लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak Case) दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस (Nanded ATS) पथकाने लातूरमध्ये (Latur) दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना शनिवारी ताब्यात घेतलं. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत. अनेक तास चौकशी केल्यानंतर या दोन्ही शिक्षकांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर काही तासांनी लातूर पोलिसांनी तपास सुरू केला. यातील एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, संजय जाधव हे शिक्षक फरार झाले आहेत.
नांदेड एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिलेला शिक्षक संजय जाधव फरार झाला आहे. त्या शिक्षकाच्या तपासासाठी आता पोलीस पथक रवाना झालं आहे. मात्र, काल संध्याकाळपासून संजय जाधव यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे. नांदेड एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी रात्रभर कसून चौकशी केली. काही धागेदोरेही सापडले होते, असं असतानाही त्यांना सोडण्यात आलं होतं. यातील एक शिक्षक आता फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोनपेक्षा अधिक लोकांचा समावेश असल्याची शक्यता
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का? या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. त्यानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं. मात्र, रविवारी संध्याकाळी पुन्हा यातील पठाण नावाच्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन पेक्षा अधिक लोकांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.