Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीदेशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात 'उबाठा' ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते...

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजविणे या मुद्द्यांवर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या या षडयंत्राला उद्धव ठाकरे यांचीही मान्यता आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

उपाध्ये म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करून मुस्लिमांचा समावेश ओबीसींमध्ये केला आणि संपूर्ण आरक्षण मुस्लिम समाजास बहाल केले. ही तर समाजात फूट पाडण्याची आणि धर्माच्या आधारावर आरक्षण नीती आखण्याची संविधानास मान्य नसलेल्या कृतीची पहिली पायरी होती. हीच नीती देशात सर्वत्र लागू करण्याचे काँग्रेसचे धोरण असून इंडी आघाडीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांना ते मान्य असल्यामुळेच या धोरणानुसार एकत्र येण्याचे या आघाडीतील पक्षांनी ठरविले आहे. यातून देश दुसऱ्या फाळणीकडे जाईल, याची पर्वा काँग्रेस आणि इंडी आघाडीला नाही. दुर्दैवाने प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव यांनीही मतांसाठी या कटाला मान्यता दिली आहे.

या आघाडीच्या स्थापनेसाठी वारंवार झालेल्या बैठकांमध्ये हाच किमान समान कार्यक्रम ठरविण्यात आला असून सर्वांच्या संमतीनुसार आता यातील एकएक मुद्दे जाणीवपूर्वक उपस्थित केले जात आहेत.

काँग्रेसच्या विदेशी काँग्रेस शाखेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी देशातील सामाजिक वर्णभेदाविषयी केलेले निषेधार्ह वक्तव्य हा त्याच धोरणाचा भाग असून इंडी आघीडीतील उबाठा गटासह सर्वांनी निश्चित केलेल्या धोरणाचाच तो भाग आहे, त्यामुळे उबाठा सेनेचे ठाकरे त्यावर मौन पाळणार हे सहाजिकही आहे असे ते म्हणाले. अयोध्येत राम मंदिराची बांधणी आणि प्रभू रामाची प्रतिष्ठापना झाल्यास त्याला संघठित विरोध करण्याकरिताच इंडी आघाडीच्या नावाने हे सर्व पक्ष एकत्र आले असून सत्ता मिळाल्यास राम मंदिर रद्द करण्याचा राहुल गांधींचा मनसुबादेखील त्या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचाच एक भाग आहे, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काही नेत्यासमवेत झालेल्या गुप्त बैठकांतून हाच विचार मांडल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसमधून अलीकडेच बाहेर पडलेल्या एका नेत्यानेच केला असल्याने या आघाडीचा खरा चेहरा उघड झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

काश्मीरमधून कलम ३७० पुन्हा प्रस्थापित करणे, तिहेरी तलाक पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, आरक्षण नीतीमध्ये मुस्लिमांना प्राधान्य देणे, हिंदूंकडूल अतिरिक्त संपत्ती काढून घेऊन समान अधिकाराच्या नावावर त्याचे वाटप मुस्लिमांना करणे हा इंडी आघाडीचा समान किमान कार्यक्रम अगोदरच ठरला आहे, म्हणूनच उबाठा सेनादेखील या मुद्द्यांवर मौन बाळगून हा कार्यक्रम राबविण्यात सहभागी झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला. इंडी आघाडीला सत्ता मिळणार नाही याची जाणीव झाल्यामुळे आता हा गुप्त अजेंडा उघड करून देशात अशांतता माजविण्याचा इंडी आघाडीचा कट असून उबाठा सेना, शऱद पवारांचा गट आणि राज्यातील विरोधकांचे काही गट एकत्र येऊन महाराष्ट्रात अशांतता माजविण्याकरिता निवडणुकांना वेठीस धरू पाहात आहेत, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना याबाबत कितीही प्रश्न विचारले तरी ते त्याबाबत काहीही बोलणार नाहीत, उलट, असंबंध्द आणि पोरकट प्रचारकी भाषणे करून राजकारणाचा स्तर बिघडविण्यासाठी त्यांचा आटापीटा सुरू आहे, असेही ते म्हणाले.

देशात अस्थिरता माजविणे, जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी थेटपाकिस्तानधार्जिणी धोरणे राबविणे ही इंडी आघाडीची नीती उघड झाली असून, भारतातील प्रगती, समृद्धी, आणि आर्थिक उन्नतीमुळे जगात वाढत असलेली भारताची प्रतिष्ठा व ताकद सहन होत नसलेल्या विदेशी शक्तींनी इंडी आघाडीमार्फत आपल्या कारवाया सुरू केल्या असाव्यात असा संशयही उपाध्ये यांनी व्यक्त केला. समाजात फूट पाडल्याखेरीज आपल्या कारवाया यशस्वी होणार नाहीत असा त्यांचा कयास असला तरी देशातील समाज या कारवाया यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -