दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा
पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. विठुरायाच्या (Vitthal) दर्शनाकडे त्यांचे डोळे लागलेले असतात. मात्र, पंढरपूरच्या (Pandharpur) मंदिरात दिल्या जात असलेल्या व्हीआयपी दर्शनामुळे (VIP darshan) रांगेतील भाविकांना अनेकदा ताटकळत उभं राहावं लागतं. आता आषाढीच्या पार्श्वभूमीवर हे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढत आहे. लांब रांगा लागत असून आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घेता यावे असे नियोजन मंदिर समितीने केले आहे. त्यातच व्हीआयपी दर्शन आता बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाविकांची दर्शन रांग लवकर पुढे सरकणार आहे. आजपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे.
आजपासून विठुरायाचे २४ तास पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत दर्शनाची रांग गेली आहे. जवळपास दहा पत्रा शेडपैकी पाच पत्राशेड भाविकांच्या गर्दीने भरले आहेत. पुढील दिवसात भाविकांची आणखी गर्दी होण्याची शक्यता देखील आहे.