Sunday, June 23, 2024
Homeमहत्वाची बातमीWeather Update : दक्षिण भारतात मान्सूनचे वारे; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा!

Weather Update : दक्षिण भारतात मान्सूनचे वारे; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा!

जाणून घ्या हवामान वृत्त काय म्हणते

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता मान्सून (Monsoon) अंदमानमध्ये धडकल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं आगमन कधी होणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच हवामान विभागाने (Meteorological Department) याबाबत महत्त्वाची माहिती देत काही राज्यांसाठी सावधानतेचा इशारा जारी केला आहे.

अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सून वाऱ्यांनी आता देश व्यापण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा वेग पाहता देशासह राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा 

मान्सूनचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ भागात उष्णतेची लाट कायम

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. तर, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगर भागामध्ये अधूनमधून सूर्य आग ओकणार असून, काही भागांमध्ये उकाडा जाणवणार आहे. तर सायंकाळच्या वेळी आभाळात पावसाळी ढगांचा खेळ पाहायला मिळू शकतो.

कुठवर पोहोचला मान्सून?

सध्या संपूर्ण देशात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांचा आणखी काही भाग व्यापणार आहे. त्याचबरोबर केरळच्या दक्षिण भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -