रेल्वेगाडी धावण्याची क्षमता होणार दुप्पट
मुंबई : उन्हाळा आणि गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्याकरता हक्काचे कारण. यावेळेस भरभरुन कोकण रेल्वेतून (Konkan Railway) प्रवासी कोकणात दाखल होतात. मात्र, कोकण रेल्वेने जायचं म्हटलं की प्रवाशांचे मोठेच हाल होतात. रेल्वेगाड्या उशिराने धावणं, जादा रेल्वेगाड्या नसणं, मर्यादित स्थानकांनाच थांबा असणं, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणं अशा समस्या प्रवाशांना भेडसावतात. या समस्यांवर मात करण्यासाठी कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा (Doubling of Railways) प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाला दिला असून आता या कामाला वेग आला आहे. त्यामुळे यंदा गणपतीसाठी गावी जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे.
रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाला देण्यात आला आहे. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळे जादा गाड्या सोडता येतील व गाड्यांचा वेग वाढेल. कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर असा ७४० किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे. कोकण रेल्वेवर रोहा ते वीर ४६.८ किमीच्या रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. मात्र त्यानंतर दुहेरीकरणाबाबत जलदगतीनं पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडत होता.
उत्तर आणि दक्षिण भारताला कमी प्रवास खर्चात आणि जलदगतीने जोडण्याचे काम कोकण रेल्वेकडून करण्यात येते. पण वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेमध्ये नसल्याने, अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. कोकण रेल्वेचे संपूर्ण दुहेरीकरण करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.
कसे असेल दुहेरीकरण?
सपाट जमिनीवर रेल्वेच्या प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, घाट, बोगद्याच्या ठिकाणी प्रति किमी खर्च ८० ते १०० कोटी रुपये अपेक्षित आहे. रोहा ते वीर दरम्यानचं दुहेरीकरण पूर्ण झालं असून त्यासाठी ५३० कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण केले जाईल. सध्या कोकण रेल्वेवरून दरदिवशी ५५ रेल्वेगाड्या आणि १८ मालगाड्या धावतात. टप्प्या दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल.
३१ वर्षांपासून केवळ एकाच ट्रॅकवर गाड्यांची ये-जा
कोकण रेल्वे सुरु होऊन ३१ वर्षे झाली. १९९८ पासून तर ती पूर्णपणे सुरु आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या बाजूने धावणाऱ्या रेल्वेगाड्या तिथलं निसर्गसौंदर्य तुमच्या जवळ आणून ठेवतात. गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले. रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या. पण हे सारं एकाच रेल्वे रुळावर सुरु आहे. गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर ७४० किलोमीटरचं अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरु आहे. रोज ७५ हून अधिक प्रवासी व मालगाड्यांची ये जा या एकाच ट्रॅकवर सुरु असते. परिणामी प्रवासात निष्कारण जादा वेळ जातो. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडं सुपूर्द केला आहे.