Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजAddiction : व्यसनांच्या विळख्यात तरुणाई

Addiction : व्यसनांच्या विळख्यात तरुणाई

  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

व्यसनाधीनता एक दुर्गुण. भला मोठा आजार! एका क्षणाचा मोहसुद्धा आयुष्याला वेगळे वळण, कलाटणी देतो. शरीर हा उत्तम दागिना, अलंकार आहे. त्याला जपावे! आपल्या शरीराची आपल्या हातांनी सोनं करायचं की माती? कारण ‘हेल्थ इज वेल्थ.’ शरीरासारखा उत्तम दागिना शोधूनही मिळणार नाही. शरीर हे ईश्वरी देणगी आहे. ती पुन्हा मिळणे नाही. त्यामुळे त्याची काळजी घ्यावी. आपल्या उपद्रवी व्यसनामुळे आपल्या कुटुंबाची तर हानी होतेच! स्वतःचे, समाजाचे नुकसान होते. आर्थिक, शारीरिक, सामाजिक, मानसिक कोणतेही परिणाम उद्भवतात. भविष्यात उद्यासाठी आपणच आपली, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली नाही तर पुढे काय होईल? याचा विचार सर्वांनीच करायला हवा. आजकाल युवकांमध्ये सर्वच प्रकारचे व्यसन वाढलेले आहे. त्यामुळे आपली प्रतिमा डागाळली जाते. समाजामध्ये असलेले स्थान, दर्जा टिकवायचा की त्याची उतरण करायची! हे आपल्याच हातात. आपल्यामुळे कित्येकांची मने दुखावली जातात. आपण आपल्या मनमानीने वागतो. पण त्याचा इतरांना काय त्रास होतो, हे आत्मपरीक्षण करावे. विडी, काडी, ताडी माडी ,तंबाखू, गांजा, दारू, जुगार, बार सिगारेट, मोबाइल कोणतेही व्यसन असू द्या. व्यसन ते व्यसनच! माणूस एकदा व्यसनाच्या आहारी गेला की, त्याला त्याच्यातून बाहेर काढणं अत्यंत कठीण!

त्याच्या मनाला वाटेल, तसा तो जर वागत असेल, तर एक क्षणाचा मोह माणसाला बांधलेल्या अख्ख्या मनोऱ्याला, इमारतीला सुरुंग देतो आणि आयुष्याचं मातीमोल होतं! यासाठी व्यसनी लोकांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे. पण ऐकतात का हो ते? नाही! मग यासाठी स्वतःच्या आई-वडिलांचं ऐकत नाही, ना पत्नीचं ऐकत! आपणच जन्माला घातलेल्या मुला-बाळांसाठी नाही ऐकत. पण सरतेशेवटी याचा त्रास सर्वप्रथम स्वतःला होतो. आंब्याच्या पेटीमध्ये जसा एक आंबा सडका असला, तर अख्खी पेटी वाया जाऊ शकते. तसेच आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतो? यावरून आपली किंमत केली जाते. एक तर कमी होते किंवा वाढते ती संगतीनेच. म्हणून चंदनाच्या झाडाशेजारी जर बाभळीचे झाड असेल, तर बाभळीचे झाड हे चंदनाच्या झाडाला कराकरा कापते! ते चंदनाचे झाड मात्र बाभळीला सुद्धा सुगंधित करून टाकते! हीच तर किमया आहे संगतीची.

केवळ नारदमुनी भेटले म्हणून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये नारदमुनी यावेत आणि जीवनच त्यांचं पलटून जावं. व्यसनात आहारी गेलेली लोकं रात्रंदिवस स्वतःच्या मोहापायी जगतात. आपल्या जवळच्या व्यक्तींचा विचार करत नाहीत. आपल्या संसारावर, मुलाबाळांबर, आई-वडिलांवर जर त्याचे विपरीत परिणाम घडत असतील, तर असे व्यसन काय कामाचे? त्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडून आयुष्याचा एकूणच जीवन आलेख ढासळतो. तो उंचावण्यास जीवन सार्थकी लावण्यास कृतार्थ होण्यास जीवन पणास लावावे. यासाठी आपणच आपले भविष्य आणि भवितव्य रचत असतो. व्यसनामुळे लोक आपल्याला टाळू लागतात. आपल्या पैशाला ही सुरुंग लागतो. पैशाचा गैरवापर होतो. अमाप उधळायचा, बेछूट वर्तन करायचे प्रत्येक गोष्टीला हे वेळीच कळलं पाहिजे चांगल वाईट काय? सत्य असत्य काय? इतकं सगळं! पुढचे परिणाम माहीत असताना, वाईट असताना देखील क्षणभराच्या व्यसनापायी, मोहापायी आपण वाहत जातो! त्याचे भान राहिले पाहिजे.

आयुष्यभराची जोडलेली नाती खरी श्रीमंती, समाधान देतात. पैशाहून श्रीमंत करतात. पण जर का त्यामध्ये केवळ व्यसनं आलं की, ती माणसं मात्र भरकटली जातात आणि फरफट होते, ती निष्पाप माणसांची की ज्यांचा काहीही दोष नसतो आणि तरीही भोगावे लागते. असे पुढचे परिणाम होणारे जर घातक असतील. अतिशय वाईट असतील. जसा शेवट वाईट होणार असेल, तर आजच आजच्या पिढीने चांगला विचार करावा. आपण चुकतो कुठे? करतो काय? हे जर वेळीच कळले, तर आपली पावलं ही निश्चितपणे अतिशय सांभाळून उचलावीत! विचार करून वागावे! मग पश्चातापाची वेळच येणार नाही! आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, जीवनाचं आपल्या परिसस्पर्शाने सोनं करावं. पण आपल्यामुळे कोणालाही इजा होईल. वाईट वाटेल किंवा परिणाम उद्भवतील असे वागू नये. आपल्यातील दोष वेळीच निवारण केल्यास, त्याची इजा इतरांना होत नाही. आपल्याला देव होता आला नाही, तरी चालेल पण माणूस तरी व्हा! राक्षस होऊ नका! आपल्याला मदर तेरेसा, संत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा नाही होता आले, तरीसुद्धा आपण खारीचा वाटा म्हणून समाजप्रबोधनाचा, सेवेचा, अध्यात्माचा एक वाटा किंवा व्रत उचलायला हवे. निश्चितच माणूसपण जपून मानवता, समता आणि बंधुता टिकवायचे असेल तर सर्वप्रथम व्यसनांना बाय बाय करायला हवे. ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’ शिल्पकार दगडातून शिल्प घडवत असतात. दगडाचा नको असलेला भाग जसा काढून टाकला जातो. तसाच आपल्यात नको असलेलं दोषसुद्धा सहजपणे सोडून देता आले पाहिजे. चांगलं तेवढं स्वीकारून, वाईटाचा मात्र निश्चित त्यागच केला पाहिजे. १४ दिवसांचे आयुष्य असणारे फुलपाखरू उडताना सुद्धा किती सुंदर, बेधुंद होऊन बागडत असतं! फुलेच पाहाना फुलतात, सुगंध देतात. उद्या माहीत नसतं त्यांना कोणाच्या, देवाच्या पायी जायचे की कोणाच्या प्रेतावर तरी ते फुलण्याचे, सुगंध देण्याचे कार्य सोडत नाही. माणसाने सुद्धा आपली मनमानी आणि उच्छृंखलपणा सोडावा. जगावं ते इतरांना आनंद देण्यासाठी. दुःख आणि त्रास आयुष्यात असतोच प्रत्येकाला. ज्यातून काही साध्य होणार नाही, कोणालाही काही समाधान मिळणार नाही. केवळ आपल्या मनासाठी आपण कित्येक मने दुखवतो, यातून शेवटी आपल्या हाती काय लागतं आणि आपला आपण शेवट कसा करतो. यावरच जीवनाची नीतिमूल्ये, जीवनातील खरा आनंद आणि आयुष्यातील चढ-उतार यावर निश्चित विवेचन करावे. स्वामी विवेकानंदांचा तरुण हा योग, प्राणायाम आणि अध्यात्म, तत्त्वज्ञान प्रेरित असावा. यातच सर्व आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -