वसई हत्याकांडातील आरोपीचा वकिलाकडे खुलासा
याअगोदर आरोपीने पोलिसांना दिली होती खोटी माहिती
वसई : वसईत भर रस्त्यात एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी पान्याचे सपासप १८ वार करत तिला संपवल्याची खळबळजनक घटना घडली होती (Vasai murder news). आरती यादव (Aarti Yadav) असं मृत तरुणीचं नाव असून आरोपीचं नाव रोहित यादव (Rohit Yadav) आहे. आरतीच्या मृत्यूनंतरही निर्दयी झालेला रोहित तिच्या मृतदेहाला ‘माझ्यासोबत असं का केलं?’ याचा जाब विचारत होता. त्याने हा खून का केला याबाबत मात्र स्पष्टता मिळू शकली नव्हती. आता रोहितने त्याच्या वकिलांकडे दिलेल्या जबाबातून याचा उलगडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोहितने पोलिसांना त्याचं नाव आणि गावाबद्दल खोटी माहिती दिली असल्याचंही समोर आलं आहे.
आरोपी रोहित यादवने आपण का खून केला याचा खुलासा आपल्या वकिलाकडे केला आहे. दोन मिनिटाचा राग आणि त्यात तिला संपवलं, असं त्याने सांगितलं आहे. रोहित यादवला आगोदर वसई न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज सहा दिवसानंतर वालीव पोलिसांनी आरोपीला वसई कोर्टात हजर केल्यावर पोलिसांनी न्यायालयाकडून आणखी चार दिवसाची पोलीस कोठडी मागितली. त्यानंतर वसई न्यायालयाने आरोपीला २७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या दरम्यान आरोपीने आपल्या वकिलाला सांगितल्याप्रमाणे आरोपी रोहित आणि मयत आरतीचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरतीने दुसऱ्या मुलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अचानक राग अनावर होऊन आपल्या हातून हे कृत्य झाल्याचं त्याने सांगितलं.
पोलिसांना दिली खोटी माहिती
रोहित सहा दिवस वालीव पोलिसांच्या कोठडीत असताना पोलिसांनी केलेल्या तपासात रोहितने खोटी माहिती पुरवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आरोपी रोहित याने प्रथम आपलं नाव रोहित रामनिवास यादव असं सांगितंल होतं. तसेच त्याचं मूळ गाव रहिसपुर, पोस्ट मिसलगढी, तहसिल तेजगडी जिल्हा रोहतक राज्य हरियाणा असं सांगितलं होतं. मात्र पोलिसांच्या तपासात त्याच खरं नाव रोहित रामनिवास पाल असल्याचं आढळलं आहे. शिवाय त्याचं मूळ गाव मकान नंबर १६९, हरागांव, गाजियाबाद, थाना – कविनगर जिल्हा गाजियाबाद, राज्य उत्तर प्रदेश असल्याचं निष्पन्न झालं आहे.
आरोपीने प्रथम आपल्या मूळ गावी कुणीही नातेवाईक नसून, आई-वडील, बहीण यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. मात्र तपासामध्ये त्याचे आई, वडील आणि दोन बहिणी त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरोपीच्या या हत्याकांडात आणखी कुणी सहभागी आहे का? याबाबत कुणाला माहिती अथवा कुणाशी संपर्क केला होता का? याचा तपास आता वालीव पोलीस करणार आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरात १८ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता रोहितने कामावर जाणाऱ्या आरतीवर हल्ला केला. त्याने लोखंडी पान्याने सपासप १८ वार करत तिला संपवलं. तो हे कृत्य करत असताना रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमलेली असूनही वाचवायला मात्र कोणीच पुढे आलं नाही. हे वार करत असताना तो सतत ‘माझ्यासोबत असं का केलं?’ असा प्रश्न विचारत होता. ती मेल्यानंतर देखील तो प्रश्न विचारत होता. या अत्यंत क्रूर प्रकाराने महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवला अटक केली.