Wednesday, July 17, 2024

लुई पाश्चर

लुई पाश्चर नावाचे एक महान शास्त्रज्ञ एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. दूध नासू नये, खराब होऊ नये म्हणून त्यांनी एक पद्धत शोधून काढली. जर आपण दूध ७२° सेल्सिअसपर्यंत उकळवून थंड केले, तर ते जंतूमुक्त होते. ही पद्धत पाश्चर यांनी शोधली. म्हणून या पद्धतीला ‘पाश्चरायझेशन’ असे म्हणतात.

कथा – रमेश तांबे

प्रिया अगं ये प्रिया, दूध घेऊन ये जरा.” आईची हाक कानी पडताच, प्रिया कापडी पिशवी घेऊन दूधवाल्याकडे गेली. अर्धा लिटरच्या गोकुळ डेअरीच्या दोन पिशव्या घेऊन घरात आली. दुधाच्या पिशव्या स्वयंपाक घराच्या ओट्यावर ठेवल्या अन् कापडी पिशवी वाळण्यासाठी खिडकीत टांगून ठेवली. प्रिया तशी हजरजबाबी मुलगी होती. शाळेत तिचा मराठी विषय खूपच आवडता होता. वेगवेगळे शब्द वाचणे, त्यांचे उच्चार, त्यांचे अर्थ आई-बाबांकडून समजून घेणे, हा तिचा छंदच! त्यामुळे घरात काहीही आले, मग पेपर असो किंवा एखादी वस्तू त्यावर लिहिलेले वाचल्याशिवाय ती राहत नसे.

दुधाच्या पिशवीकडे बघत प्रिया आईला म्हणाली, “आई पाश्चराईज दूध म्हणजे काय गं? आईला आपल्या लेकीचं कौतुकच वाटलं. प्रियाची आई जीवशास्त्र या विषयाची प्राध्यापक होती, त्यामुळे ती हसतच प्रियाला म्हणाली, “अगं प्रिया ये इथे बस मी तुला सांगते, पाश्चराईज दूध म्हणजे काय.”

आई सांगू लागली, “प्रिया लुई पाश्चर नावाचे एक महान शास्त्रज्ञ एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. दूध नासू नये, खराब होऊ नये म्हणून त्यांनी एक पद्धत शोधून काढली. जर आपण दूध ७२° सेल्सिअसपर्यंत उकळवून थंड केले, तर ते जंतूमुक्त होते. ही पद्धत पाश्चर यांनी शोधली. म्हणून या पद्धतीला ‘पाश्चरायझेशन’ असे म्हणतात. म्हणजे २०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या शास्त्रज्ञाची आजही जगात रोज आठवण काढली जाते.” “हो ना आई” प्रिया गालावर हात ठेवत म्हणाली.

आई पुढे सांगू लागली, “लुई पाश्चर यांचा जन्म १८२२ मध्ये फ्रान्समधील डोल या प्रांतात झाला आणि मृत्यू १८९५ मध्ये झाला. आपल्या ७२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक शोध लावले. त्या काळात लोकांची अशी समजूत होती की, रोग हे एखाद्या निर्जीव पदार्थापासून होतात; पण पाश्चर यांनी आपल्या अनेक प्रयोगातून हे दाखवून दिले की, जीवांची निर्मिती जीवांपासूनच होते. हवेत अतिसूक्ष्म असे अब्जावधी जीवजंतू असतात, हे त्यांनी प्रथम दाखवून दिले. प्रिया उद्गारली, अय्या! निर्जीवांपासून कशी होणार, जीवांची निर्मिती!” “अगं प्रिया आज तुला त्याचं आश्चर्य वाटतंय; पण ही गोष्ट त्यावेळच्या समाजाला मान्य होती.

त्या काळात पिसाळलेला कुत्रा चावून, रेबीज नावाचा महाभयंकर रोग लोकांना होत असे. तो रोग झाला की, रोगी पटापटा मृत्युमुखी पडत. मग पाश्चरच्या मनात आले, यावर लस शोधली पाहिजे. हा रोग का होतो, हे शोधण्यासाठी पाश्चरला पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातील लाळ हवी होती. मग त्या कामासाठी त्यांनी दोन माणसे नेमली; पण अशा कुत्र्याच्या जवळ कोण जाणार! कारण पिसाळलेला कुत्रा चावला की, मृत्यू हमखास. त्यामुळे अनेक दिवस पाश्चरला लाळ मिळालीच नाही.

शेवटी तो स्वतः पत्र्याचा डबा हातात घेऊन, पिसाळलेल्या कुत्र्यांच्या मागे धावू लागला. अनेक प्रयत्नानंतर त्याला ती लाळ मिळाली. मग त्यावर त्याने संशोधन करून, परिणामकारक लस शोधली. याच काळात पाश्चर एका कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच कॉलेजमधील एका प्राध्यापकाच्या मेरी नावाच्या मुलीच्या प्रेमात तो पडला होता. तेव्हा मेरीचे प्राध्यापक वडील आपल्या मुलीला कुत्सितपणे म्हणायचे, “अगं तुझा भावी नवरा हातात पत्र्याचे डबे घेऊन, पिसाळलेल्या कुत्र्यांच्या मागे धावतोय बघ! गावातली सगळी माणसं त्याला हसतात. माझं नाक कापलंस तू.” पण मेरीचा पाश्चरवर विश्वास होता. पुढे याच पाश्चरने रेबीजवर रोगप्रतिबंधक लस शोधून, मानव जातीवर खूप मोठे उपकार केले.

तर प्रिया असा हा महान शास्त्रज्ञ लुई पाश्चर! आपल्या अनेक प्रयोगांनी, शोधांनी त्याने मानवी जीवन अतिशय सुखी आणि रोगमुक्त केले. यापुढे हजारो वर्षं झाली, तरी हा थोर मानवतावादी संशोधक साऱ्या जगाच्या कायमच लक्षात राहील.” प्रियाला ही गोष्ट फार आवडली. ती आईला म्हणाली, “आई गं मलाही असं काही तरी चांगलं काम करता येईल का?” “हो हो, पण त्यासाठी प्रयत्न, मेहनत आणि जिद्द हवी.” आई म्हणाली. त्यावेळी प्रियाचे पाणीदार डोळे आत्मविश्वासाने चमकत होते!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -