नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy Rain)पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे किरकोळ किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या प्रतिकिलोसाठी टोमॅटोसाठी ८० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. बटाटे आणि कांद्यानंतर आता टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या किरकोळ किमती गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढल्या आहेत. तसेच पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यात व्यत्यय येत आहे.
हिमाचल प्रदेश हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. हिमाचल प्रदेशात ७ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. डोंगराळ राज्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचा थेट परिणाम रस्त्यांच्या जाळ्यावर आणि वाहतुकीवर होऊ शकतो. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकाचेही नुकसान होऊ शकते. म्हणजेच येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील टोमॅटोचो पुरवठा विस्कळीत
टोमॅटोच्या भावात अचानक वाढ होण्यासाठी मुसळधार पावसाला जबाबदार धरले जात आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक राज्यातील टोमॅटोचो पुरवठा विस्कळीत झाला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. खराब रस्त्यांच्या जाळ्यामुळे, हिमाचल प्रदेशातून अनेक किरकोळ बाजारपेठांमध्ये टोमॅटोचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे दरात वाढ होताना दिसत आहे.