Sunday, June 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसंस्कृती आणि मानवी जीवन

संस्कृती आणि मानवी जीवन

विशेष – लता गुठे

जेव्हा साहित्याचा अभ्यास करू लागले तेव्हा लक्षात आलं कोणतीही कला असो वा साहित्य ते नवनिर्मितीचे स्रोत आहेत. मग ती चित्रकला असेल किंवा शिल्पकला. त्या कला निर्माण करणारा कलाकार / साहित्यिक हा समाजात घडत असतो. तो ज्या समाजात राहतो, ज्या धर्मामध्ये जन्मतो त्या धर्माचे संस्कार त्यावर होत असतात. तो ज्या परिस्थितीत वाढतो ती परिस्थिती त्याचे विचार तयार करते. विचार हे आचारनानुसार बदलतात. जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. त्यानुसार त्या व्यक्तीची जडणघडण होते. त्यांचे वर्तन व्यवहारात निदर्शनास येते. त्या व्यक्तीची कला चांगली की वाईट आहे हे समाज ठरवितो.

पाश्चात्य फ्रेंच विचारवंत इप्पोलित तेन याने मांडलेले विचार मला याबाबतीत अत्यंत महत्वपूर्ण वाटतात. त्यांच्या मतानुसार कोणताही कलाकार जी कला निर्माण करतो किंवा जे साहित्य लिहितो त्या त्याच्या कार्य कर्तृत्वामागे समकालीन जीवनपद्धतीचे प्रतिबिंब उमटलेले असते. विविध लेखकांचे लेखन विचारात घेतले तर त्यांची विचारशक्ती, अविष्काराची पद्धती यामध्ये फरक असला तरी काही विचार, दृष्टीकोन, कल्पना, भावनासुत्रे यामध्ये साम्य आढळते. याचे कारण म्हणजे प्रत्येक मानवसमूहाची एक स्वतंत्र मानसिक संरचना विकसित झालेली असते. आणि त्यातूनच या मानवसमूहाचे बौद्धिक आणि मानसिक गुणविशेष निष्पन्न होत असतात. तेनच्या मते ही मानसिक संरचना विकसित होण्यास वंश, काळ, परिस्थिती हे घटक कारणीभूत ठरतात.

माणूस जन्माला येताना त्या त्या वंशाचे अनेक गुणधर्म घेऊन जन्माला येतो. म्हणजे डोळ्याचा रंग बुद्धिमत्ता काही आजार वगैरे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो हा कोणावर गेला असेल? बरेच मुलं आजी आजोबांसारखे दिसतात. अनुवांशिकरित्या त्याला वंश प्राप्त होत असतो. वंशपरत्वे मिळणारे गुणधर्म हे मानसिक आणि शारीरिक घडणीच्या वेगळेपणात एकत्रित झालेले असतात. निरनिराळ्या मानवसमूहात ते निरनिराळे असतात. भिन्न वंशाच्या लोकांना समाजात ज्या प्रकारचे अनुभव येतात त्याबद्दल त्यांच्या मनात जे विचार आकार घेतात. त्यात वंशपरत्वे भिन्नता आढळते. अनेकदा मानवसमूहाच्या वंशपरत्वे साहित्याच्या स्वरूपातही फरक आढळतो. उदा. निग्रोंचे साहित्य. कोणतीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एकच माता पित्याची दोन मुलं ही भिन्न असतात. प्रत्येकाची कुवत वेगळी असते आचारविचार वेगळे असतात. त्यानुसार त्या व्यक्ती आपले वर्तन करतात.‌

प्रत्येक वंशामध्ये काळानुसार अनेक बदल होत जातात. यालाच युगप्रवृत्ती असेही म्हटले जाते. विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत साहित्यावर विशिष्ट प्रकाराचा विचारपद्धतीचा प्रभाव आढळतो. उदा. वारकरी संप्रदायांमध्ये मांसाहार वर्ज्य समजला जातो. त्यांची पुढची पिढी जर परदेशात किंवा इतर ठिकाणी स्थायिक झाली तर ते मांसाहार करतात. त्यामुळे काळानुसार गुणवैशिष्ट्येही बदलतात. बदलाची कारणे त्या काळाच्या सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत आढळतात. उदा. प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याचा इतिहास जर पाहिला तर त्यामध्ये हे बदल झालेले लक्षात येतात.

आणि तिसरी गोष्ट म्हणजे माणूस बदलतो तो परिस्थितीनुसार. माणसांच्या जडणघडणीमध्ये भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणाचा फार मोठा वाटा असतो. एकाच वंशाच्या मात्र भिन्न भिन्न भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांच्या स्वभावात आणि प्रवृत्तीत फरक आढळतो. हाच फरक त्यांच्या कलेच्या साहित्याच्या किंवा सामान्य माणसाच्या अभिव्यक्तीतून प्रत्ययास येतो. उदाहरणार्थ कोकणात जन्मलेले आणि त्या वातावरणात राहिलेले आरती प्रभू यांच्या साहित्यामध्ये कोकणातील निसर्ग तेथील लोकांचे सुखदुःख आलेले आहे. तसेच जळगावच्या परिसरात राहिलेले ना. धो. महानोर यांच्या साहित्यात त्या परिसरातील लोकजीवनाचा परिचय होतो. अशाप्रकारे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक घडणीवर विशेष लक्ष देऊन त्याचे साहित्यात उमटणारे प्रतिबिंब अभ्यासण्याचा प्रयत्न तेनने केलेला आहे.

आपण नेहमी म्हणतो गवायाचं पोर गवई होणार. तसेच पूर्वी सुतार, चांभार, लोहार यांचे पिढ्यानपिढ्या व्यवसाय तेच होते. परंतु परिस्थितीत बदल झाला. पुढच्या पिढ्या शिकल्या. त्या शहरात जाऊन नोकऱ्या करू लागल्या. अशाप्रकारे काळानुसार माणसाच्या व्यक्तिमत्व त्याच्या विचारात आचरणात बदल होतो. परंतु काही बाबतीत संस्कृती आणि संस्कार यामध्ये खूप संथ गतीने बदल झालेला जाणवतो. कुळाचार हे माणसाच्या लहानपणीच मनावर बिंबवलेले असतात. ते आचरणातून आत्मसात होतात आणि पुढच्या पिढीकडे आपोआप त्यांचे संक्रमण होते. उदाहरणार्थ कोकणातील मुंबईत राहणारी माणसं होळी गणपतीला आवर्जून कोकणात गावी जातात.

संस्कृती या शब्दामध्ये सम हा उपसर्ग आणि कृ हा संस्कृत धातू आहे. संस्कृतीचा अर्थ सर्वसमावेशक कृती असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार. देश कोणताही असो धर्म कोणताही असो त्या देशाला त्या धर्माला संस्कृती असते. संस्कृती शिवाय माणसाचं जीवन सुपीक होणार नाही.

जेव्हा परकीय आक्रमण होतात त्यावेळेला जे राज्यकर्ते असतात त्यांची संस्कृती आधीच्या मूळ देश वाशीयांच्या संस्कृतीमध्ये मिसळते. खानपान आणि राहणीमान यामध्ये बदल होतात. आपल्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, भारतीय संस्कृतीने सिंधू संस्कृतीनुसार  जन्माला आलेले तसेच  वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या काळात तसेच भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशाच्या वसाहती दरम्यान झालेले बदल पचवून देखील स्वतःचे परंपरागत प्राचिनत्व टिकवून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे. या समग्र बदललेल्या परिस्थितीचे पडसाद साहित्यात उमटतात. मंदिरे शिल्पकला, नृत्य, चित्रकला यामध्येही त्या काळाच्या परिस्थितीच्या सांस्कृतिक सामाजिक जाणीव आलेल्या असतात. कालांतराने त्याच कला मागील काळाचे अवशेष जिवंत ठेवतात.

भारतात  जागोजागी वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. वैदिक साहित्य हे भारतीय संस्कृतीचे मूळ साधन ग्रंथ आहेत. भारतीय संस्कृती समजून घेताना या धार्मिक साहित्याचा उपयोग होतो. वैदिक साहित्यामध्ये प्रामुख्याने वेदांचा, उपनिषदांचा, आरण्यक ग्रंथ यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आणि या सर्व गोष्टीच्या केंद्रस्थानी असते ते मानवी जीवन.

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून तसेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वतःचा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही  संस्कार  करून स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणतो. हा बदल प्रत्येक व्यक्तीच्या विचारानुसार होत असतो. माणसाच्या कर्मानुसार त्याचे जीवनमान बदलते. अशाप्रकारे माणसांच्या जडणघडणीमध्ये अनेक गोष्टीचा सहभाग असतो. म्हणूनच असं म्हणावसं वाटतं की, विचार बदलला जीवनाची दिशा बदलते पाणी दिशा बदलली की दशा बदलते. प्रत्येक ढगाला एक सोनेरी किनार असते कलाकाराच्या बाबतीत मात्र असे म्हटले जाते कलाकार जन्मावा लागतो तो तयार होत नाही. जन्मताच माणसांमध्ये काहीतरी गॉड गिफ्ट असते जर ते गॉड गिफ्ट काय आहे हे ओळखले तर त्याला पैलू पाडून अभ्यासपूर्ण संस्कार करता येतात. आणि तीच व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी काहीतरी नवनिर्मिती करते. आणि त्यातून कलाकार साहित्य जन्म घेतो. म्हणूनच म्हणावसं वाटतं… प्रत्येक ढगाला एक सोनेरी किनार असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -