नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
‘दो बदन’ हा राज खोसला यांचा १९६६ सालचा सिनेमा. मनोजकुमार, आशा पारेख, सिम्मी गरेवाल आणि प्राणबरोबर यात होते, मनमोहन कृष्णा, मोहन चोटी, धुमाळ, बिरबल, ललिताकुमारी, मृदुला राणी आणि उमा खोसला. सिनेमा चांगलाच चालला. त्याला एकूण तीन फिल्मफेयर नामांकनेही मिळाली! सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचे नामांकन लतादीदीला, सर्वोत्कृष्ट संगीतकाराचे रवीजींना, तर सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून शकील बदायुनी यांना! अर्थात ही फक्त नामांकने होती. त्या वर्षीची सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्री मात्र ठरली ती सिम्मी गरेवाल!
‘दो बदन’ मागची कथा अशी – एकदा मनोजकुमारने दिलीपकुमार, अशोककुमार आणि नर्गिसचा ‘दीदार’(१९५१) पाहिला आणि त्याला तो आवडल्याने त्याने तो पाहण्याचा आग्रह राज खोसलाना केला. दोघांनी तो पाहिल्यावर जी. आर. कामत यांच्याकडून ‘दो बदन’साठीची कथा लिहून घेतली गेली आणि सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली.
विकास (मनोज) एक होतकरू मात्र गरीब कॉलेजकुमार श्रीमंत आशाच्या (आशा पारेख) प्रेमात पडतो. ऐन परीक्षेच्या वेळी वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्याला आशाशी लग्न करायचे असल्याने नोकरीची गरज असते. ती त्याला वडिलांच्या व्यवसायातच नोकरी मिळवून देते.
मात्र श्रीमंत बापाच्या एकुलत्या एक मुलीवर डोळा ठेवून बसलेल्या अश्विनला (प्राण) दुर्दैवाने आशा आणि विकासाच्या प्रेमाबद्दल कळते. तो ती गोष्ट जेव्हा तिच्या वडिलांना सांगतो तेव्हा ते अस्वस्थ होतात. आपल्या मुलीचे लग्न प्राणशीच लावायचे त्यांच्या मनात असते.
आशाचे वडील मग एक पार्टी आयोजित करतात. त्या पार्टीचे निमंत्रण विकासलाही पाठवले जाते. पार्टीत विकासाचे स्वागत स्वत: करून ते त्याचा परिचय इतर पाहुण्यांशी करून देतात. प्रत्येक पाहुण्याशी परिचय करून देताना मात्र ते त्याचा जिव्हारी लागेल असा अपमान करतात. त्याला आणि आशाला ‘आपले प्रेम यशस्वी होईल’ अशी थोडीही आशा राहू नये असाच त्यांचा प्रयत्न असतो. त्याच पार्टीत ते ‘आशाचे लग्न अश्विनशी होणार असल्याचे’ जाहीर करून टाकतात. आशाचे विकासवर मनापासून प्रेम आहे हे माहीत असल्याने त्याला आपल्या मार्गातून कायमचे दूर करण्यासाठी अश्विन त्याचा अपघात घडवून आणण्याचा कट रचतो. अपघात होतो मात्र सुदैवाने त्यातून विकास वाचतो. अपघातात त्याची दृष्टी मात्र जाते. आशाला लग्नासाठी तयार करण्याकरिता प्राण तिला ‘विकास अपघातात मरण पावला आहे’ असे खोटेच सांगतो. नाईलाजाने ती लग्नाला तयार होते.
दरम्यान विकास गायक बनला असून एका हॉटेलमध्ये नोकरी करतो आहे. एक दिवस अचानक अश्विन आणि आशा त्याच हॉटेलमध्ये येतात आणि गाणे म्हणताना त्याला पाहून आशा अतिशय दु:खी होते. तिचा आवाज ऐकल्यावर विकासला तिची उपस्थिती जाणवते. तो तिला हाक मारतो. प्राण तिला जबरदस्तीने ओढून रूममध्ये घेऊन जातो.
जेव्हा ‘विकासबद्दल मला खोटे का सांगितलेस, तुला तर सगळे माहीत होते’ असा जाब आशा अश्विनला विचारते तेव्हाचा त्यांच्यातील संवाद मोठा सुंदर होता. अश्विन म्हणतो, ‘मुझे सिर्फ इतना मालूम हैं की मुझे तुमसे प्यार हैं और तुम्हे पाने के लिये मुझे कुछ भी कर लेना चाहिये था.’ यावर आशा जे उत्तर देते ते आजच्या पिढीला कुणीतरी समजावून सांगायला हवे आहे. ती म्हणते, ‘जो ‘पा लेनेको’ प्यार कहता हैं उसे हजारो, लाखो जनम लेने पडेंगे, प्यारका मतलब समझनेके लिये.’
कथेत अनेक योगायोग घडून शेवटी दोघांची भेट होते. मात्र आत्यंतिक निराशेने त्यावेळीच आशा मरण पावते. ते पाहून विकासलाही अतीव दु:ख होते. तोही तिच्याशेजारीच प्राण सोडतो. अशी ही शोकांतिका प्रेक्षकांना खूप भावली होती. कारण त्यावेळी समाजाला चंगळवादाची आज इतकी लागण झालेली नसल्याने शोकांतिकासुद्धा लोकप्रिय होत असत.
शकील बदायुनी यांनी लिहिलेली सर्वच गाणी खूप लोकप्रिय झाली. त्यात ‘नसीबमे जिसके जो लिखा था वो तेरी मेहफिलमे काम आया, किसीके हिस्सेमे प्यास आयी; किसीके हिस्सेमे जाम आया’, भरी दुनियामे आखिर दिलको समझाने कहां जाये,’ ‘लो आ गयी उनकी याद, वो नही आये,’ ‘जब चली थंडी हवा, जब उठी काली घटा; मुझको ए जाने वफा तुम याद आये.’
महंमद रफीजींनी रवीच्या संगीत दिग्दर्शनात गायलेले ‘रहा गर्दीशोमे हरदम मेरे इश्कका सितारा’ चांगलेच लोकप्रिय झाले. शकील बदायुनी यांचे त्या गाण्याचे शब्द प्रेमाची बाजी हरलेल्या लाखो हृद्यांना रडायलाही लावतं आणि फुंकर घालून दिलासाही देत. आशा आपल्याच हॉटेलात आहे हे माहीत नसलेल्या मनोजकुमार गातोय ते गाणे योगायोगाने त्या दोघांच्या शोकांतिकेबद्दल असते –
‘रहा गर्दिशोंमें हरदम,
मेरे इश्क़का सितारा
कभी डगमगाए कश्ती,
कभी खो गया किनारा
रहा गर्दिशोंमें हरदम…’
तो जणू स्वत:शीच बोलताना म्हणतो आहे, ‘माझ्या नशिबातले ग्रहच असे होते की माझ्या प्रेमाला कधी स्थिरता मिळालीच नाही. प्रेमाची नाव कधी डगमगत राहिली, तर कधी तिला किनारा मिळालाच नाही.’ दु:खाच्या भरात विचार करताना त्याला प्रश्न पडतो, ‘असे कसे हे प्रेमाचे खेळ की, मी प्रत्येक पावलावर हारत गेलो आणि माझी प्रिया मात्र प्रत्येक बाजी जिंकतच गेली.’ ‘हे माझेच दुर्दैव नाहीतर काय की मी कोणताही विचार न करता मनोभावे तिचाच होऊन गेलो जी कधीही माझी होणार नव्हती, होऊ शकली नाही.’
‘कोई दिलके खेल देखे,
के मोहब्बतोंकी बाजी,
वो कदम कदम पे जीते,
मै कदम कदम पे हरा!
रहा गर्दिशों में हरदम…’
‘यह हमारी बदनसीबी,
जो नहीं तो और क्या है?
के उसीके हो गए हम,
जो ना हो सका हमारा
रहा गर्दिशोंमें हरदम…’
प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात सगळे दिवस फुलपाखरासारखे उडत उडत निघून जात असतात; परंतु माणसाला जेव्हा जीवनातील रखरखीत वास्तवाला सामोरे जावे लागते तेव्हा मात्र सगळे क्षणात उद्ध्वस्त होऊन जाते. सगळे जगणेच अर्थशून्य होऊन बसते.
‘पड़े जब गमोसे पाले,
रहे मीटके मिटनेवाले,
जिसे मौतने ना पूछा,
उसे जिंदगीने मारा!
रहा गर्दिशों में हरदम…’
या शेवटच्या ओळी ऐकताना आपल्याला हमखास सुरेश भटांची एक कविता आठवते. त्या कवितेत सुरेशजी म्हणतात-
‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.’
आणि इकडे शकीलजी म्हणताहेत, ‘जिसे मौतने ना पुछा, उसे जिंदगीने मारा’ ज्यांना मृत्यूनेही नाकारले त्यांचा शेवट मग जीवनानेच करून टाकला! ते दुर्दैवी लोक जिवंत राहिले पण असे की त्यांचे जगणेही मृत्यूपेक्षा अर्थशून्य झाले होते.
असंख्य लोकांच्या जीवनातील यशापयशाबद्दल किती हळुवारपणे रचलेल्या या रचना. आयुष्यात अनेकदा केवढा तरी दिलासा देऊन जातात. म्हणून ऐकायची ही सोन्यासारखी जुनी गाणी!