नुकतीच पार पडलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा ही नानाविध कारणांनी गाजली. निम्म्यापेक्षा अधिक भारतीय वंशाच्या या संघाने सुपर-८ मध्ये मिळवलेला हा प्रवेश धक्कादायक होता. इथून पुढे अमेरिकेत क्रिकेट क्रांतीचे हे संकेत आहेत. या स्पर्धेने अमेरिकन चाहत्यांना क्रिकेट पाहायला प्रवृत्त केले, असे आवर्जून म्हणता येईल.
विशेष – रोहित गुरव
त्येक स्पर्धा ही काही तरी नवे घेऊन येत असते. नुकतीच पार पडलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा ही नानाविध कारणांनी गाजली. साखळी सामन्यांतच न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान या बड्या संघांची अविश्वसनीय झोप उडाली. अमेरिका, अफगाणिस्तान या अंडरडॉग संघांनी दिग्गज संघांना चटके देत, स्पर्धेत ऐतिहासिक आगेकूच केली. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणात सहआयोजक असलेल्या आणि मिनी इंडिया म्हणून ओळखल्या गेलेल्या अमेरिकेने पाकिस्तानसारख्या तुलनेने बलाढ्य संघाला पराभवाचे पाणी पाजत, ‘अव्वल आठ’ संघांत प्रवेश केला. पाकड्यांसाठी हा ४४० वोल्ट्सचा झटका होता. तो अमेरिकेसारख्या नवख्या संघाने दिला म्हणून त्याची तीव्रताही वाढते. निम्म्यापेक्षा अधिक भारतीय वंशाच्या या संघाने सुपर-८ मध्ये मिळवलेला हा प्रवेश धक्कादायक होता. इथून पुढे अमेरिकेत क्रिकेट क्रांतीचे हे संकेत आहेत. या स्पर्धेने अमेरिकन चाहत्यांना क्रिकेट पाहायला प्रवृत्त केले, असे आवर्जून म्हणता येईल.
भारताचा हात पकडून, जागतिक क्रिकेटमध्ये भल्या-भल्या संघांकडे डोळे वटारून पाहण्याच्या अफगाणी हिमतीला विश्वचषकात बळकटी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या ताकदवान सांडाची शिकार करून, अफगाणिस्तानने एकच खळबळ माजवली. उपांत्य फेरीत ऐतिहासिक असा प्रवेश करत, दक्षिण आफ्रिकेला धमकी देण्याची हिंमत अफगाणिस्तानची झाली. कगिसो रबाडा, नॉर्टजे, शम्सी या गोलंदाजांनी अफगाणी धाडसाला ब्रेक लावला. स्वप्नांचे दोर कापत, त्यांचे पाय जमिनीला टेकवले. अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वचषकात केलेली कामगिरी विलक्षण होती. आजतागायत जे शक्य झाले नाही, ते त्यांनी या विश्वचषकात करून दाखवले. त्यामुळे त्यांच्याकडे अंडरडॉग म्हणून पाहणे आता धोक्याचे ठरेल. त्यांचे क्रिकेट आता एका खेळाडूपुरते मर्यादित नाही. संघ म्हणून अफगाणिस्तानची घडी नीट बसली आहे. अफगाणी बछड्याचा आता वाघ झाला आहे. नखे, दात आता अधिक धारदार झाले आहेत. शिकार करण्याची त्यांची क्षमता कमालीची वाढली आहे. त्यामुळे इथून पुढे त्यांनी उलटफेर केले, तर आश्चर्य वाटायला नको.
त्यानिमित्ताने आशिया खंडातील स्पर्धा आता अधिक तीव्र झाली आहे. बांगलादेशचा संघही आपल्या खेळाने प्रभाव पाडत आहे. भारताच्या वळचणीला जाणे अफगाणिस्तान क्रिकेटसाठी बदलाचे वारे ठरत आहेत.
दक्षिण आफ्रिकेसाठी हा वर्ल्डकप लॉटरी ठरला; परंतु शेवटचा एक नंबर पुढे गेला आणि सर्वोच्च बक्षिसाने त्यांना पुन्हा हुलकावणी दिली. दुसऱ्या सर्वोच्च बक्षिसाने त्यांचा खिसा भरला. इतकी मोठी लॉटरी त्यांना आजतागायत कधी लागली नव्हती, त्याचे समाधान आहेच; पण हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने, त्यांचे काळीज चर्रर्र झाले असेल. चांगली सुरुवात करूनही, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला नाही, तर पराभव अटळ असतो, हा धडा पुन्हा त्यांच्यापुढे गिरवला गेला. स्पर्धेत अमेरिका, अफगाणिस्तान यांच्या अनपेक्षित कामगिरीसह आधी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज यांच्या संघर्षात दक्षिण आफ्रिका चिडीचूप होता. सायलेंट किलरसारख्या कत्तली करत होता. सामनागणिक त्यांचे धाडस वाढत होते. भारतासमोर मात्र ते खुजे ठरले. भारताने त्यांची घोडदौड रोखत, चोकर्सचा शिक्का त्यांच्या माथी पुन्हा मारला. दक्षिणी वादळात मोठमोठे संघ बेचिराख झाले असले, तरी भारत आपल्या निर्धाराशी
पक्का होता.
