पंकजा मुंडे यांनीदेखील दिली प्रतिक्रया; नाव न घेता जरांगेंना लगावला टोला
मुंबई : मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याकरता ओबीसी समाज (OBC) पेटून उठला होता. यासाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) व नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे ओबीसी नेते गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले होते. अखेर आज उपोषणाच्या दहाव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान, हे उपोषण आम्ही तात्पुरतं मागे घेतलं असून आमचा लढा सुरु राहणारच आहे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ”काल ओबीसी शिष्टमंडळासोबत आमची बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्री, इतर मंत्री सगळे होते. यावेळी चांगली चर्चा झाली. कुठल्याही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा, ओबीसी समाज आणि कोणावरही अन्याय होऊ नये, यावर आमची चर्चा झाली.”
पुढे ते म्हणाले, ”या बैठकीत अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलं आहे. यातच आज त्यांनी (लक्ष्मण हाके) शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो.”
पंकजा मुंडे यांनीही दिली प्रतिक्रिया
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ”लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना मी भेटले होते. त्यांच्या तब्बेतेची चौकशी मी वेळोवेळी करत होते. काल आमची बैठक झाली. बैठकीत आम्ही आमचे विचार मांडले. शिष्टमंडळाला आज पाठवण्यात आलं. चांगली गोष्ट आहे की, सरकारने दखल घेतली. सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल. या विषयाने आंदोलन स्थगित केलं असेल.”
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ”त्यांच्या मागण्या न्याय आहेत.” मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्या म्हणाल्या की, ”लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणात मला आदर आहे. त्यांची भाषा विचार यात त्यांनी कोणाला ललकारले नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून एक आदर वाटतो. बाकी कोण काय बोलतो यावर बोलायची गरज नाही.”