेली. मग तो प्रियकर पाऊस असो, वा पाऊस प्रियकर होऊन माझ्या अंगणात नाचत असो. पाऊस आणि आपलं नातं हे म्हटलं तर परंपरागत, दृढनिश्चयी, अविरत असं. त्याची मुळातली चंचलता, खोडकरपणा, विद्युलता अद्वितीय, अनाकलनीय, भयावह असली तरीही पावसाचा पहिला थेंब न् थेंब सुखमयी चैतन्याचा, परमानंदी तरल अवस्थेचा होऊन निघतो. पावसाच्या पहिल्या स्वागतालाचं भारावल्यासारखं व्हावं आणि न्हाऊन निघावं त्याच्या दवबिंदू निळाईत. झोकून द्यावं अंग थंड पाणवठ्याच्या भरल्या नदी पात्रात. प्रियकराच्या कुशीत असल्यासारखं सोप्प व्हावं आयुष्य. हे पावसा तसं तुझं येणं भारावून टाकतं आम्हाला.

मृगाचा पहिला पाऊस म्हणजे काळीज तुकड्यांची कहाणी. चातकाप्रमाणं वाट पाहणारे आम्ही. या वसुंधरेच्या मानसपुत्रा या अगाध चरातील प्रत्येकाचा मर्मबंध छेदणाऱ्या हे पावसा, भेगाळलेल्या भुईला थंड करतानाची तुझी अवस्था काय वर्णू. हे अद्भुत मनोमीलन याची डोळा पाहताना आलेली ऊर्जितावस्था म्हणजे सृजन सोहळ्याची सुरुवात. सासरला जाताना माहेराकडून मिळालेली आंदणाची ढीगभर पाठवणी.  आज तर वातावरणाला वेगळीचं नशा येऊन, आकाशी काळ्या मेघांची गर्दी जमलीयं. सांज समयी वायू वेगाने आलेली महाकाय शीतलता म्हणजे रानीवनी भूल पडण्याची प्रकिया. येता सरीवर सर, त्याने भिजले अंगण. मंद केवड्याच्या गंध आम्हा मिळतो आंदण. हा धुंद बेधुंद सहवास घेऊन सरीसंगे बेभान होतो आपण. तरीही शाळेत नेमाने शिकवलेला; दारात कागदी बोटी नाचवणारा; तो कोसळतो अविरत. कानड्या विठ्ठलाशी गळाभेट घेण्याआधीचं, गावच्या गाव, माणसाच्या माणसं घेऊन निघतो सागराच्या भेटीला. अक्राळ-विक्राळ रूप धारण करणाऱ्या या वरूण राजाला आवरणं कठीण. तरी प्रेमभरल्या आदराने त्याची विनवणी करायला हवी. जसं, तू मातीत पड, त्याचं सोनं कर.

धरणात पड, त्याचं जीवन कर. तू रानात पड त्याचं साैंदर्य जप. मानव जातीच्या सुखदुःखाला सर्वस्वी सतेज कर. ही प्रार्थना तुझ्यासाठीच, कारण या सगळ्याचं स्त्रोत आणि प्रेरणासुद्धा तूच आहेस. अशावेळी पाऊस तुम्ही अनुभवाल तसा दिसेल. हा परकाया प्रवेश तसा रुजेल. त्याच्या अपूर्व शोधात असलेल्या या माझ्या भटकंतीच्या वाटेवर पन्हाळ्याच्या पायथ्याशी एकाकी झाड त्याच्याशी झुंज देताना मी पाहते. तर कुठे लालवाडीतला महाकाय धबधबा कोसळण्यासाठी त्याला जागा करून देतो. माझ्या मनी रुळलेल्या या समीकरणाला वाट सापडते, ती त्याच्या येण्यानं. त्याच्या वेळा ठरलेल्या असल्या तरी, एक प्रकारची अनामिक हुरहुर कायम रेंगाळते हृदयाशी. त्याची वाट पाहण्यातच वर्षाचे नऊ महिने जातात. तो आता येईल, मग येईल. म्हणत डोळे लागतात वाटेकडे. त्याच क्षणी तांबड्या, केशरी, काळ्या छटेतले रंग बाहू पसरवतात अवकाशी. त्याच्या नुसत्या चाहुलीने मन प्रफुल्लित होत असेल तर, मग या देहाची काय बात. माझ्या कोमलांगी कायेवर रोमांच उभे करायला एवढं कारणही पुरेसं आहे. एव्हाना पाण्याच्या थेंबांनी हलक्या सरींची जागा घेतलेली असते. मी रस्त्यात एकटी, दुतर्फा वाहनांची गर्दी. यात नक्षीदार वेलबुट्टीची कशिदाकारी साडी सांभाळतं आडोशाला उभी राहण्याच्या प्रयत्नात पूर्ण ओलेती झालेली. वाऱ्यावर उडणारा पदर सांभाळावा, तर हातातलं सामान भिजण्याची चिंता. काय रे, तू पण.

आताच यायचं होतं तुला? मला एकटीला गाठून चिंब करायचा मानस होता का तुझा? मग आता बरसणार आहेस की, कोसळणार आहेस. सांगून टाक एकदाचं. मी पण ना…! एकटीचं बरळत बसलेय. तुला नाही कळायची माझी भाषा. एका अनामिक आसक्तीच्या, चिंब जाणिवेत ओढली जाते तुझ्याकडे, तरीही वनवास घडवतोस मजला. वर्षभराचा विरह असा एका दिवसात कमी होणारा नाही, हे ठाऊक आहे तुलाही. बघतेच आता तुला.

भर रस्त्यात गाठलंस. तुझी मोहिनीही घाल आता माझ्यावर. कारण जिंदा रेहने के लिए इक मुलाकात💦 जरूरी है सनम…!! पावसावर आणि प्रेमावर, प्रेम करणाऱ्यांनी चिंबित होऊन न्हाऊन निघावं. पावसाची आनंदी कविता सुचावी, त्यात भाव यावा परमानंदाचा। पाऊस म्हणजे तो आणि तो म्हणजे माझा प्रिय सखा पाऊस. आजचा त्याचा दुसरा दिवस. भरभरून पडण्याचा. सलग दुसऱ्या दिवशी माझ्या मनी वसलेल्या या समीकरणाला वाट सापडते ती, त्याच्या धावून येण्यानं. पहिल्यांदा साधेपणानं रिमझिमणारा तो हल्लाबोलचं करतो नंतर. हे तसं फारसं आवडतं नाही मला. हल्ली भर रस्त्यात गाठतोस.

केवढा वेळ झालाय बघ. बाहेर ढगांची दाटी करून ठेवलीस तू. तुला समजावण्याच्या नादात सगळे घरी पोहोचलेत बरं कधीचेचं. मी मात्र इथं, तुझ्याशी गोड वाद घालत बसलेयं… हो हो सगळं मान्य तुझं. सगळे हट्ट पुरवेन तुझे. गरमागरम कांदा-भजी मनसोक्त खाऊ घालेन. तिखट-मीठ लावून भाजलेली कणसं, भुईमुगाच्या शेंगा खाण्याचा आनंद साजरा करून भूक भागवू आपण. निमूटपणे निघूया ना आता. हो मी पण निघतेय तुझ्यासोबत. छत्री न उघडता मनसोक्त भिजणार आहे मी. हा प्रवास जास्त आनंदमयी, सुखकारक होण्यासाठी मरिन ड्राईव्ह गाठू. चार महिने तरी तुझ्या लयीत राहायचंय मला. तुझ्या निळंशार निळ्याभोर पाण्यात हुंदडायचंय मला. तुझ्या सप्तरंगी रंगात भरभरून जगायचंय मला. यावर मी ठाम आहे हं. कारण जिंदा रेहने के लिए इक मुलाकात💦 जरूरी है सनम…!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -