डॉ. नितीन मार्कंडेय हे एक प्रसिद्ध पशुवैद्यक तज्ज्ञ आहेत. डॉ. नितीन हे महाराष्ट्र शासनाच्या ‘गोसेवा प्रकल्प’, ‘गोहत्या बंदी’ व ‘गो-रक्षण’ या क्षेत्रात अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नितीन यांनी गोधनासंदर्भात एक सुंदर श्लोक सांगितला आहे,
“गोमये वसते लक्ष्मी:
गोमुत्रे धन्वतरी ||’’
ओंजळ – पल्लवी अष्टेकर
रातन काळापासून मनुष्य व प्राण्यांमध्ये परस्परांमधील अवलंबित्व भरपूर आहे. देवांचेही लाडके प्राणी व वाहने प्रसिद्ध आहेत. मानवामध्ये भूतदया राहावी, या दृष्टीने मानवाचे प्रयत्न चालू राहायला हवेत. वाढती लोकसंख्या, पशू-पक्ष्यांच्या काळजीसाठी लागणारे पशुवैद्यक तज्ज्ञ, शेतकरी, समाजसेवक यांची एकूणच समाजाला गरज आहे.
पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय यांच्याशी नुकतीच फोनवर गप्पा मारण्याची मला संधी मिळाली व त्यांच्यासोबत बोलताना मला एका वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाशी परिचय झाल्याची अनुभूती मिळाली. डॉ. मार्कंडेय हे एक प्रसिद्ध पशुवैद्यक तज्ज्ञ आहेत. त्यांचे बालपण मराठवाड्यातील एका लहानशा खेड्यात गेले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय आंबेजोगाई येथे स्थिरावले. त्यांची आई शिक्षिका व वडील बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागात नोकरीस होते. लहानपणापासून डॉ. नितीन यांना खेळणे, सूर्यनमस्कार, वक्तृत्व अशा गोष्टींची आवड होती. त्यांचे शालेय शिक्षण ‘भारतीय शिक्षण संस्कार प्रसारक’ या संस्थेत झाले व त्यानंतर महाविद्यालयासाठी त्यांनी परभणी येथील कॉलेजात प्रवेश घेतला. बारावीनंतर पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव झळकले. त्यांनी परभणी येथील ‘पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय’ येथे आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर त्यांनी यातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
डॉ. नितीन मार्कंडेय यांनी शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आपल्या खासगी सेवेचे कधी मूल्य आकारले नाही. गोरगरीब शेतकरी, पशुपालन करणारे, गुराखी यांच्यासाठी त्यांनी आपली खासगी सेवा मोफत ठेवली. एक प्रसंग डॉ. नितीन यांना आवर्जून आठवतो. उदगीर या गावी दर गुरुवारी पशुविक्रीसाठी बाजार भरत असे. एकदा डॉ. नितीन यांच्या दवाखान्यात अंदाजे ७० ते ८० वयातील एक म्हातारा एक म्हैस घेऊन आला. त्याने ती म्हैस गुरुवारच्या बाजारात खरेदी केली होती. जेव्हा त्याने ती घरी नेली, तेव्हा त्याचे व त्याच्या बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. कारण त्याच्या बायकोचे म्हणणे होते की, ही म्हैस कधी गाभण राहणार नाही. तेव्हा म्हातारा अक्षरश: केविलवाण्या परिस्थितीत दवाखान्यात म्हशीला घेऊन आला होता. डॉ. नितीन यांनी म्हशीची तपासणी करून, ती सहा महिन्यांची गाभण असल्याचे सांगितले. ते ऐकून म्हाताऱ्याच्या डोळ्यांत पाणी आले व “डॉ. तुम्ही माझा संसार वाचविला,” असे तो म्हणाला. त्याने डॉ. नितीन यांचे पाय धरले व तो समाधानाने घरी गेला.
डॉ. नितीन म्हणतात, “पाळीव प्राण्यांमध्ये मनुष्याला प्रेम लावण्याची क्षमता असते. किंबहुना मनुष्यच जास्त करून, त्यांच्याकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहतो. प्राण्यांकडून मिळणाऱ्या उत्पादनातून मानवाचा आर्थिक फायदा भरपूर असल्याने ‘पशुपालन’ याकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी दिवसेंदिवस वाढत आहे. पशुसंवर्धन व पशुविज्ञान या क्षेत्रात भरपूर काम करण्यासारखे आहे.” एक उदाहरण सांगताना, डॉ. नितीन म्हणतात, “एके दिवशी एका शेतकऱ्याने एका खिल्लार बैलाचा खरारा करताना खिल्लाराला जखम झाली, तेव्हा त्याने लगेच मान वळवून मागे पाहिले. त्यावेळी शेतकऱ्याला देखील खिल्लाराच्या जखमेची जाणीव झाली. एकदा प्राण्यांशी ऋणानुबंध जुळल्यानंतर, प्राण्यांच्या व्यथा मानवाला समजून येतात.
गेल्या २० वर्षांपासून आपला भारत देश दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमाकांचा आहे. अलीकडे भारतातून अमेरिकेकडे अमूल दुधाची निर्यात होते. भारत देशात नावाजलेल्या ५२ प्रकारच्या गोवंशीय जाती, तर १६ प्रकारच्या म्हशींच्या जाती आहेत. अंदाजे ३०० लक्ष पशुधन (गाय, म्हशी) भारतात आहेत.
गाईचे दूध अमृत आहे व मानवासाठी ते निरोगी व तब्येतीस हितकारक आहे.
डॉ. नितीन म्हणतात, ‘‘ए-१ हे संकरित प्राण्यांपासून मिळविलेले दूध आहे व ए-२ हे गाय, म्हैस व गाढवीण यांपासून मिळवलेले दूध आहे. ए-१ हे जास्त करून विदेशात वापरले जाणारे, तर ए-२ हे देशी दूध प्रकारात मोडते.” देशी दुधापासून प्राप्त होणारे पदार्थ जसे ताक, लोणी, तूप हे घटक मानवाच्या चलन-वलनासाठी उपयुक्त असतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती आढळते. ‘आयुर्वेदा’मध्येही वरील घटक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डॉ. नितीन हे महाराष्ट्र शासनाच्या ‘गोसेवा प्रकल्प’, ‘गोहत्या बंदी’ व ‘गो-रक्षण’ या क्षेत्रात अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच भारतीय तंत्रज्ञान संशोधन केंद्रात, पशू क्षेत्रात एक हजारपर्यंत उत्पादने आजवर तयार करण्यात आली आहेत.
शेणापासून रंग, सॅनिटरी उत्पादने इ. चा त्यात समावेश आहे, तरीही डॉ. नितीन यांच्या मते, अजून संशोधनाची गरज आहे. दूध व दुग्धजन्य उत्पादने यांची शहरी लोकसंख्येलाही तितकीच गरज आहे.
डॉ. नितीन यांनी गोधनासंदर्भात एक सुंदर श्लोक सांगितला आहे,
“गोमये वसते लक्ष्मी:
गोमुत्रे धन्वतरी ||’’
याचा अर्थ गाईच्या शेणात लक्ष्मीचे वास्तव्य असते, तर गोमूत्रात ‘धन्वतरी’ म्हणजे ‘औषधांचा देव’ असतो. भारतामध्ये अंदाजे ७० हजारांपर्यंत व्हेटरनरी (पदवीधर) डॉक्टर आहेत; परंतु ही संख्या नेहमीच कमी पडते. उदगीर या गावी
डॉ. नितीन यांचा ‘वन, न्याय’ या संदर्भात साक्षरता अभियानात सहभाग होता. तेव्हा त्या भागात पशुवैद्यकीय साक्षरता नव्हती. तेथील अनेक लोकांनी डॉक्टरांना पशू ज्ञानात भर टाकणारी पुस्तके लिहिण्याचा आग्रह केला; परंतु रूक्ष पुस्तके नकोत, असेही लोकांनी डॉक्टरांना सांगितले. तेव्हा त्यांच्या प्रेमाखातर डॉक्टरांनी दहा ते बारा पुस्तके लिहिली. त्यात पशुविज्ञान, पशुआरोग्य याविषयी मांडलेले आहे. डॉ. नितीन यांच्या कौतुकास्पद कामासाठी आजवर त्यांना तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अनेक पशुचिकित्सा शिबिरांमध्ये जंतनाशन तसेच शस्त्रक्रिया त्यांनी पार पाडल्या आहेत. अनेक मासिकांमध्ये व वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पशूविषयक मार्गदर्शक लेख लिहिले आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी संध्याकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत १० ते १२ पशुवैद्यक तज्ज्ञ ३० ते ४० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. यात चर्चा, संवाद, प्रतिक्रिया व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असतो. कोरोना काळात जेव्हा परस्परांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य नव्हते, तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे.
डॉ. ऑस्ट्रेलियात आपल्या मुलीकडे काही महिन्यांसाठी गेलेले असताना, त्यांच्या लक्षात आले की, तेथील अत्याधुनिक सुविधांमुळे पशुधनाची उत्पादकता जास्त आहे. त्या प्रमाणात आपल्या भाससरत देशात अजूनही याबाबत मर्यादा पडतात, असे डॉ. सांगतात. सच्च्या, कष्टाळू पशुवैद्यकीय तज्ज्ञांची सर्वत्र गरज असल्याचे ते सांगतात. मध्यंतरी ‘यशदा’ नावाचे शेतकरी, गुराखी लोकांसाठी एक मार्गदर्शनात्मक पुस्तक प्रसिद्ध झाले होते.
जनावरांची योग्य जपणूक, चारापाणी व लसी या गोष्टी कटाक्षाने पाळल्या गेल्या पाहिजेत. अनेक आपत्ती व्यवस्थापनांमध्ये डॉक्टरांचा सहभाग आहे. येऊ घातलेले पशुवैद्यक तज्ज्ञ, शेतकरी व समाज यांची मोठी जबाबदारी ‘पशु-संवर्धन व उपचार’ यात मोडते.
डॉ. नितीन, सर्वांना तुमचे भरभरून मार्गदर्शन मिळत राहो, ही ईशचरणी प्रार्थना.