Sunday, June 23, 2024
Homeक्राईमPune crime : पुण्यात चाललंय काय? दारूसाठी पैसे न दिल्याने नशेखोरांनी केली...

Pune crime : पुण्यात चाललंय काय? दारूसाठी पैसे न दिल्याने नशेखोरांनी केली वृद्धाची हत्या

आरोपींमध्ये यापूर्वीही हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी (Pune crime) दिवसेंदिवस वाढतच चालली असून अनेक चित्रविचित्र घटना समोर येत आहेत. कधी खून, कधी अपघात, कधी गोळीबार तर कधी कोयता गँगची दहशत या घटनांमुळे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याला कलंक लागला आहे. त्यातच आता पुण्याच्या उच्चभ्रू औंध (Aundh) परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुसाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने नशेखोर (Drunkards) तरुणांच्या एका टोळक्याने निष्पाप वृद्धाची डोक्यात रॉड घालून हत्या (Murder) केली. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

समीर रॉय चौधरी (Sameer Roy Choudhury) असं हत्या झालेल्या ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव असून ते टाटा कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले आणि परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेल्या चार जणांची टोळी बाहेर पडली होती. या टोळीला आणखी दारू हवी होती आणि त्यासाठी पैसे हवे होते. त्यासाठी या टोळीने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले.

दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळीने समीर रॉय चौधरी यांना गाठले. टोळीने त्यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या टोळीने समीर रॉय चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान काल रात्री त्यांचा मृत्यू झाला.

आणखी दोघांवर केला होता हल्ला

या प्रकरणी श्रेयस सतीश शेट्टी (वय ३०, रा. अश्विनी सोसायटी, औंध रस्ता, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेट्टी हे गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता सायकलवरून मोबाईल शॉपी रस्त्यावरून जात होते. मोबाईल शॉपीजवळ चार जण घोळक्याने उभे होते. त्यांच्याकडे एक दुचाकी होती. त्यांनी फिर्यादी शेट्टी यांना अडवित पैशांची मागणी केली. त्यांनी आपल्याजवळ पैसे नाहीत असे सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांच्या खिशात हात घालून पैसे जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. मात्र, शेट्टी यांनी हा वार चुकवला. ते तेथून जीव वाचवून ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय ३८, रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध) यांच्यावरही या टोळक्याने हल्ला केला असून ते गंभीर जखमी आहेत.

आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश

पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल असून मागील आठवड्यातच ज्युवेनाईल कोर्टाने त्यांची बाल निरीक्षण गृहातून जामिनावर सुटका केली होती. तर यांतील मोठ्या जय सुनील बेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्याचे कायदेशीर आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -