Wednesday, April 30, 2025

कोलाजसाप्ताहिक

ठाकूरद्वार येथील काळाराम मंदिर

ठाकूरद्वार येथील काळाराम मंदिर

मुंबईतील असलेल्या काळाराम मंदिराची मूर्ती या काळ्या पाषाणाची असल्याने, या मंदिराला काळाराम मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिराच्या घुमटात शंकराची पिंडी आहे. शंकराच्या पिंडीचे दर्शन श्रावणातील चार सोमवार, महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशीला भाविकांना दिले जाते.

कोकणी बाणा - सतीश पाटणकर

ठाकूरद्वार येथील काळाराम मंदिराचे खास आकर्षण म्हणजे येथे असलेल्या काळ्या पाषाणाच्या पुरातन मूर्ती. प्रभू श्रीराम यांच्या मांडीवर विराजमान झालेली सीतामाता असून बाजूला लक्ष्मण, शत्रुघ्न आणि परमभक्त हनुमान हेदेखील आहेत. त्या मंदिराच्या शेजारीच श्री वेंकटेश मंदिरदेखील अतिशय सुंदर आहे. राम मंदिराच्या बाजूलाच लागून, श्री स्वामी समर्थांचे छोटे मंदिरदेखील आहे. या मंदिराची उभारणी प्राचीन आणि सागवान लाकडाची असून जुन्या पद्धतीची प्रकाश योजना करण्यात आलेली आहे. श्रीरामांच्या गाभाऱ्यासमोरच या मंदिराची स्थापना करणारे, आत्माराम बुवा यांची समाधी आहे. कोकणातल्या एका गावात गरीब कुटुंबात एक मुलगा जन्माला आला.

त्याचे नाव आत्माराम. त्यांनी संपूर्ण देशाचे पर्यटन केले. शेवटी ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर आत्माराम यांची पाठारे प्रभू यांच्याशी ओळख झाली. दरम्यान भाऊचा धक्का ज्याने बांधला, ते भाऊ रसूल देखील आत्माराम बुवांचे भक्त बनले. मुंबईतील असलेल्या काळाराम मंदिराची जागा आत्माराम बुवांच्या पसंतीस पडली. त्या ठिकाणी भाऊ रसूल यांच्या मदतीने राम मंदिर बांधले. त्या मंदिरातील ग्रामपंचायतच्या मूर्ती आहेत. त्या काळ्या पाषाणाच्या असल्याने, या मंदिराला काळाराम मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. १८२८ मध्ये आत्माराम बुवांनी या राम मंदिराची स्थापना केली.

या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिराच्या घुमटात शंकराची पिंडी आहे. याच घुमटात १८०० मध्ये आत्माराम बुवा शिडीच्या सहाय्याने वरती जाऊन दिवस-रात्र तासन् तास ध्यानधारणा, तपश्चर्या करत. या शंकराच्या पिंडीचे दर्शन हे श्रावणातील चार सोमवार, महाशिवरात्री आणि वैकुंठ चतुर्दशीला भाविकांना दिले जाते. त्या दिवशी उत्सव असतो. मुंबईत अशी मंदिरे फार दुर्मीळच आहेत.

रामनवमी दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांची या मंदिरात दर्शनासाठी रीघ लागते. या मंदिराला पाच वर्षांनी २०० वर्षं पूर्ण होणार आहेत. रामनवमी दिवशी या मंदिरात साजरा होणारा रामांचा जन्मोत्सव पाहण्यासारखा असतो. पालखी निघते, भजने, कीर्तने होतात. दुपारी १२. ३९ रोजी प्रभू श्रीरामांच्या चांदीच्या बालरूपात असलेल्या मूर्तीला पाळण्यात घालून, राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Comments
Add Comment