महाविकास आघाडीकडे दोन जागा जिंकण्याइतपतच संख्याबळ
मुंबई : राज्यसभेनंतर (Rajysabha) विधान परिषदेच्या (Vidhanparishad) ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर २ जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १६ जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती (Mahayuti) ९ जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे ११ जागांपैकी नऊ जागा जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चेबांधणी आखण्यास सुरुवात केली आहे.
भौगोलिक, सामाजिक समीकरण निकषावरच उमेदवारी दिली जाणार आहे. संघटनेतील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशकडे विधानपरिषदेची मागणी केली आहे. दरम्यान, या विधानपरिषदेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता भाजप श्रेष्ठी विधानपरिषदेची माळ कोणाकोणाच्या गळ्यात टाकतात ते पाहावे लागेल.
विधानपरिषदेसाठी भाजपात ३५ इच्छुकांचे अर्ज
विधानपरिषदेची जागा मिळवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशकडे आतापर्यंत ३५ जणांनी अर्ज केले आहेत. भाजपचे पाच उमेदवार निवडून येतील इतकी मते भाजपकडे आहेत, पण भाजपकडे आतापर्यंत ३५ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. भाजप प्रदेशकडे आलेल्या अर्जांवर पुन्हा एकदा कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे.
कार्यकाल संपलेले आमदार कोणते?
मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे.