Friday, May 10, 2024

संबंध

आपल्या समोरच्या माणसाकडून आपल्या ज्या अपेक्षा असतात त्याच कदाचित त्या माणसाच्याही आपल्याकडून असू शकतात! इतके समजले म्हणजे कोणाचेही कोणत्याही माणसाशी असलेले संबंध कधीच तुटणार नाहीत यासाठी प्रयत्न करा.

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

दोन मित्र असतात. त्यातला एक मित्र श्रीमंत असतो. त्याचे आई-वडील जगभरात सातत्याने फिरत असतात. कोणत्याही देशातून परतल्यावर ते आपल्या मुलाला काही नाणी-नोटा देत असत. ते जमवायचा शौक त्याला लागतो. दुसरा मित्र गरीब असतो. त्यालाही एक शौक असतो. रस्त्यावरून चालताना मिळालेले खिळे, स्क्रू, तारा, कोणत्याही धातूचे छोटे-मोठे भाग तो जमा करायचा. अशा वस्तू रस्त्यात मिळाल्यावर त्याला घरी आणून तो साबण-ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ धुऊन, लखलखीत करून डब्यात भरून ठेवायचा. एक एक किलोचे चार-पाच डबे भरून हे सर्व सामान जमा झालेले असते. त्याचे काय करायचे, हे मात्र त्यांनी अजून ठरवलेले नसते.

इतके विविध आकाराचे हे धातूचे तुकडे त्या डब्यातसुद्धा खूप आकर्षक दिसायचे. एकदा हा श्रीमंत मित्र या गरीब मित्राच्या घरी आला. त्याने ते तुकडे पाहिले आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो इंजिनीअरिंग करत होता आणि त्यांना एक विज्ञान प्रकल्प करायला सांगितला होता. त्या प्रकल्पासाठी हे सगळे भाग त्याला उपयोगी होणार होते. असे भाग वापरल्यामुळे, त्याचा प्रकल्प सर्व विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा आणि उठून दिसणार होता. त्याने या गरीब मित्राला ते सर्व डबे देण्याची विनंती केली. कमीत कमी दहा वर्षे जमा केलेले हे सगळे धातूचे तुकडे, एका क्षणात देऊन टाकावेत का?, अशा तो विचारात हरवला; परंतु आपला मित्र त्याचा उपयोग, कॉलेजच्या प्रकल्पासाठी करणार असल्याचे समजून घेत आणि शिवाय स्वतःहूनच त्या तुकड्यांच्या बदल्यात त्याच्याकडे असलेल्या संपूर्ण नाण्यांचा सेट देण्याचे कबूल केल्यामुळे, आपल्यापेक्षा आपला हा मित्र काहीतरी वेगळे करू शकेल या विचाराने त्यांने तो धातूच्या तुकड्यांनी भरलेले डबे त्याला देऊन टाकतो. मित्र ते सगळे डबे घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी हा श्रीमंत मित्र घरी येतो आणि याला देशाविदेशातील नाणी आणि नोटांचा डबा देतो.

त्यानंतर रोजच गरीब मित्राला नेहमीसारखी शांत झोप लागायची; परंतु श्रीमंत मित्राची जणू झोपच उडून गेली. याचे कारण म्हणजे त्याने त्याला सगळी नाणी आणि नोटा दिल्या नव्हत्या. थोड्याशाच दिल्या होत्या आणि बाकीच्या स्वतःकडे लपवून ठेवल्या होत्या. इथपर्यंत ठीक आहे; परंतु त्याच्या मनात असे येत होते की त्याच्याकडे असणारे अजून काही धातूचे तुकडे कदाचित या मित्राने घरात कुठेतरी लपवून ठेवले असतील!

आता आपण या गोष्टीकडे आपल्या दृष्टीने पाहूया. म्हणजे बाजारातून साधी वस्तू घेताना आपण दुकानदाराकडे एकटक पाहत असतो की तो वजन करताना आपण घेतलेल्या वस्तूचे पारडे किती झुकते. त्याची पाठ फिरली असताना, आपण घेत असलेल्या वस्तू टाकलेल्या त्या पारड्याला पटकन खालून हात लावूनही पाहतो की, काही वजनदार वस्तू किंवा मॅग्नेट खालून चिकटवलेले तर नाहीये? किंवा आपल्याला देत असलेली वस्तू कितपत ताजी आहे, चांगली आहे हे वजन झाल्यावरसुद्धा आत हात घालून खालीवर करून पाहतो.

हे फक्त वस्तूचे झाले. माणसांचीसुद्धा पारख करणे चालूच असते ना. म्हणजे लग्न झाल्यावर बायको, नवऱ्याचा मोबाइल तपासते. त्याचे कॉन्टॅक्टस, त्याचे मेसेजेस, त्याचा एफबी मेसेंजर त्याचप्रमाणे नवरासुद्धा, बायको कोणाशी बोलताना कान देऊन ऐकायचा प्रयत्न करतो, तो तिच्या वस्तूंमध्ये काही जुनी प्रेमपत्रे वगैरे सापडतात का, तेही शोधतो.

एकदा का मनात संशय शिरला की, तो संशय आपला ताबा घेते. मग संबंध बिघडायला थोडाही वेळ लागत नाही. संबंध बिघडणे, संबंध तुटणे याचेही लोकांना अलीकडे काही वाटत नाही, इतकी ही परिस्थिती सामान्य झाली आहे.

त्यामुळे आपल्या अत्यंत जवळचा एखादा माणूस एखादी गोष्ट सांगत असेल, तर ती तशीच आहे, असे समजून घ्या किंवा एखादी गोष्ट लपवत असेल, तर उगाच खोदत बसू नका. दुसऱ्याच्या वस्तूंना किंवा मोबाइलला हात लावू नका, जेणेकरून गैरसमज निर्माण होईल. आपल्याबरोबर त्या माणसाचेही मनस्वास्थ्य बिघडेल. कठीण आहे पण अशक्य अजिबात नाही. एकच लक्षात घ्या. समोरच्या माणसाकडून आपल्या ज्या अपेक्षा असतात त्याच कदाचित त्या माणसाच्याही आपल्याकडून असू शकतात! इतके समजले म्हणजे कोणाचेही कोणत्याही माणसाशी असलेले संबंध कधीच तुटणार नाहीत.

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -