
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती
मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या अध्यतेखाली काल खाद्य प्राधिकरणाची (Food Authority) ४४ वी बैठक पार पडली. या बैठकीत पदार्थांच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय (New Rule) घेण्यात आला आहे. ग्राहकांना कोणताही पदार्थ खरेदी करताना त्या पदार्थाची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी एफएसएसआयने पॅकबंद पदार्थांबाबत (Packaged Foods) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ग्राहकांना चांगलाच फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खाद्य प्राधिकरणाच्या बैठकीत पॅकबंद पदार्थांबाबत लेबलींग (Labeling) आणि जाहिरातीमध्ये (Advertisements) सुरक्षतेची माहिती बोल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्टबाबत खोटी माहिती देतात ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊन त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे ग्राहकांना पदार्थाच्या पॅकेटवरूनच सर्व योग्य माहिती मिळावी आणि कोणता पदार्थ योग्य आहे हे समजण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर, पॅकबंद अन्न बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोडक्टमध्ये असलेल्या साहित्याच्या प्रमाणाची माहिती मोठ्या अक्षरांत द्यावी लागेल असे सांगण्यात आले आहे. यामध्ये फूड कंपन्यांना पदार्थात मीठ, साखर आणि फायबर्स किती प्रमाणात आहे याबाबत माहिती द्यावी लागणार आहे.
पॅकफूड आरोग्यासाठी घातक
मार्केटमध्ये विविध पद्धतीचे पॅकफूड उपलब्ध असतात. मात्र त्यातील काही फूड आरोग्यासाठी घातकही असतात. अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्टबाबत चांगली जाहिरात आणि दावे करतात. ग्राहकांनी त्यांच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी पदार्थांवर खोटी माहिती देतात. अशा कंपन्यांवर एफएसएसएआय कडक कारवाई करत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने पॅकफूड घेताना त्यावरील सूचना पूर्ण वाचून घेतली पाहिजे, असे आवाहन एफएसएसएआयने केले आहे.