Sunday, June 23, 2024
Homeताज्या घडामोडीUjani Boat Accident : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडालेली बोट अखेर १७...

Ujani Boat Accident : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडालेली बोट अखेर १७ तासांनंतर सापडली!

बुडालेल्या सहा जणांची नावे समोर मात्र सर्वजण बेपत्ता; मृत्यू झाल्याची शक्यता

सोलापूर : इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येताना वादळी वाऱ्याने बोटीचा (Solapur Ujani Boat) अपघात झाला. काल संध्याकाळच्या सुमारास उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये प्रवासी बोट बुडून (Ujani Dam Backwater Boat Accident) सहा जण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली. १७ तासांनंतर ही बोट सापडली आहे. ३५ फूट पाण्यात तळाशी ही बोट सापडल्याची माहिती समोर आली आहे, मात्र बुडालेले प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. एनडीआरएफकडून (NDRF) त्यांचा शोध सुरु आहे. बराच काळ लोटल्याने प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त होत आहे.

काल सायंकाळी सहाच्या दरम्यान उजनी जलाशयात जलवाहतूक करणारी बोट पाण्यात बुडाली होती. बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावाचा काठ गाठला. ते पोहत बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आणि त्यानंतर बचावकार्य सुरु झालं. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी पोहोचलं आहे आणि स्थानिक बोटींच्या मदतीने शोध सुरु करण्यात आला आहे. १७ तासांनंतर बोट सापडली आहे, मात्र प्रवाशांना शोधण्यात यश आलेले नाही.

आमदार खासदारांनी केली पाहणी

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणी आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासकीय अधिका-यांकडून अगोदर घटनेचा आढावा घेतला व ते NDRF टीमसोबत जलाशयात उतरले. सध्या शोधमोहीम सुरु आहे.

पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे समोर

दरम्यान, या बोटीत करमाळा तालुक्यातील झरे येथील एक दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले, कुगाव येथील एक तरुण, एक बोट चालक आणि राहुल डोंगरे नावाचे पोलीस उपनिरीक्षक होते. या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३० वर्षे), कोमल गोकुळ जाधव (वय २५ वर्षे), शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३ वर्षे) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय ३५ वर्षे), गौरव धनंजय डोंगरे (वय १६ वर्षे, दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -