नवी दिल्ली : उद्या २५ जून आहे. हा दिवस भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असून, भारताच्या लोकशाहीला लागलेल्या डागाला उद्या ५० वर्ष पूर्ण होत आहेत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून हल्लाबोल केला.
आज १८व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आणीबाणी काळात भारतीय राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली. राज्यघटनेचा प्रत्येक भाग फाडला गेला. देशाचे रुपांतर तुरुंगात झाले. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली. या प्रकाराला भारताची नवीन पिढी कधीही विसरणार नाही.
आपल्या राज्यघटनेचे रक्षण करताना, भारतातील लोकशाहीचे, लोकशाही परंपरांचे रक्षण करतानाच, ५० वर्षांपूर्वी घडलेले असे कृत्य भारतात पुन्हा करण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा संकल्प देशवासीय घेतील. भारतीय राज्यघटनेच्या निर्देशानुसार आम्ही सामान्य लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
देश आणि तेथील लोकांची सेवा करण्यासाठी सरकार सर्वांना सोबत आणण्याचा नेहमीच प्रयत्न करेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचवेळी विरोधकांनाही त्यांनी कठोर संदेश दिला. “भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे; लोकांना घोषणाबाजी नको, वस्तुस्थिती हवी आहे; त्यांना वादविवाद, परिश्रम हवे आहेत, नाटक आणि संसदेत व्यत्यय नको. मला आशा आहे की विरोधक लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरतील,” असे ते म्हणाले.
देशाला खासदारांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आणि त्यांनी जनतेच्या हितासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदनही केले.