मुंबई: अफगाणिस्तानने टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सगळ्यात मोठा धक्का दिला आहे. त्यांनी ७ वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाला हरवले आहे. अफगाणिस्तानने सुपर ८च्या सामन्यात २१ धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४९ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले होते.
याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ १२७ धावाच करता आल्या. अफगाणिस्तानसाठी गुलाबदीन नायबने ४ विकेट मिळवल्या. तर नवीन उल हकने ३ विकेट मिळवल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ वेळा वनडे वर्ल्डकप आणि एकदा टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.
टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४८ धावा केल्या होत्या. या दरम्यान सलामीवीर गुरबाजने ४९ धावांचा सामना करताना ६० धावा केल्या होत्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. इब्राहिम जादरानने ५१ धावांची खेळी केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार लगावले. या दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने ३ विकेट मिळवल्या.
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसमोर टेकले गुडघे
अफगाणिस्तानविरुद्ध मैदानावर उतरलेल्या दिग्गजांनी भरलेल्या कांगारूंच्या संघाने गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. त्यांना १९.२ षटकांत केवळ १२७ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडूंचा सामना करताना ५९ धावा केल्या. यावेळेस त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. कर्णधार मिशेल मार्श १२ धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉयनिस ११ धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रेविस हेड खातेही खोलू शकला नाही.