Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीChitra Wagh : तुमचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का?

Chitra Wagh : तुमचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का?

मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंना चित्रा वाघ यांचा पत्रातून टोला

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कंपनीत मराठी माणसाला नोकरी नाही , अशा प्रकारची जाहिरात प्रचंड व्हायरल झाली. अनेक राजकीय नेते तसेच कलाकार मंडळींनी यावर आपलं परखड मत व्यक्त केलं. प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनीही मराठीसाठी आवाज उठवला होता. रेणुका शहाणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांना मत देऊ नका असं आवाहन केलं होतं. इतर वेळी जास्त अॅक्टिव्ह नसलेल्या रेणुका शहाणे यांनी यावेळी अशा पद्धतीचं मत मांडल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यामागे एखादा राजकीय हेतू असल्याची शंका व्यक्त केली. चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना एक पत्र लिहून त्यात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

चित्रा वाघ यांनी एक्स अकाऊंटवर आपल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही सर्व आपले खूप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करवले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान आणि कौतुकच आहे. भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणीव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तिचा मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आपण ट्वीटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो.

“जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये तुम्ही स्वःत खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीनुसार त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच. परंतु, तिचा वापर फक्त राजकीय हेतुकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे.”

“आपणास एक प्रश्न विचारते की कोव्हिडमध्ये पीपीई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला पण मुंबई महापालिकेच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना कुलूप लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्सर मौन बाळगणार का?” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्या प्रश्नांना रेणुका शहाणे उत्तर देणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -