ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावर उतणार : भुजबळ
आरक्षणासाठी बलिदान द्यावे लागले तरी चालेल : जरांगे
जालना : मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यावे लागले तरी चालेल पण मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा देणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही झाले तरी मराठा समाजाला न्याय मिळवून देणार, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तर मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला छगन भुजबळांनी केराची टोपली दाखवली आहे. माझे करिअर संपवणे किवा वाढवणे हे माझ्या पक्षाच्या हातात आहे. त्यापेक्षा ते जनतेच्या हातात आहे. त्यामुळे असले इशारे भुजबळला कुणी देवू नये. काही झाले तर हा भुजबळ ओबीसी समाजासाठी शेवटपर्यंत लढेल. रस्त्यावर उतरून लढेल, असे जोरदार प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी खंबीर भूमीका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. आता तर मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आले आहेत. काही झाले तरी ओबीसींच्या हक्कासाठी हा भुजबळ रस्त्यावर उतरणार, मागे हटणार नाही, असा जोरदार पलटवार भुजबळांनी केला आहे. त्यामुळे भुजबळ विरूद्ध जरांगे यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे.
जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या १० दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केले.
दरम्यान मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जावे. शिवाय ज्यांनी कुणबीचे खोटे दाखले घेतले आहेत त्यांच्यावर आणि दाखले देणारे यांच्यावरही कारवाई केली जाईल. ते दोघेही दोषी आहेत असे भुजबळ यावेळी म्हणाले. शिवाय मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून अनेक सुविधा मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत राज्यात सुरु असलेल्या मराठा ओबीसी वादावर भाष्य केले. ‘आरक्षण प्रश्नी भारतीय जनता पक्ष मराठा व ओबीसी समाजाची फसवणूक करत आहे,’ असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ५० टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही असे सांगत आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र ५० टक्क्याच्या वर आरक्षण देता येते असे म्हणत आहेत. भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये आरक्षणप्रश्नी दोन मते आहेत. आरक्षण प्रश्नी नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावे. ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण कोर्टात टिकणार नाही हे पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.