Saturday, March 22, 2025

शर्टपीस

अंजूच्या नवऱ्याचा बर्थडे जवळ आला होता. अंजूने शर्ट सरप्राइज द्यायचे ठरवले.शर्टाचे कापड प्रथम दिले. मग शर्ट. ती म्हणाली. “घाल ना सख्या.” त्याने तो शर्ट अंगावर चढवला. तो जाम ढगळ झाला. ती रडवेली झाली. “आपण बदलून घेऊ” म्हणाली.“नको गं. त्यापेक्षा मी जाडा होईन नं!” तो तिला कुशीत घेऊन, त्या क्षणी म्हणाला. त्या मिठीत जगातले सारे प्रेम सामावले होते.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

शर्टपीस पाहिजे? मनाजोगा आमच्याकडे मिळेल.” अंजू ती त्या दुकानावरली जाहिरात बघून, दुकानाच्या पायऱ्या चढली. नुकताच तिच्या नवऱ्याचा बर्थडे जवळ आला होता. किमती पण परवडणाऱ्या होत्या. बघूया. बघायला पैसे थोडीच पडतात? त्याला बरोबर आणले असते, तर बरे झाले असते. मापाचा घेता आला असता. “अगं अंजू, मग सरप्राईझ ते काय राहिलं? तू शर्ट देशील, तेव्हा त्याच्या डोळ्यांत किती आनंद असेल. तो बघायचाय ना? मग एक शर्ट खरेदी कर बघू.” तिने मनाची समजूत घातली नि शर्टांच्या गर्दीत ती हरवून गेली. निळसर शर्ट त्याला खूप छान दिसेल. आभाळ खाली उतरलं, असं वाटेल. हा शेवाळी शर्ट किती छान आहे! हा की तो? ती शर्ट बघतच राहिली.

“हा घ्या, साहेबांना छान दिसेल.” दुकानदार अंजूला खूश करीत म्हणाला. “साहेब दुकानी येतात ना! हाईट, बॉडी झकास आहे साहेबांची.” अंजू दुकानदाराच्या हिशेबी बोलण्याला फसली नि शर्टपीस घेऊनच दुकानातून बाहेर पडली.
“बाईसाहेब, मी आपणास एक सुचवू का?”

“हो, सुचवा की.”
“साहेबांचा नुसता पीस न खरेदी करता, शर्टच खरेदी करा.”
“का हो?”
“अहो बाईसाहेब, साहेबांचा बर्थडे जवळ आलाय ना?”
“हो. पुढच्याच आठवड्यात आहे.
त्यांचा वाढदिवस.”
“म्हणून म्हणतो तयार शर्ट उचला.”
“अहो, आमचा टेलर, अगदी मापाचा शिवून देणारे.” ती म्हणाली.
“मग एक कपडा घ्या.” “पण शर्टच घ्या. तयार. अॅडिशनल.”
“अहो नको.”
“पैसे नाहीत का वहिनी?”
“इतके डबल डबल नाहीयेत हो.”
“मी का तुम्हाला आज ओळखतो?”
“हो. तेही खरंच म्हणा!” ती सुखावली. मनोमन फुलारली.
“बाईसाहेब उद्या, परवा, पुढील आठवड्यात कधीही पैसे द्या. माझी काही हरकत नाही.” दुकानदाराने तूप लावले. ती आणखीच चढली.

“मी किमतही वाजवी लावतो.”
“ते का?”
“माझे एवढे ऐकलेत म्हणून.” दुकानदाराने गोड गोड बोलून शर्ट आणि शर्टपीस दोन्ही अंजूच्या गळ्यात मारले.
काऊंटरवरल्या मालकाने डोळ्यांनी कौतुक केले. त्याची ती खास पद्धत होती. विक्रेत्यांना खूश करण्याची, विक्रेत्यांना सुद्धा तेवढेसे कौतुक पुरे. नोकरीची शाश्वती वाढे ना!
अंजू घरी आली. रिक्षाचे सुद्धा पैसे उरले नव्हते; पण सुखावली होती ना! नवरा किती खूश होईल, या कल्पनेने अधिकच सुखावली होती.

घरी आल्याबरोबर तिने शर्टाचे कापड नि शर्ट दोन्हीही कपाटात लपविले. सरप्राईज होते ना लाडक्या नवऱ्यासाठी!
पुढचा आठवडा येईपर्यंत आता हे गुपित गुप्त ठेवायचे होते.
मग एकदम अंगावर चढवू. अंजू खुशमे खूश होत, मनाशीच मांडे खाऊ लागली.
आणि बर्थडे उगवला.
अंजू सक्काळीच उठली. नवऱ्याला कुशीत ओढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
“तुझ्या वाढदिवशी देते शुभेच्छा तुला,
खूप खूप सोबत लाभो तुझी रे मला.
आनंदाची दिंडी होवो, तुझी माझी जोडी…
संसारात राहो राहो, अखंडशी गोडी.”

तिने स्वत: कविता केली होती. त्याला चालही गोड लावली होती. काही करून नवरा खूश व्हावा, यासाठी सारी धडपड होती.
अनुमान खरे ठरले.
नवरा जाम खूश झाला. “किती गोड गातेस!”
“खरंच?”
“अगदी खरं! मी खूशम खूश, खुश्मे खूश आहे, अगदी तुझ्या कवितेवर, तुझ्या गाण्यावर.”
“खरंच?”
“सौ टका सच!”
“थांबा! तुम्हाला अजून खूश करते.” तिने शर्टाचे कापड प्रथम दिले. मग शर्ट.”
ती म्हणाली.
“घाल ना सख्या.”

त्याने तो शर्ट अंगावर चढवला. तो जाम ढगळ झाला. ती रडवेली झाली. “आपण बदलून घेऊ” म्हणाली.
“नको गं. त्यापेक्षा मी जाडा होईन नं!” तो तिला कुशीत घेऊन, त्या क्षणी म्हणाला. त्या मिठीत जगातले सारे प्रेम सामावले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -