Friday, May 10, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनदी इलेक्ट्रिक लेडी

दी इलेक्ट्रिक लेडी

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

आज आपल्याला रस्त्यावर सर्रास विजेवर चालणारी ई-वाहने दिसतात. मात्र १६ वर्षांपूर्वी ई-वाहने इतकी रस्त्यावरून धावतील याची कुणी कल्पना देखील केली नव्हती. तिच्या दूरदृष्टीने मात्र गाड्यांचं हे भविष्य हेरलं होतं. तिने २००८ मध्ये ई-वाहन निर्मितीची कंपनी सुरू केली. भारतीय उद्योजकांचे आदर्श रतन टाटा यांनी तिच्या वाहन उद्योग निर्मितीमध्ये गुंतवणूक केली. ही गोष्ट आहे भारतातील दि इलेक्ट्रिक लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँपियर व्हेईकलच्या सहसंस्थापिका हेमलता अन्नामलाई यांची.

हेमलता यांचा जन्म तामिळनाडूमधील सालेममध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सहा भावंडांमध्ये त्यांचा नंबर पाचवा. त्यांचे वडील प्राध्यापक आणि आई शिक्षिका होती. दोन्ही पालक शिक्षक असल्याने हेमलता पण शिक्षिका बनेल असे लोकांना वाटायचे. मात्र हेमलता यांना त्यांची आवड जोपासण्याचे स्वातंत्र्य त्यांच्या आई-बाबांनी दिले. त्यांनी कोईम्बतूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली आणि विप्रोमध्ये काम करायला सुरुवात केली. पाच वर्षे काम केल्यावर, त्या दुसऱ्या कंपनीत गेल्या जिथे त्यांनी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम केले. या कामामुळे त्यांना त्यांची मास्टर्स पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. हेमलता यांनी ऑस्ट्रेलियाच्या रॉयल मेलबर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर पदवी मिळवली.

विप्रोमधील नोकरी दरम्यान त्यांना जाणवलं की त्या लोकांमध्ये रमणारी व्यक्ती आहे. एका ठिकाणी बसून काम करणे हे त्यांच्यासाठी नाही. केयेन सॉफ्टवेअरमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून त्यांनी विविध देशांतील लोकांशी संवाद साधला. लोकांसोबत चर्चा करताना त्यांना स्वत:मध्ये दडलेल्या उद्योजकीय कौशल्यांची ओळख झाली. आपल्यामधील उद्योजकीय कौशल्यांचा वापर करून हेमलता यांनी मनुष्यबळ समस्या सोडवण्यासाठी सिंगापूरमध्ये एक एचआर सल्लागार कंपनी, उनी कनेक्ट नावाने सुरू केली. ही कंपनी यशस्वीरीत्या हाताळल्यानंतर, त्यांनी आणखी तीन कंपन्यांची सह-स्थापना केली. सॉफ्टवेअर टूल्स, तिकीट सेवा आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण सेवा आदी क्षेत्रांतील या कंपन्या होत्या.

जून २००७ मध्ये, जेव्हा हेमलता यांचे पती बाला पच्यप्पा जपानमधील वाहन संबंधी परिषदेमध्ये गेले होते तेव्हा त्यांना इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची कल्पना आली. येत्या काही वर्षांत अंतर्गत ज्वलन इंजिने हळूहळू संपतील याविषयी दिग्गजांचे बोलणे ऐकले. प्रचंड संशोधन आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये फिरल्यानंतर, दोघांनीही २००८ मध्ये अँपियर व्हेईकल प्रा. लि.ची स्थापना केली. अँपियर व्हेईकल्ससाठी बाजारात आपली छाप पाडणे सोपे नव्हते. मात्र चिकाटी आणि नावीन्यपूर्ण विपणन धोरणाने अल्पावधीत कंपनीने आपली ओळख निर्माण केली.

स्थापनेच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ ६९ ई-वाहनांची विक्री झाली. कंपनीने जेव्हा दिव्यांगांच्या गरजा दर्शविणारी वाहने तयार केली आणि तामिळनाडू सरकारला १२०० स्कूटर पुरवल्या, तेव्हा साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. हळूहळू कंपनीला विस्तार करण्यासाठी गुंतवणूकदार आणि उत्पादन संशोधन व विकास करणारी उत्कृष्ट टीम मिळाली. कंपनीसाठी मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा रतन टाटा यांनी हेमलता यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. अँपियरची स्थापना लोकांच्या जीवनात पर्यावरणपूरक दळणवळण पर्याय आणण्यासाठी आणि दुचाकी परवडणारी असावी यासाठी करण्यात आली. कंपनी इलेक्ट्रिक सायकल, स्कूटर, तीनचाकी आणि दिव्यांगांसाठी खास बनवलेल्या वाहनांचे उत्पादन करते. ऊर्जा वाचवणे आणि इंधनमुक्त करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. इतकेच नव्हे तर वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा स्वदेशी आहे. अँपियर व्हेईकल्सने ग्रीव्ह्स कॉटन या वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी कंपनीसोबत करार केला आहे.

हेमलता या उत्कटतेने कंपनीचे नेतृत्व करत आहेत. रतन टाटा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन या दोन मोठ्या दिग्गज उद्योगपतींच्या पाठिंब्याने त्यांच्या कंपनीची वाटचाल सुरू आहे. त्यांना भारतातील टेस्ला मोटर्स तयार करण्याची इच्छा आहे. त्यांचे लक्ष गुंतवणुकीपेक्षा ब्रँड निर्मिती आणि मार्केटिंगवर आहे. कंपनी आयात केलेल्या सामग्रीपेक्षा स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यास प्राधान्य देते. हेमलता यांनी महिलांचे सक्षमीकरण करून आणि लैंगिक असमानता दूर करून बदल घडवून आणला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३०% महिला आहेत आणि त्रिसूल ही अँपिअर व्हेईकल्सने विकसित केलेली इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर प्रामुख्याने तामिळनाडूच्या महिला गिरणी कामगारांच्या गरजांसाठी निर्माण करण्यात आली होती. दरवर्षी २२००० हून अधिक वाहनांची विक्री करून, अँपियर व्हेईकलने खेडे आणि शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावले आहे.

२०१० मध्ये, हेमलता यांनी सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईनचा पुरस्कार जिंकला आणि उत्पादन क्षेत्रातील डिसप्टर ऑफ तामिळनाडू पुरस्कार प्राप्त केला. २०१७ मध्ये, त्यांना रोटरी क्लब ऑफ मद्रास ईस्टद्वारे प्रदान करण्यात आलेला महिला उद्योजक पुरस्कार देखील मिळाला आहे. नवोदित उद्योजकांसाठी त्या मोलाचा संदेश देतात. केवळ ट्रेंड आहे म्हणून उद्योग न उभारता सतत मूल्यमापन आणि तयारीसह कल्पना राबविणाऱ्या उद्योजकांचे त्या कौतुक करतात. कोणत्याही महिलेला प्रेरणादायी ठरेल अशीच ही इलेक्ट्रिक लेडी आहे.
theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -