Sunday, June 23, 2024
Homeताज्या घडामोडीMahavikas Aghadi : निवडून येण्याची नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे!

Mahavikas Aghadi : निवडून येण्याची नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे!

ठाकरे गटाचा काँग्रेसला थेट इशारा; मतदान पार पडल्यावरही मविआत धुसफूस कायम

काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील आल्याने मविआत नवा वाद!

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदान पाच टप्प्यांत यशस्वीरित्या पूर्ण पार पडलं आहे. मात्र, यानंतरही महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वाद सुरुच असल्याचं चित्र आहे. सांगलीच्या जागेवरुन मविआमध्ये मोठे मतभेद झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस यांना विचारात न घेता सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने (Thackeray Group) चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) नाराज झाले आणि नाराजीतून त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत बंडखोरी केली. त्यांना अनेक काँग्रेस नेत्यांनी पाठिंबा दिल्याने मविआला धक्का बसला. हेच विशाल पाटील काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने आता मविआमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते (Sanjay Vibhute) यांनी याप्रकरणी थेट काँग्रेसला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी विशाल पाटील यांना देखील बोलण्यात आलं होतं. सांगलीमध्ये काँग्रेसने निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून गद्दारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला मदत करण्याची भूमिका घेतली. परंतु शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसही विशाल पाटील यांच्यासोबत गेली. काँग्रेसच स्नेहभोजन म्हणजे अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा आहे”, अशी टीका संजय विभुते यांनी केली.

महाविकास आघाडी टिकवायची असेल तर…

संजय विभुते पुढे म्हणाले, “काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी, काँग्रेसने विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस ही विशाल पाटील यांच्या पाठीशी होती. सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीने काँग्रेसने हकालपट्टी करावी, अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ शिवसेनेने घेतली आहे”, असा इशारा संजय विभुते यांनी दिला.

“उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपलं पाहिजे. परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे”, असा थेट इशारा ठाकरे गटाचे सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिला. त्यामुळे सांगलीत मविआचे वाद टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -