“तर मी राजकपूर नि ती नर्गिस! तुमच्या काळातली. खरं ना?” “बरं बै! तसं तसं तर तसं तसं!” ती समंजस झाली. “तेवढ्यात पाऊस आला गं. आता घाई कर. एक्का छत्रीत खेटून भिजू!” ते बाहेर पडले दोघे. एका छत्रीत. पावसाच्या धारात समंजसपणे.
नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड
सासरघरी समंजसपणे वाग हो.” “हो गं आई.” “इकडच्या सारखा हट्टीपणा करू नको.” “हो गं आई.” “मला हेच्च पायजेल, तेच्च पायजेल, असा हेका नि ठेका नक्को.” “हो गं आई.” “सासरघरचे सुनेच्या माहेरची किंमत करतात.” “का गं आई? मी दम कोंडून राहू का सासरी?” “अगं नव्या सुनेचं कौतुक करतात सासरघरी. इतके काही ‘हे’ नसतात सासुरवाडवाले.” “हे’ म्हणजे खलपुरुष ना?” “विशेषत: खलस्त्रिया असतात सासरी. मी या घरी आले, नवी नवी... तेव्हा तुझी आजी नंबर वन व्हिलन होती घरातली.” “पण आता तर ती चांगली वागते की गं तुझ्याशी.” “अगं हा विकलांग गोडवा आहे बरं!” “म्हणजे? विकलांग गोडवा? मी नाही समजले.” “शरीर विकल झालं की, जीभ आपोआप गोड होते. वागणे आपोआप समंजस होतं.” “म्हणजे हा कंपल्सरी ‘समंजस’पणा आहे तर.” “होच्च मुळी.”
इतक्यात खोकल्याची उबळ मधखोलीतून ऐकू आली. शकू धावली. शकू म्हणजे नात! नातीचा जीव आजीसाठी कळवळला. धावला. “आज्जू, काय झालं? ठसका लागला का? आजी, थांब, मी गारगार पाणी देते. हळूहळू पी. ठसका थांबेल हं आज्जू.” आजी घटाघटा पाणी प्यायली. ठसका हळूहळू थांबला. आजी बोलती झाली. “सासरी, आजेसासू, सासू दोन वयोवृद्ध बायका आहेत. त्यांना जिंकलेस की, तू नवऱ्याची लाडकी होशील बघ.” “तुला गं कसं माहीत?” “अगं, तुझ्या बापाचा माझ्यावर किती जीव आहे.” “हो. ते मी बघतेय वीस-एकवीस वर्षं. खालवर खालवर होतो तुझ्यासाठी. आई, पाणी हवं का? साखर हवी का? लोणी हवं का?” सारखं आईपुराण असतं त्यांच्या तोंडात!
“भाग्य माझं.” “माझी आईपण छान वागते की गं तुझ्याशी.” “हो. मी कुठे तक्रार करते?” “पण फारशी गोडसुद्धा बोलत नाहीस हं आजी तू आईशी.” शकूनं गाल फुगवले. “आता गोड वागेन हं बाळ.” “आजपासून.” “आज करेसो, अभ्भी कर आजी.” “अभ्भी तो अभ्भी! सुने, लाडाबाई.” “इश्श! इतकं काही नकोय लाडात यायला.” शकूची आई फणकारली. “चहा देतीस का गं, या गरिबाला उलीसा?” “हो. देते की. चहाची वेळच झालीय.”
तिने आधण ठेवलं. चहाची भुक्की उकळत्या पाण्यात टाकली. भुकटीचा वास नाकात दरवळला. आजी खूश्म्खूश झाली. मुख्य म्हणजे आज्ञापालन झालं होतं ना! एवढ्यात शकूचा ‘वुडबी’ आला. होणारा नवरा हो! शकू जामे जाम खूश झाली. “आई, आधण वाढव ना! ‘तो’ आलाय. अगदी योग्य वेळी!” “हो. वाढवते.” आईनं कपभर पाणी वाढवलं. “शकू. बाहेरचा फिरू फिरू मूड आहे गं. हवा कशी मस्त ढगाळ झाली आहे. पावसाचा इशारा करतीय.” “छत्री घेऊन जा हं जावईबापू” आई म्हणाली. “छे छे...” “अहो भिजाल! आमच्या शकूला लगेच सर्दी भरते नाकात.”
“बरं, शकूची आई. चल ना गं शकू!” तो समंजसपणे छत्री उचलत म्हणाला. “बघ! जावई किती समंजस आहेत ते.” भावी सासू खूश होत म्हणाली. लगा लगा दोन छत्र्या पुढे केल्यान्. “शकूची आई, एकच छत्री पुरे ना! मी घेतलेली.” “अरे पण, झड जोराची आली तर?” “तर मी राजकपूर नि ती नर्गिस! तुमच्या काळातली. खरं ना?” “बरं बै! तसं तसं तर तसं तसं!” ती समंजस झाली. “तेवढ्यात पाऊस आला गं. आता घाई कर. एक्का छत्रीत खेटून भिजू!” ते बाहेर पडले दोघे. एका छत्रीत. पावसाच्या धारात समंजसपणे.