अंतिम सामन्यात इंटरव्हलपर्यंत आफ्रिकाच चित्रपटाचा हिरो होता; पण शेवटच्या ६ षटकांत आधी हार्दिक पांड्या आणि नंतर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग यांनी त्या जुन्या चित्रपटांतील हिरोंप्रमाणे आकस्मित एन्ट्री करत, आफ्रिकेला बुक्क्यांचा मार दिला. तोच खरा चित्रपटाचा क्लायमॅक्स ठरला आणि ताटात नाही तर चक्क घशात उतरलेला विजयाचा घास भारताने हिरावून घेतला. अचानक निराशेचे ढग मावळले आणि बुमराह, पांड्या, रोहित ही मंडळी करोडो चाहत्यांच्या हृदयमंदिरात जाऊन बसली. गंज पकडलेल्या विराटच्या या सामन्यातील एकमेव खेळीला भारतीय गोलंदाजांनी अजरामर केले. शेवटच्या १५ मिनिटांचा तो थरार श्वास रोखणारा होता. पण त्यानंतर भारतीय गोटात हर्षवायू झाला. सूर्यकुमार यादवने घेतलेला अविश्वसनीय झेल शो केसमध्ये फ्रेम करून ठेवण्यासारखा होता. ऋषभ पंतचा खेळ भल्या-भल्या खेळाडूंसाठी कॉम्प्लेक्स होता. अपघातानंतर पुनरागमन करत, विश्वचषकात त्याने दिलेले एफर्ट्स मनात घर करून गेले.
यष्टीच्या मागे टिपलेले निर्णायक झेल, काही मोजक्या खेळी हे अविश्वसनीय होते. विशेष म्हणजे रोहित शर्माचे नेतृत्व वाखाणण्याजोगे होते. बुमराहचा वापर त्याने अचूक केला. बुमराह म्हणजे शंभर नंबरी सोने आहे; पण त्या सोन्याला रोहितने विश्वचषकाच्या बाजारात मोत्याचा भाव मिळवून दिला. अक्षर पटेल, पंत, कोहली, पांड्या यांची संघातील गरज लक्षात आणून दिली. एकंदर या विश्वचषकाने टीम इंडियाचे स्वप्न साकार केले.
विजेत्यांचे जंगी स्वागत
संपूर्ण भारत एक करण्याचे सामर्थ्य क्रिकेट खेळात आहे. भारताने विश्वचषक उंचावल्यावर देशभर जल्लोष साजरा केला. एक कपिल, गावस्करचे युग होते, एक सचिनचे युग होते, एक धोनीचे युग होते, हे विराट-रोहितचे युग आहे. मरिन ड्राइव्ह ते वानखेडेपर्यंतच्या विजेत्यांच्या रॅलीमध्ये चाहत्यांच्या लाखोंच्या जनसागराने उपस्थित राहून, त्याची ग्वाही दिली. ‘रोको’ने समस्त भारतीयांना ‘न भूतो न भविष्यति’ असा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी दिली. मुंबईकरांनाही मग त्यात कमी नाही ठेवली. पावसाळी वातावरणातही आनंदात आपल्या लाडक्या खेळाडूंचे स्वागत पूर्ण जल्लोषात केले.
“डर मुझे भी लगा फासला देख कर, पर मैं बढ़ता गया रास्ता देख कर,
खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, मेरी मंजिल मेरा हौंसला देख कर…”
रोहितच्या विजयाचे वर्णन या ओळीत करता येईल. त्याची जिद्द, त्याचा हौसला पाहून विजय त्याच्या निकट आला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने १३ वर्षांचा दुष्काळ मोडीत काढला. पण ‘रो’ आणि ‘को’ दोघांनीही या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. ते म्हणतात ना, ‘Good things come to an end.’ त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची अवस्था ‘एका डोळ्यात हसू, तर एका डोळ्यात अश्रू’ अशी झाली आहे. ‘रोहित रोहित’, ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, ‘कोहली कोहली’च्या घोषणांनी वानखेडे दुमदुमून गेले होते. भारतीय क्रिकेटचा प्रवास हा जिद्दीचा प्रवास आहे आणि कर्णधार रोहितने आपल्या शिलेदारांच्या साथीने अशीच एक जिद्द पूर्ण केली. म्हणतात ना,
“जज्बा रखो जीतने का, क्युंकी किस्मत बदले न बदले,
पर वक्त जरुर बदलता है…!”