नवी दिल्ली : देशात नीट पेपर (NEET Exam) लिक प्रकरण काही थांबायचे नाव घेत नाही. देशातील अनेक राज्यात पेपर फुटीचे पेव वाढले आहे. तर या प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. तसेच, विरोधी पक्षांनीही रान उठवले आहे. त्यात नीट पेपर फुटीच्या तपासात ‘नीट’ पेपरफुटीचा प्लॅन मास्टरमाईंड रवी अत्रीने तुरुंगातून राबवला असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातल्या विशेष कृती दलाने रवी अत्रीला मेरठहून अटक केली आहे. तो सध्या मेरठ येथे तुरुंगात आहे. पोलीस भरती प्रक्रियेचे पेपर फोडल्या प्रकरणी रवी अत्रीला अटक करण्यात आली होती. २०१५ मध्ये मेडिकलचे पेपर फोडल्याप्रकरणीही त्याच्यावर कारवाई झाली होती. रवी अत्री आणि त्याच्यासह १८ जणांविरोधात मेरठच्या पोलीस भरतीचे पेपर फोडल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवी अत्री हा नीट पेपरफुटी प्रकरणात गुंतल्याचे पुरावे शोधले आहेत. संजीव मुखिया हा पेपरफुटी प्रकरणातला माफिया आहे. त्याचे आणि रवी अत्रीचे चांगले संबंध आहेत असेही या तपासामध्ये समोर आले आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर त्यांना हे समजले की पेपर फोडण्याचे काम रवी अत्री आणि संजीव मुखिया हे दोघेही करत आहेत.
बिहारमधील पाटण्याचे साधारण २५ विद्यार्थ्यांना संजीव मुखियाच्या मार्फत फोडलेले पेपर पुरवण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे. रवी अत्रीचे नीट परीक्षेतल्या पेपरफुटीशी थेट कनेक्शन आहे याचेही पुरावे पोलिसांनी शोधले आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असूनही त्याने पेपरफुटीसारखा गंभीर गुन्हा कसा राबवला, हा गंभीर प्रश्न आता पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या बिहार पोलिसांचे आर्थिक गुन्हे युनिट (EOU) अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून जे जळालेले पेपर सापडले होते, त्यावर काही शाळांचे युनिक परीक्षा केंद्रांचे नंबरही होते. आर्थिक गुन्हे युनिटने मूळ कागद आणि त्यातील प्रश्नांशी जळलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळवाजुळव करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली. आर्थिक गुन्हे युनिट अहवालाच्या आधारे शिक्षण मंत्रालयाने शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पेपर लीक प्रकरणाशी संबंधित पकडलेल्यांची एकूण संख्या आता १८ वर पोहोचली आहे.