८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली
दिसपूर : सध्या देशभरात सगळीकडे पावसाचे वातावरण (Rain updates) आहे. त्यातच ईशान्येकडील राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आसाममध्ये पूर (Assam flood) आला आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा यांसारख्या राज्यातील प्रमुख नद्या आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने जवळपास २४ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. तर गेल्या आठवड्यापासून पूरसंबंधित अपघातांमुळे आतापर्यंत ५२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सरकारच्या माहितीनुसार, आसामच्या २९ जिल्ह्यांमध्ये एकूण २३,९६,६४८ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ६८,७६८.५ हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. एकूण ५३,४२९ बाधित लोकांनी ५७७ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. निमतीघाट, तेजपूर, गोलपारा आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. त्याच्या उपनद्याही अनेक ठिकाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.
आठ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडिलांची शोधमोहिम सुरु
दुसरीकडे गुवाहाटी येथील नाल्यात बुडालेल्या आठ वर्षांच्या अभिनाश नावाच्या मुलाचा शोध सुरू आहे. अभिनाश बेपत्ता होऊन तीन दिवस झाले, मात्र अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. अभिनाशचे वडील हिरालाल सरकार हे एकटेच आपल्या मुलाचा शोध घेत आहेत. झडती घेतली असता त्यांच्या मुलाची चप्पल सापडली. हिरालाल म्हणाले, “मी त्याला शोधतोय मला फक्त माझ्या मुलाची चप्पल सापडली आहे. सरकारकडे यंत्रणा आहे, त्यांना माझा मुलगा शोधावा लागेल.”
पुराने वन्य प्राण्यांचाही घेतला जीव
आसाममधील प्रसिद्ध काझीरंगा नॅशनल पार्क (KNP) मध्ये आलेल्या विनाशकारी पुराने ११४ वन्य प्राण्यांचा जीव घेतला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. केएनपीमध्ये चार गेंडे आणि ९४ हॉग डीअरचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या इतर ११ जनावरांचाही यात समावेश आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पुराचा फटका?
आसाममधील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये गोलपारा, नागाव, नलबारी, कामरूप, मोरीगाव, दिब्रुगढ, सोनितपूर, लखीमपूर, दक्षिण सलमारा, धुबरी, जोरहाट, चरैदेव, होजई, करीमगंज, शिवसागर, बोंगईगाव, बारपेटा, धेमाजी, हैलाकांडी, बिरहाटवा, गोलाकांडी या जिल्ह्यांचा समावेश आहे.