मुंबई : मुंबई-पुणे रेल्वेने (Mumbai-Pune Railway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन ट्रेन काही दिवस बंद ठेवणार असल्याचा रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २८, २९ आणि ३० जून रोजी मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या दोन रेल्वे रद्द करण्यात येणार आहेत. इंटरसिटी एक्स्प्रेस (Intercity Express) आणि डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express) या दोन्ही ट्रेन सुपरफास्ट असून या ट्रेनला नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. परंतु सलग तीन दिवस या रेल्वे रद्द करण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाने हाती घेतला आहे. शुक्रवार २८ जून रोजी पुणे- मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. शनिवार २९ जून रोजी डेक्कन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. तर त्याच दिवशी पुणे -मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस देखील धावणार नाही. तसेच रविवार ३० जून रोजी मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईकर होणार हैराण
मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे नोकरीनिमित्त किंवा इतर कामासाठी येणारे लोक इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेसचा वापर करतात. अगदी कमी तासांमध्ये प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवास करुन देणाऱ्या या दोन्ही रेल्वेंना प्रवाशांची चांगली पसंती असते. मात्र सलग ३ दिवस एक्सप्रेस रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.