Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दिवस

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दिवस

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मंगळवारी मतदान होत आहे. अगदी राज्यापुरतेच बोलायचे म्हटले, तरीही अत्यंत कळीच्या मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्वात जास्त हाय प्रोफाइल लढतींसाठी आज मतदान होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष बारामती, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघांकडे लागले असून तेथे मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लढत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी होत आहे. त्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत.

शरद पवारांशी पंगा घेऊन, अजित पवार भाजपामध्ये आमदारांसह सामील झाले आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर या मतदारसंघात प्रथमच मतदान होत आहे. अजित पवार यांच्यासाठी ही जशी प्रतिष्ठेची लढत आहे, तशीच ती सुप्रिया सुळे यांच्यासाठीही आहे. सुप्रिया सुळे या इतके दिवस अजित पवार यांच्या कामावर निवडून येत आहेत, असा दावा अजित पवार गटातर्फे नेहमीच केला जातो. त्यात तथ्यही आहे. कारण अजित पवार इतके दिवस बारामतीत तळ ठोकून, आपल्या चुलत बहिणीला विजयी करण्यासाठी जीवाचे रान करत असत. पण आता सुप्रिया सुळे यांना पवार यांचा आधार नाही आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पण सर्वात महत्त्वाचे हे आहे की, शरद पवार यांची प्रतिष्ठाच बारामतीत पणाला लागली आहे.

शरद पवार हे गेली चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांच्या पक्षात उभी फूट अजित पवार यांच्या बंडामुळे पडली आहे. मग बारामतीतील ही लढत सर्व देशाचे लक्ष वेधून घेणारी आहे, यात काहीच नवल नाही. अजित पवार यांनी आपल्या काकाश्रींना हरवायचेच, या हेतूने बारामततीत तळ ठोकला आहे. शरद पवार यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात स्थिरस्थावर करून द्यायचे आहे. त्यामुळे त्यांची या निवडणुकीत हार झालीच, तर राज्याचे राजकारण संपूर्ण बदलून जाणार आहे. इतकेच नव्हे तर पवार यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द या निवडणुकीत डावाला लागली आहे. बारामती हा साखरेचा पट्टा आहे. त्या पट्ट्यात साखर लॉबी ही कायम सक्रिय असते. पण ती अजित पवारांमुळे! आता अजित पवार हेच भाजपाकडे गेल्याने, भाजपाचे वर्चस्व साखर लॉबीवर निर्माण होण्याची शक्यता आहे. या निवडणूक निकालावर अजित पवार यांचे राजकीय भवितव्यही ठरून जाणार आहे. भाजपाने या बारामती मतदारसंघावर पूर्वीपासूनच लक्ष केंद्रित केले होते.

शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या मात देण्यासाठी, भाजपाने कित्येक दिवसांपासून खेळी रचण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी या मतदारसंघावर भाजपाने लक्ष केंद्रित केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी कोल्हापूर ते बारामती या पट्ट्यात प्रचार सभा घेतल्या होत्या. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत मोदी आणि अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतल्या आणि मतदारसंघ पिंजून काढला होता. शिवसेना उबाठाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या भागात प्रचार सभा घेतल्या. पण त्यांच्या सभांना म्हणावा, तसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्या शिवसेना फुटीनंतर लोकांची आपल्याला सहानुभूती मिळेल म्हणून ठाकरे चातकासारखी वाट पाहत होते, ती केवळ माध्यमांमध्ये दिसत होती. प्रत्यक्षात ठाकरे यांना कसलीही सहानुभूती नाही. पण माध्यमांमधून ठाकरे आणि पवार यांना सहानुभूती आहे, हे सातत्याने ओरडून सांगितले जात असले, तरीही सर्वेक्षणात कुठेही दिसले नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातही आजच मतदान होत आहे. ही देशातील लक्षवेधी लढत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात येथे लढत होत आहे. राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे, अमित शहा यांच्या जंगी प्रचार सभा झाल्या. कोकणासाठी राणे यांनी केलेल्या कामांची प्रशंसा करताना, कोकणातील प्रकल्प येऊ नयेत म्हणून विद्यमान खासदार राऊत यांनी कसे अडसर आणले, याची जंत्रीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. राज ठाकरे यांनी कोकणातील प्रकल्पांमध्ये राऊत आणि शिवसेना उबाठाने कसे अडसर आणले आणि कसे कोकणातील तरुणांना बेरोजगार ठेवले यावर तोफ डागली. त्यामुळे राऊत यांचा कोकणद्रोह लोकांच्या लक्षात आणून देण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे

. रायगडात आज मतदान होत आहे आणि सुनील तटकरे यांची शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्याशी लढत होत आहे. गीते हे सातत्याने येथे पंतप्रधान मोदी यांच्या नावावर निवडून येत आहेत. त्यांनी काम केले नाही, तरीही त्यांना उमेदवारी ठरलेलीच असते. त्यामुळे राजगडातील मतदारही त्यांना कंटाळलेले आहेत. त्यांना तटकरे कशी टक्कर देतात, यावर निकाल लागेल. पण बारामती हा देशातील सर्वात ‘हाय प्रोफाइल’ सामना आहे आणि त्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. शरद पवार यांच्यावर आता वय झाले, तरी निवडणूक रिंगणात कन्येसाठी उतरल्याबद्दल टीका होत आहे, तर अजित पवार आपल्या पत्नीसाठी लढत आहेत. पण लोकांची पसंती अजित पवार यांच्या बाजूने आहे.

कोकणात उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध करून प्रकल्प कसे येऊ दिले नाहीत आणि त्यासाठी कोकणातील निसर्गाची खोटी समर्थने दिली, यावर राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. कोकणातील युवकांना अजूनही रोजगार मिळालेला नाही आणि त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, हे जनतेच्या मनाला पटवून देण्यात नारायण राणे आणि राज ठाकरे यशस्वी झाले. पण त्यापेक्षाही गंभीर चूक ठाकरे यांनी केली आहे, ती म्हणजे हिंदुत्वाची कास सोडून, अल्पसंख्यांकाचे तुष्टीकरण करणाऱ्या काँग्रेसबरोबर घरोबा केला आहे. यामुळे ठाकरे यांना मतदारांपर्यंत जाण्यासाठी नैतिक धैर्य नाही. राज्यात छत्रपतींचे वंशज उदयनराजे यांचीही शशिकांत शिदे यांच्याशी लढत होत आहे. देशातही महत्त्वाच्या लढती होत आहेत; पण राज्यातील या लढती हाय प्रोफाइल आणि राज्याच्या भवितव्याशी निगडित आहेत. आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -