Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनघाल-घाल-पिंगा वाऱ्या...

घाल-घाल-पिंगा वाऱ्या…

माेरपीस: पूजा काळे

मराठी कृष्णधवल चित्रपटापासून ते रंगीत सिनेमास्कोपपर्यंतच्या साऱ्या चित्रमय प्रवासात वाऱ्याशी हितगुज करणारी नायिका म्हटली की, काही निवडक गाण्यांच्या संगीतातल्या श्रवणरूपी खजिन्याने आपले कान तृप्त होतात. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली धुंद फुलं पाने… तसंच गोमू संगतीनं माझ्या तू येशील का? असं म्हणत नायक, वाऱ्याला बोलावतो आणि मनातले प्रेमार्द्य भाव व्यक्त करताना बेभान करतो स्वत:ला, तर दुसरीकडे वाऱ्यावरती रंग पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. या सावरखेड एक गावमधील गाण्याची सुंदर रेखीव फळीच डोळ्यांसमोर उभी राहते. “वारा” या एकाच शब्दाशी आपण येतो. त्याच्या लयीत धुंद होऊन, मनःपटलावरील विविधांगी, रम्यक कल्पना, एखादी आठवण रेखाटून शब्द-शब्द गुंफतो. फेर धरी वारा, गुंतवीत आपला मन पिसारा. अशी केविलवाणी अवस्था आपली होते न् होते, तोच सांदी कोपऱ्यात साठलेले आणि साठवलेले सगळे उमाळे लख्ख सूर्यप्रकाशासारखे वलयांकित होत, तुषार्थ दवबिंदूची पारदर्शकता लेपत, अंतरंगी तळगाळाचा प्रीत डोहमृग गाठतात. प्रसंगी आपण उचंबळतो, व्यथित होतो. लाटेवर लाट आपटावी तशी आपली अवस्था जणू उधाण वाऱ्याच्या एका दिप्त झोतासारखी येते. त्यावेळी मनमुराद हसतो, रडतो, गुदमरतो आपण.

कधी न कळले या जन्माचे, तुझे नि माझे नाते कोणते? एकट्याच या हृदयातले त्या हृदयीचे एक समान दुःख कोणते?… मी जराशा जपून ठेवल्या, तळाखालच्या मर्म ठेवी, तू नव्याने उघडू जाता, स्वप्नं पडे मज उजेडपणी! खरंय मंडळी उजेडपणी वाऱ्याचं पेंगण, वाहणं, बेभान होणं हा बहुतांचा अनुभव असतो. सुख आणि स्वप्न वाटांकडे शिडीसारखा वरवर नेणारा हा वारा तुला, मला आणि प्रत्येकाला काही देऊन जातो. इतरत्र चहूबाजूने वेगाने धावणारा, वळणा वळणावर अलगद खेटणारा, पानी सळसळ सांगणारा, मनीचे गूज जाणणारा, सांगावा धाडणारा, वाटाड्या, वाटसरू किती – किती शब्दांत पकडू त्याला…! पदर उडवीत, अंगाशी सलगी करत, तिच्या प्रियकरालाही लाजवेल अशा या खोडकर वाऱ्याला स्त्रीची शालिनता कळते. विविध रूप धारण केलेल्या वाऱ्यानं वाहवं, तेव्हा आठवरूपी पक्ष्यांनी भुर्रकन उडावं, अशी सहज क्रिया घडावी असं काहीसं घडतं.

वारा उधाण वाहतो, मास रंध्रात भरतो, सप्तरंगात आभाळी, गंध मृतिक्का भिनतो. असा हा वारा अडवू शकत नाही गंध मृत्तीकेची वाट. आईच्या कुशीत, सणांच्या घरी, वात्सल्य राऊळी, तो जातो माहेरी. तिथं समोरचं या अशा ओळीनं उभ्या असतात आठवणींच्या शिदोरी; ज्या संपता संपत नाहीत. मग परसामध्ये, नारळी पोफळीच्या बागेमध्ये, सुरूबनात, आंबा, चिंच, बोरझाडी, नदीचं मोठ्ठालं पात्र, सागरगोटे आणि आजी आईच्या हाताचे मोठाले धम्मक लाडू, माहेरच्या सुवासाच्या कितीतरी रम्यक आठवणी, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, असं म्हणून, आपणचं फेरफटका मारतो बनात. त्यावेळी वाऱ्याशी सलगी करत आलेल्या माहेरच्या आठवणी गोड भासतात…! कारण काहीही असलं तरी अहोरात्र वाहणं अविरत घडतं असतं ते. त्याच्या सळसळत्या ध्वनीतून मग हवं तसं व्यक्त होतो आपण. लहानाचे मोठे होईस्तोवर आईच्या कुशीतली माहेरची सय संपलेली नसते आणि वाऱ्यासह कामात व्यस्त असलेली आई ही कधी थकलेली नसते. काहीशा अनामिक ओढी चिरतरुण ठेवतात आपल्याला आणि आपल्या भावनेला.

वारा म्हणजे प्रेमाचा, आपुलकीचा झरा, जो दूर असणाऱ्या नात्याला सांगावा धाडणारा एक संदेशवाहक दूत आणि माध्यमसुद्धा. मग लांब परगावी असलेला आपला मुलगा असो, वा दूरच्या देश सीमेवर तैनात असणारा एखादा भारत मातेचा सुपुत्र. तिथल्या निखळ वाऱ्याचं उधाणलेलं वाहणं सांगून जात बरंच काही. हृदयाचे ठोके मंद गतीने वाढावेत अशी अवस्था होते. वाऱ्यालाही पेलवत नसावं हे लांब पल्याचं दुःख; तरीही सातासमुद्रापार असलेल्या, डोंगरदऱ्यात शूरता, शौर्य गाजवणाऱ्या विरांची धून गात वारा झेपावतो आनंद भरारी मारण्यासाठी. वायुवेगानं त्याचं दारात येणंच मुळी उत्साहवर्धक. तुफानी आनंदाला कवेत घेऊन, त्याच्याशी सलगी करत, घरात घोंगावणं. हर्षोल्हासाने दारं-खिडक्या वाजवणं… जणू काही अद्भुत-अप्रूप गवसल्यारखे भाव. त्याचं दूरदेशीहून येणंच मुळी चटका लावून जाणारं असतं. अशातचं पापण्या मिटलेल्या असतात. हुंदका अनावर झालेला असतो. मुख कमलावर हास्य लकेर खुलताना स्पंदन वाढलेली असतात. अशावेळी हळवा कोपरा अधिक हळवा होतो. दाराकडे परत-परत नजर लावून वाट पाहताना वाऱ्या सरशी आपणही उत्सुक तन्मय होतो नावीन्याच्या स्वागताला आणि वाऱ्यासवे ध्वनीनाद घुमतो… घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -