Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीनिखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला - मुख्यमंत्री

निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला – मुख्यमंत्री

मुंबई : आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलासक्त होते. त्यामुळे त्यांच्याशीही कणेकर यांचे स्नेहबंध होते. कणेकरांच्या हजरजबाबी आणि हरहुन्नरही व्यक्तिमत्वामुळे ते जिथे-जिथे जातील तिथे हास्याची लकेर उमटत असे. चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रातील अनेक घडामोडींचा त्यांचा बारकाईने अभ्यास असे. विसंगती आणि किश्श्यांतून ते हास्याची कारंजी फुलवत राहिले. त्यांनी स्वतःला कुठल्याही क्षेत्राचे बंधन घालून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी अष्टपैलू खेळाडुसारखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मैदानात कामगिरी करून ठेवली आहे. त्यांनी फटकेबाजीही केली आणि आणि विकेटही उडवल्या आहेत. अशी कामगिरी कुणी यापुर्वी केली नव्हती, आणि यापुढेही शक्य नाही.

स्तंभलेखन, पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांनी चौफेर लेखन केले. त्यांच्या पुस्तकांची नावंही मिश्किल आणि दिलखुलास स्वभावाप्रमाणे खट्याळ-अवखळ अशी वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहेत. या साहित्यनिर्मितीतून, वैशिष्ट्यपूर्ण एकपात्री प्रयोगांच्या सादरीकरणातून त्यांनी विदेशातही लोकप्रियता मिळवली. यातूनही त्यांनी मराठी साहित्याचे वैभव, बहुविविधता जागतिकस्तरावर पोहचवली आहे. त्यांच्यासारखा अवलिया होणे नाही. त्यांच्या जाण्याने मराठी कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा या बहुआयामी महाराष्ट्र सुपुत्राला ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

साहित्य विश्वाचे नुकसान – राज्यपाल रमेश बैस

“उत्तम पत्रकार असलेले शिरीष कणेकर मिश्किल, हरहुन्नरी व विनोदी लेखक तसेच प्रभावी वक्ते होते. कणेकर यांनी अखेरपर्यंत स्तंभलेखन केले आणि आपल्या खुमासदार शैलीने वाचकांचे तसेच श्रोत्यांचे मनोरंजन केले. क्रिकेट आणि हिंदी चित्रपटसृष्टी या दोन विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि सांस्कृतिक विश्वाचे नुकसान झाले आहे. शिरीष कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो”, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक, व्यासंगी पत्रकार, मनस्वी कलावंत, दिलखुलास व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांच्या अजरामर साहित्यकृती तसंच कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत राहतील.

मराठी लेखनात कणेकरी बाज रूजविणारा लेखक गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला आहे. त्यांनी मराठीत कणेकरी बाजाचे लेखन रूजविले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिरीष कणेकर हे चित्रपट, क्रिकेटचे एका अर्थाने माहितीकोश होते. एखादा प्रसंग रंजक करून कसा सांगायचा, यावर त्यांची हुकूमत होती. शब्दांवर त्यांची एवढी पकड होती की कोणताही प्रसंग ते शब्दांतून चित्रमय करू शकत. त्यांच्या लेखनात कायम कणेकरी बाज दिसायचा. त्यांच्या निधनाने समकालावर वैशिष्ट्यपूर्ण भाष्य करणारा भाष्यकार हरपला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -