Sunday, June 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअर्जुनाच्या रथावरील ध्वजावर हनुमंत विराजमान

अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर हनुमंत विराजमान

विशेष – भालचंद्र ठोंबरे

त्रेतायुगात राम अवतारात रामाचा असीम भक्त हनुमंताने रामाच्या कृपेने अचाट कृत्य करून युद्ध प्रसंगी रामाला मदत केली. राम अवताराच्या समाप्तीच्या वेळी रामाने हनुमंताला चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे अश्वस्थामा, बळीराजा, व्यासमुनी, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम यांच्यासह हनुमानाचेही पृथ्वीवर कायम वास्तव्य असते असे मानले जाते.

द्वापार युगात प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण रूपात आहे ते समजताच हनुमंत त्यांना भेटले. श्रीकृष्णाच्या एका लीलेमध्ये महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथासवरील ध्वजावर युद्ध समाप्तीपर्यंत आरूढ होते.
‘‘आनंद रामायणात’’ या संदर्भात एक कथा आहे.

एकदा रामेश्वरच्या ठिकाणी अर्जुन व हनुमंताची भेट होते. रामचंद्रांनी वानरांच्या साहाय्याने समुद्रात सेतू बांधून लंकेत प्रवेश केला व रावणाचा वध केला. हे हनुमंताकडून कळताच अर्जुनाने हनुमंताला म्हटले, राम जर महान योद्धा होते तर समुद्रावर दगडी सेतू बांधण्याची काय गरज होती? बाणांच्या साहाय्याने पूल नसता का करता आला? तेव्हा अशा बाणांचा पूल वानरसेनेचा भार सहन करू शकला नसता. असे हनुमंताने उत्तर दिले. त्यावर मी जर त्या ठिकाणी असतो तर बाणांचा पूल तयार केला असता जो मजबूत असता व सर्व वानर सेनेचा भार ही सांभाळू शकला असता असे अर्जुन म्हणाला. अर्जुनाच्या बोलण्यातून तो द्वापार युगातील श्रेष्ठ धनुर्धर असल्याचा अभिमान व्यक्त होत होता तसेच त्याच्या या गर्वोक्तिपूर्ण विधानातून प्रभू रामचंद्राला कमी लेखण्याची भावना व्यक्त होत आहे, असे हनुमंताला जाणवले. तेव्हा समोर असलेल्या तलावाच्या तीरावर बाणाच्या साहाय्याने अर्जुनाने पूल निर्माण करावा तो पूल हनुमंताच्या भाराने तुटला तर अर्जुनाने अग्नी प्रवेश करावा व न तुटला तर हनुमंत स्वतः अग्निप्रवेश करेल असे त्यांच्यात ठरले. अर्जुनाने बाणाच्या साहाय्याने पूल तयार केला. हनुमंत त्यावेळेस सामान्य रूपात होते. त्यांनी आपले विशाल रूप धारण केले व बाणाच्या पुलावर एक पाय देताच पूल करकरला. दुसरा पाय देतात तो मोडकळीस आला. ते पाहताच अर्जुनाचा चेहरा उतरला.

हनुमंताने तिसरे पाऊल टाकताच तलावातील पाणी अचानक रक्तवर्ण झाले. हे पाहून हनुमंत परतले. पूल कमकुवत झाला; परंतु पूर्णपणे तुटला नाही असे वाटल्याने हनुमंताने अग्नी प्रवेश करण्याचे ठरविले. अर्जुनाला अग्नी पेटवण्यास सांगून हनुमंत अग्नी प्रवेश करणार तोच भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले आणि हनुमंताला म्हणाले “वत्सा, थांब ! तुझ्या पहिल्याच पावलात पूल खिळखिळा झाला होता, तो तुटणार हे लक्षात येताच मी खालून कासवाच्या रूपात पुलाला आधार दिला अन्यथा तो तुटलाच असता तरीही तुझ्या दुसऱ्या पावलाने तो डळमळलाच. तिसऱ्या पावलामुळे मला इजा होऊन माझ्या पाठीतून रक्त वाहू लागले. हे ऐकून हनुमंताला फार वाईट वाटले. आपल्यामुळे आपल्या भगवंताला इजा झाली हे पाहून ते अत्यंत व्यथित होऊन भगवंताला क्षमायाचना करू लागले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले “अरे हे सर्व माझ्याच इच्छेने झाले आहे. त्यामुळे तुला दुःख करण्याचे कारण नाही तू शोक करू नकोस; परंतु आता तुला एकच सांगणे आहे यापुढे येणाऱ्या महाभारतातील महायुद्धात तू अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर आरूढ व्हावे “ हनुमंताला आपल्या प्रभूचे म्हणणे शिरसावंद्य होते. अशाप्रकारे श्रीकृष्णाच्या आज्ञेने हनुमंत पूर्ण युद्ध समाप्तीपर्यंत अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर आरुढ होते.

तात्पर्य – अर्जून आपला प्रिय सखा असूनही अर्जुनाचे गर्वयूक्त वागणे श्रीकृष्णाला आवडले नाही आणि एकाच घटनेतून अर्जुनाचे गर्वहरण करून हनुमंताला अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर आरूढ करण्याची किमया
भगवंतांनी साधली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -