‘मुंज्या’च्या यशासाठी आदित्य सरपोतदारची थोपटली पाठ
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) मराठी कलाकार (Marathi artists) आणि दिग्दर्शकांचा (Directors) बोलबाला आहे. हॉरर-कॉमेडीपट ‘मुंज्या’ (Munjya) बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित केला आहे. अवघ्या ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ७० कोटींचा टप्पा गाठला आहे व अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणत आहे. मराठमोळ्या दिग्दर्शकाचं बॉलिवूडमधलं हे यश साजरं करण्यासाठी नुकतेच सर्व मराठी दिग्दर्शक एकत्र आले होते. या सक्सेस पार्टीसाठी बॉलिवूडमध्ये आपल्या दिग्दर्शनाची छाप सोडणाऱ्या मराठी दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) पुढाकार घेतला होता.
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘तानाजी’चे दिग्दर्शन ओम राऊतने केले होते. हा चित्रपट व त्यातील गाणी प्रचंड गाजली होती. तसेच ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’ या सिनेमानेही आपली वेगळी जादू दाखवली व त्याचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केलं होतं. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधवच्या सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ताली’ वेब सिरीजने देखील चमकदार कामगिरी केली. या सगळ्याचं यश सेलिब्रेट करण्यासाठी ओम राऊतने एक गेट टूगेदर आयोजित केलं होतं. या गेट टूगेदर दरम्यानचे काही खास क्षण रवी जाधवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
रवी जाधव यांची पोस्ट काय?
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अविनाश अरुण, आदित्य सरपोतदार, समीर विद्वांस, निपुण धर्माधिकारी, लक्ष्मण उतेकर, ओम राऊत, निखिल महाजन, राजेश म्हापुसरकर, तेजस,देऊस्कर, ज्ञानेश झोटिंग, जयप्राद देसाई, रवी जाधव ही मंडळी दिसत आहेत. या सगळ्यांनीच बॉलीवूडमध्ये तोडीस तोड काम केलं आहे. या फोटोला कॅप्शन देत रवी जाधव यांनी म्हटलं की, ‘काल मराठी सिनेमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि आता हिंदी चित्रपट, वेब सिरीजमध्येही उत्तम कामगिरी करणाऱ्या मराठी दिग्दर्शकांनी एकत्र येऊन आदित्य सरपोतदार यांचे त्यांच्या तुफान हिट चित्रपट ‘मुंज्या’साठी अभिनंदन केले. युनायटेड कलर्स ऑफ मराठी डिरेक्टर्स’ ची ही केवळ सुरूवात आहे! ओम राऊत धन्यवाद या initiative साठी. नागराज मिस यू’. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत या सगळ्या दिग्दर्शकांचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram