राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर नितेश राणे यांचा पलटवार
निवडणूक आयोगाला दोष देऊन सोयीचं राजकारण करणारी इंडिया आघाडी; नितेश राणे यांची टीका
मुंबई : इंडिया आघाडीचं (INDIA Alliance) सोयीचं राजकारण म्हणजे जर त्यांच्या मनाप्रमाणे निकाल लागला नाही तर जिथे जिथे लोकांनी त्यांना नाकारलं तिथे निवडणूक आयोगावर (Election commission) तर कधी आमच्या विधानसभा अध्यक्षांवर खापर फोडायचं आणि स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करायचा. त्याचप्रमाणे आज सकाळी निवडणूक आयोगावर खडी फोडण्याचं काम संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) केलं, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि महायुतीवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचा नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला.
नितेश राणे म्हणाले, जेव्हा संजय राऊत आणि त्याचा मालक २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपा आणि एनडीएसोबत होते आणि त्यांचे १८-१८ खासदार मोदीसाहेबांच्या आशीर्वादावर निवडून येत होते, तेव्हा त्यांना कधीच निवडणूक आयोगावर आक्षेप घ्यावासा वाटला नाही. तेव्हा आयोगाच्या कौतुकाचे व्हिडीओ आपल्याला दिसले. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे झालं तर सगळं चांगलं आणि आता जेव्हा २१ जागा लढवूनही तुमचा स्ट्राईक रेट ९ वर गेलेला आहे तेव्हा निवडणूक आयोग चुकीचा वाटतो. मग ज्या ९ ठिकाणी तुमचे खासदार निवडून आले तिथे तुम्ही निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीनवर आक्षेप का घेत नाही? असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. या घाणेरड्या मानसिकतेला महाराष्ट्रात थारा मिळू नये, अशी आमची भूमिका आहे, असं नितेश राणे म्हणाले.
… तर नाशिकच्या शिक्षकांसमोर मी हात जोडले पाहिजेत
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत संजय राऊत म्हणाले की शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जात आहे, शिक्षकांना विकत घेऊ नका. त्यांच्या या वक्तव्यावर चोख प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये वर्गातला सर्वात चीटर विद्यार्थी शिक्षकांकडून जर मतदान मागत असेल, तर बिचाऱ्या नाशिकच्या शिक्षकांना काय वाटत असेल? ज्यांनी आतापर्यंत कुठलीही परीक्षा प्रामाणिकपणे दिली नाही, जो आपल्या मालकासमान प्रिन्सिपलबरोबर प्रामाणिक राहिला नाही, तो संजय राऊत नाशिकच्या शिक्षकांकडून मतदान मागत असेल आणि ज्ञान वाटत असेल तर त्या नाशिकच्या शिक्षकांसमोर मी हात जोडले पाहिजेत, असं नितेश राणे म्हणाले.
आम्हालाही तुझ्या रुममधल्या बॅगा तपासाव्या लागतील
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये २० कोटी उतरवले याचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी दिला आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. यावर नितेश राणे म्हणाले, जेव्हा निवडणूक आयोगाच्या लोकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील बॅगा तपासल्या तेव्हा त्यात काहीच सापडलं नाही. त्यामुळे असे खोटेनाटे आरोप करुन उगाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी संजय राऊतने करु नये, अन्यथा आम्हालाही तुझ्या रुममधल्या बॅगा तपासाव्या लागतील, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
संजय राऊतचा स्ट्राईक रेट महिलांना शिव्या देण्याचा
मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट हा बेईमानीचा, खोक्यांचा आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर नितेश राणे यांनी संजय राऊतांचा स्ट्राईक रेट महिलांना शिव्या देण्याचा आहे, असं म्हणत पलटवार केला. महिलांना धमक्या देऊन त्यांच्या घरावर दारुच्या बॉटल्स मारण्याचा त्याचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला आहे. त्याबाबतीत महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट कोणीच कमी करु शकत नाही, एवढी मातब्बर मंडळी त्यांच्याकडे आहेत, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.