क्रिकेटच्या खेळातील टी-२० प्रकारातील विश्वचषक भारतीय संघाने पटकावला. अर्थात हा विश्वचषक जिंकण्यामागील विशेष अप्रूप म्हणजे रोहित सेनेने या स्पर्धेत एकही सामना गमविला नव्हता. त्याशिवाय अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत गेला असताना ‘हारी बाजी को जितना हमे आता है’ या स्टाईलमध्ये सीमारेषेच्या बाहेर गेलेल्या चेंडूला सीमारेषेच्या आत ढकलत सूर्यकुमारने अफलातून झेल घेतला आणि काळवडलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. अतिम दोन षटकांत अवघ्या २० धावा विजयासाठी हव्या असताना गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. अंतिम षटकामध्ये तर हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवत रोहितकडे पाहत विश्वचषक आपणच जिंकणार असल्याचा जणू काही इशाराच दिला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखत व त्याच षटकात अजून एक बळी घेत पांड्याने विश्वचषकावर भारताचे नाव कोरण्यात आपली भूमिका चोख बजावली.
स्पर्धेतील अन्य सामन्यात फ्लॉप गेलेल्या कोहलीने स्पर्धेतील अंतिम सामन्यात आपल्या फलंदाजीचे विराट दर्शन घडवत पावशतकी मजल मारत भारतीय संघाच्या धावफलकाला खऱ्या अर्थांने आकार देण्याचे काम केले. भारतीय संघाने विश्वचषक जिंकला असला तरी भारतीय भूमीवर ते आले नसल्याने भारतीय त्यांची चातकाप्रमाणे वाट पाहत होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. क्रिकेटच्या विश्वात इंग्लंडमधील लॉडर्सच्या खेळपट्टीला क्रिकेटची पंढरी असे संबोधले जात असले तरी भारतात मात्र मुंबईतील वानखेडे स्टेडिअमचे स्थान काही अलौकिकच आहे. त्यात मुंबई शहर व उपनगरात देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले क्रीडाप्रेमी एकवटलेले असल्याने मुंबईतील स्वागत म्हणजे देशानेच केलेले स्वागत असा संदेशही बीसीसीआयने त्या कार्यक्रम आयोजनातून दिला आहे. यापूर्वी एका तपाअगोदर धोनी सेनेने टी-२०चा विश्वचषक जिंकला असताना या मुंबापुरीने त्याच जल्लोषात, त्याच उत्साहात भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत केले होते. गुरुवारचा दिवस हा मुंबईकरांनी क्रिकेट खेळाला आणि विश्वविजेत्या संघातील खेळाडूंच्या स्वागतासाठी, जल्लोषासाठी समर्पित केला होता.
विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीच्या दिशेने जात असतानाच गुरुवारी क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हजारो क्रिकेट भक्तांच्या दिंड्या येऊन थडकल्या. निमित्त होते अर्थातच विश्वविजेत्या क्रिकेटदेवांच्या दर्शनाचे. विश्वविजेत्यांना याचि देही, याचि डोळा पाहण्याची धडपड आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुंबईत पावसातही चाहत्यांचा जल्लोष कमी झाला नव्हता. मरिन ड्राईव्ह येथून टी-२० विश्वचषक विजेत्या संघाच्या विजय परेडने जल्लोषाची सुरुवात झाली, ती वानखेडे स्टेडियमवर संपली. विश्वचषक विजेते खेळाडू सायंकाळच्या सुमारास आले असले तरी मुंबईकर मात्र सकाळपासून लाखोंच्या संख्येने उपस्थित होता, तर मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यानच्या रस्त्यावर साडेतीन लाखांच्या आसपास मुंबईकर जमला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. क्रिकेट हाच मुंबईकरांचा या दिवशी श्वास बनला होता. क्रिकेट खेळातील देवांना जवळून पाहण्यासाठी, त्यांच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी, जल्लोष साजरा करत मुसळधार पावसातही विजयी घोषणांचा पाऊस पाडण्यासाठी, वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीसोबत बेंबीच्या देठापासून वंदे मातरमचा नारा देण्यासाठी मुंबईकर घरदार, कामधंदा सोडून मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान थांबला होता.
बार्बाडोस येथून नवी दिल्लीत परतलेला भारतीय संघ देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी सर्वप्रथम गेला. यावेळी मोदींनीही त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. खेळाडूंशी सुसंवाद साधला. खेळाडूंना विश्वचषकातील स्पर्धेबाबत, सामन्याबाबत प्रश्न विचारत मोदींनी आपणही विश्वचषकातील सामने पाहिले असल्याचे खेळाडूंना सांगितले. भारतीय खेळाडूंना पंतप्रधान मोदी भेटले, खेळाडूंच्या परिवाराला भेटले, त्यांच्याशी बोलले. भारताचा सलामीवीर वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह यांच्या लहान मुलाला उचलून घेत पंतप्रधान मोदी बुमराह परिवाराशी बराच वेळ बोलत होते. देशाचे पंतप्रधान आपले स्वागत करत आहेत, आपण मिळविलेले यश साजरे करताना आपल्याला प्रोत्साहित करून अभिनंदन करत आहेत, हे पाहून खेळाडूही भारावून गेले होते.
दिल्लीतून मुंबईत आलेल्या खेळाडूंची बेस्टच्या ओपन बसमधून विजयी परेड काढण्यात आली. आपल्या खेळाडूंना ओपन बसमधून पाहताना मुंबईकरांच्या उत्साहाला, जल्लोषाला उधाण आले होते. मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम हे अंतर अवघ्या काही मिनिटांचे; परंतु हे अंतर कापण्यास बसला काही तास लागले. दुपारनंतर लोकल गाड्या दुथडी भरून वाहत होत्या. आयपीएल सामन्यात ज्या हार्दिक पांड्याला मुंबईकर व्हिलन म्हणून संबोधत होते, त्याला वेगवेगळ्या उपाध्या देऊन कोसत होते. मात्र, विश्वचषक स्पर्धेतील त्याचे अखेरचे षटक निर्णायक ठरल्यानंतर चाहत्यांनी हार्दिकची मनापासून माफी मागितली. डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर अफलातून झेल पकडणाऱ्या सूर्यकुमार यादवचाही जयघोष चाहते करत होते. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी तुफान गर्दी केली असताना या गर्दीत एक ॲम्ब्युलन्स आली आणि चाहत्यांनी भान राखत त्वरित वाट मोकळी करून दिली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यासंदर्भातील व्हीडिओ शेअर करत सायरन बजता गया और रस्ता बनता गया, म्हणत मुंबईकरांना सलाम केला. मुंबईकरांनी केलेले स्वागत पाहून क्रिकेटपटूही भारावून गेले. कर्णधार रोहित शर्माने एक्सवरून मुंबईकरांचे आभारही मानले आहेत. एकंदरीतच गुरुवारी विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी दुमदुमली असल्याचे जगातील क्रिडाप्रेमींनी जवळून पाहिले व विश्वविजेत्या खेळाडूंनी ते अनुभवले.