Sunday, June 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजदिल्लीत जायची संधी हुकल्याने भुजबळ वैफल्यग्रस्त

दिल्लीत जायची संधी हुकल्याने भुजबळ वैफल्यग्रस्त

मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, ही भुजबळांची खरी पोटदुखी तर आता अजित पवारांनी फसवल्याने सुरु आहे मळमळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

छगन भुजबळ कोणत्या संदर्भात बोलले हे समजले नाही. भुजबळांनी या विषयावर बोलण्याचे कारण काय? भुजबळांनी नाशिकमध्ये मोठी नॉलेज सिटी काढली, पण त्यांचे नॉलेज कमी आहे. १९९३ साली १७ ते १८ आमदार घेऊन भुजबळ पहिल्यांदा बाहेर पडले. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भुजबळांनीच पहिल्यांदा केले. बाळासाहेबांना टी. बाळू बोलण्याची सुरुवात भुजबळांनी केली. बाळासाहेबांचे वय न पाहता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. कोणत्या तोंडाने भुजबळ राज ठाकरेंवर आरोप करत आहेत? असा रोखठोक सवाल मनसे नेते प्रकाश महाजन यांनी विचारला आहे. तसेच भुजबळांनी आता तरी खरे बोलावे. दिवंगत नेते मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, ही भुजबळांची खरी पोटदुखी होती, असा मोठा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

तुमचे रक्ताचे नाते आहे. माझे आणि बाळासाहेबांचे तर मतभेद झाले. पण राज ठाकरेंचे काय? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचे होते की, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग तुम्ही वेगळे व्हायचे कारण काय? तुमची काय मागणी होती, ते लोकांना सांगा. राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला. शिवसेना सोडून त्यांनी चूक केली, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. या टीकेचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

शिवसेनेत कधीही जात पाहिली जात नव्हती. मंडल आयोगाचा विषय पुढे करण्याचे कोणतेही कारण नव्हते. भुजबळ वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांची सद्सदविवेकबुद्धी हरवली आहे. लोकसभेला शब्द देऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता राज्यसभाही गेली. प्रचंड माया जमवल्यामुळे त्याच्या केसेस सुरू आहेत. त्यामुळे ते आता राज ठाकरे यांच्यावर बोलले, या शब्दांत प्रकाश महाजन यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी कधीही पक्ष फोडायचे काम केले नाही. त्यांचे काही तात्विक आणि अंतर्गत मतभेद झाले. बाळासाहेबांना हे मतभेद सांगून त्यांचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरे बाहेर पडले. कुणालाही बाहेर पडून नवा पक्ष काढण्याचे स्वातंत्र्य आहे. पण भुजबळांना आता विषय काढण्याचे कारण काय होते? शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना ज्या माणसाने अटक केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले, अशा आशयाचे विधान राज ठाकरे यांनी केले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिले. माझ्यासमोर जी फाईल आली ती फाईल होम डिपार्टमेंट म्हणून माझ्याकडे आली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा आम्ही सांगितले होते की, श्रीकृष्ण कमिटीचा जो अहवाल आहे, त्याची आम्ही अंमलबजावणी करु. त्यानंतर कारवाई केली होती. माझ्यापुढे तेव्हा मार्गच नव्हता, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र रचलं ते भुजबळांना माहिती नाही का?

संदीप देशपांडे यांचा छगन भुजबळांवर हल्लाबोल!

छगन भुजबळांनी केलेल्या विधानावर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर यावरून थेट भुजबळांना इशाराच दिला आहे. “राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं की माझा वाद विठ्ठलाबरोबर नसून आजूबाजूच्या बडव्यांबरोबर आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना का सोडली हे स्पष्ट आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र रचलं ते भुजबळांना माहिती नाही का?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“छगन भुजबळ हे स्वत: राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्याविरोधातील षडयंत्राचा व्यापक भाग होते. भुजबळ कदाचित हे विसरले असतील. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली या गोष्टी छगन भुजबळांनी बोलू नयेत. आम्ही जर त्या वेळी काय घडलं हे सगळं सांगितलं, तर भुजबळ अडचणीत येतील”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -