बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप सरसावली

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्यावतीने, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी निदर्शने करण्यात आली. वडाळा आगार येथे भाजप सदस्य आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. भाजप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

गेली अनेक वर्षे बससेवा तोट्यात आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ही आर्थिक तूट वाढत चालली आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होतो आहे. अपुरा आणि अनियमित पगार आणि कामाचा वाढता ताण अशा अनेकविध समस्यांशी कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजीही देण्यात आली.

यावेळी भाजप समिती सदस्य सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे, गणेश खणकर, अरविंद कागिणकर, राजेश हाटले, शिवकुमार झा उपस्थित होते.

बेस्ट अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या “अ”अर्थसंकल्पात विलीनीकरण करा, बेस्ट बस चालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घ्या, स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखा, कोविड चार्जशीट रद्द करा, कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्या, बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.

पश्चिम रेल्वेवर ५ जोडी ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच जोडणार

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी पाच जोडी स्पेशल रेल्वेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ट्रेन नंबर ०२९७१/०२९७२ वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास कोच जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनसवरून ४ नोव्हेंबर २०२१ ते ३ मे २०२२ पर्यंत आणि भावनगर टर्मिनस येथून १ नोव्हेंबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत जोडले जाणार आहे.

ट्रेन क्रमांक ०९२१७/०९२१८ वांद्रे टर्मिनस-वेरावल स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनस येथून २ नोव्हेंबर २०२१ ते १ मे २०२२ पर्यंत आणि वेरावल येथून ३ नोव्हेंबर २०२१ पासून २ मे २०२१ पर्यंत जोडले जाणार आहे.

सुपर १२मधील चार संघांत भारताचा समावेश

दुबई (वृत्तसंस्था) : टी २० वर्ल्डकपमध्ये पात्रता फेरीचे सामने सुरू असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवले आहे. सुपर १२ मधील चार संघांना त्यांनी पसंती दिली आहे. ब्रॅड हॉगच्या मते उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे पोहोचतील. हा वर्ल्डकप भारत किंवा पाकिस्तान जिंकेल असंही त्यांनी पुढे सांगितले. तर ऑस्ट्रेलिया संघाला त्यांनी पसंती दिलेली नाही.

माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर चर्चेदरम्यान हॉगने हे भाकीत वर्तविले आहे. माझ्या मते गट १ मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचतील. तर गट २ मधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचतील, असे ब्रॅड हॉगने म्हटले आहे. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो; मात्र यासाठी त्यांना भारताला पराभूत करावे लागेल, असे त्याने स्पष्ट केले.

भारताविरुद्धचा पहिला सामना गमवल्यास पाकिस्तानकडे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकत पुनरागमन करण्याची खूप कमी संधी आहे. त्यामुळे थोडे गणित बदलेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवणे कठीण आहे, असे ब्रॅड हॉगचे म्हणणे आहे.

सराव सामन्यात द. आफ्रिकेकडून पाकिस्तान पराभूत

दुबई (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या आधी सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांचा ६ विकेटनी पराभव केला. भारताविरुद्ध रविवारी होणाऱ्या लढतीच्या आधी पाकिस्तान संघाला हा मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. पण दुसऱ्या लढतीत पाकिस्तानचा संघ उघडा पडला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १८७ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले होते. तरी देखील त्यांचा पराभव झाला. आफ्रिकेकडून डेर डुसेनने ५१ चेंडूत १०१ धावा केल्या. तर कर्णधार टेंबा बावुमाने ४२ चेंडूत ४६ धावा केल्या. अखेरच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी १९ धावांची गरज होती आणि त्यांनी ते पार केले.

पाकिस्तानचा सर्वात भरवश्याचा फलंदाज कर्णधार बाबर आझमला या सामन्यात धावा करता आल्या नाहीत. फखर जमानने ५२ धावा केल्या. तर शोएब मलिकने २८ तर असिफ अलीने ३२ धावा केल्या. पण आफ्रिकेने धमाकेदार फलंदाजी करत पाकिस्तानला धक्का दिला.

तर, विद्यमान विजेते वेस्ट इंडिजचा अफगाणिस्तानने ५६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत त्यांनी १८९ धावा केल्या. उत्तरादाखल वेस्ट इंडिजला फक्त १३३ धावा करता आल्या. गेल्या म्हणजेच २०१६च्या टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पहिल्या दोन्ही सराव सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

भारताची सकारात्मक सुरुवात

टी-२० विश्वचषकात भारत याआधी कधीच पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला नाही. त्यातच भारताची सुरुवातही सकारात्मक झाली आहे. मुख्य स्पर्धा सुरू होण्याआधी भारताने दोन सराव सामने खेळेल. पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळून भारताने विजेतेपदाचे दावेदार आपणच असल्याचे दाखवून दिले.

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मनोज मोरे, अपर्णा सागरे सर्वोत्तम

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उपनगर हौशी पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय सब-ज्युनियर, मुले, मुली तसेच मास्टर (पुरुष/महिला) पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर गटात मुंबई पोलिसांचा मनोज मोरे तसेच चैतन्य हेल्थ क्लबची अपर्णा सागरे सर्वोत्कृष्ट पॉवरलिफ्टर ठरले. सब-ज्युनियर गटात अनुक्रमे सुमीत पाटील (डीईएन)आणि आकांक्षा बने (एम्पायर)तसेच मुले आणि मुली गटात अनुक्रमे जमील खान (सावरकर जिम) आणि मानसी अहेर यांनी (एम्पायर) आपापल्या गटात बाजी मारली.

गुरुकृपा मॅरेज लॉन्स, कांदिवली (मुंबई) येथे झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन दत्तात्रय भनगे (सीए), हेमंत नवाळे (महाराष्ट्र केसरी, मल्लखांब), क्रीडाप्रेमी प्रथमेश कीर्दत, पॉवरलिफ्टिंगमधील आंतरराष्ट्रीय पदकविजेते आरीफ शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडाप्रेमी नियती शहा, नगरसेविका शुभदा गुडेकर, निखिल गुडेकर, शशांक चौकीदार, भालचंद्र मांजरेकर, दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हास्तरीय सब-ज्युनियर, मुले, मुली तसेच मास्टर (पुरुष/महिला) पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सब-ज्युनियर मुले गटात ५३ किलो गटात अनिश वर्मा (डीईएन), ५९ किलो गटात सुमीत पाटील (डीईएन), ६६ किलो गटात पार्थ बोरसे (मुंबई फिट), ७४ किलो गटात राजन मिश्रा (अॅडव्हान्स जिम), ८३ किलो गटात आदेश दिवेकर (चैतन्य), ९३ किलो गटात लिकित सालियन (जेनिफिट) आणि १०५ किलो गटात वेदांग अंडागळे (चैतन्य) तसेच ज्युनियर गटात ५९ किलो गटात विकास मांडवकर (चैतन्य), ६६ किलो गटात जमील खान (सावरकर जिम), ७४ किलो गटात अभिजीत कदम (स्मिताई), ८३ किलो गटात अक्षय कारंडे (टेक्नोफिट), ९३ किलो गटात आयुष घाडगे (मुंबई फिट), १०५ किलो गटात फ्रान्सिस्को फर्नांडिस (सावरकर जिम) आणि १२० किलो गटात ध्रु नायर यांनी (केईएस कॉलेज) जेतेपद पटकावले. मास्टर वन पुरुष गटात ६६ किलो गटात अजीज शेख (एम्पायर), ८३ किलो गटात संदेश आंबेकर (मुंबई फिट), ९३ किलो गटात नासीर हुसेन (चैतन्य), १०५ किलो गटात संदीप नवले (चैतन्य), १२० किलो गटात मनोज मोरे (मुंबई पोलीस) तसेच मास्टर टू मध्ये ६६ किलो गटात ६६ किलो गटात भरत पटवारी (चैतन्य), ८३ किलो गटात अशोक कदम (श्री पवनपुत्र), १२० किलो गटात आरीफ शेख (चैतन्य) आणि मास्टर थ्रीमध्ये ५९ किलो गटात विजय सोहनी (चैतन्य) विजेते ठरले.

सब-ज्युनियर मुली गटात ४७ किलो गटात ज्योती विश्वकर्मा (चैतन्य), ५२ किलो गटात आकांक्षा बने (एम्पायर), ५७ किलो गटात प्रिया गुजर (टेक्नो), ६३ किलो गटात प्राजक्ता गाढवे (अॅडव्हान्स), ८४ किलो गटात प्रणाली उमाळे (टेक्नो), ज्युनियर गटात ४३ किलो वजनी गटात कांचन धुरी (चैतन्य), ४७ किलो वजनी गटात मानसी अहेर (एम्पायर), ५७ किलो वजनी गटात अस्मिता सकपाळ (चैतन्य), ६३ किलो गटात अपर्णा जगताप (चैतन्य), ७२ किलो गटात मनाली साळवी (चैतन्य), ८४ किलो गटात निकिता नाईक (टेक्नो), ८४ किलोवरील गटात मारिया पटेल (चैतन्य) आणि मास्टर वन गटात (८४ किलोवरील गट) अपर्णा सागरे यांनी बाजी मारली.

मीरा-भाईंदरमध्ये मडके फोडत पाण्यासाठी आंदोलन

अनिकेत देशमुख

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहरात भाजपच्या वतीने गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास सिल्व्हर पार्क येथे पाण्याकरिता आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांनी आंदोलनात सहभाग दर्शवला. यावेळी महापौर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दालनाबाहेरच मडके फोडत आंदोलन केले. आंदोलनानंतर आंदोलनातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेत चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी पालिकेत सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ, स्टेम प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत, पालिका आयुक्त दिलीप ढोले, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परंतु भाजपने गोंधळ करत फक्त आमच्याबरोबरच बैठक घेण्याचे सांगितले. यावेळी महापौर यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी महापौर दालनाबाहेरच मडके फोडत आंदोलन केले.

भाजपने पाणी चोरीचा आरोप केला होता, त्यावर पाणी चोरी होत नसल्याचा एमआयडीसीकडून दावा करण्यात आला आहे. पाणी चोरी होत असल्याचे आढळल्यास नळजोडण्या खंडित करण्यात येतील व त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असे एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ यांनी सांगितले आहे. मीरा-भाईंदरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे व अगोदरचा शटडाऊन असल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. ही पाणीटंचाई लवकरच कमी करण्यात येईल, असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले.

तारापूर औद्योगिक वसाहत समस्यांच्या विळख्यात

बोईसर (वार्ताहर) : औद्योगिक विकास महामंडळाचे तारापूर एमआयडीसीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीसह परिसरातील अनेक गावे विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असूनही तारापूर औद्योगिक वसाहतीची वाताहत होत चालली आहे.

बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये समस्यांचा महापूर आल्यामुळे कामगार व गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामोरो जावे लागत आहे. या अडचणी व समस्या डोळ्यांनी दिसत असल्या तरी औद्योगिक विकास महामंडळ याकडे डोळेझाकपणा करत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे वसाहतीत मूलभूत सुविधा नसल्यावरून दिसून येत आहे.

औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या मान, बेटेगाव, सरावली, कुंभवली, कोलवडे, सालवड, पास्थल, आणि बोईसर या ग्रामपंचायतीत कारखानदारांनी आपले कारखाने थाटून विस्तार केला असला तरी अनेक मूलभूत सुविधा न पुरवल्या गेल्याने हजारो कारखानदारांच्या मालकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. हजारो कारखाने असलेल्या या वसाहतीमधून कारखानदारांना मार्फत कोट्यावधीचे महसूल शासन दरबारी येत असले तरी करदात्यांना हवी तशी सुविधा पुरवली जात नाही, अशी खंत येथे व्यक्त होत आहे. वसाहतीसह अनेक गावांमध्ये रस्ते, गटारे, दिवाबत्ती, डेब्रिज, वाढत्या झोपड्या, पाण्याची गळती, ड्रेनेजची समस्या, तसेच मोकळ्या जागेत कारखान्याचे अतिक्रमण आदी प्रकारांमुळे एमआयडीसीला समस्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

प्रकल्पग्रस्तांनी या एमआयडीसीला शेकडो एकर जमिनी कसित असलेल्या शेतजमिनी दिल्या. एमआयडीसीने मोठमोठ्या टोलेगंज इमारती उभारण्यासाठी मातीमोल भावाने विकत घेतल्या. वसाहती उभ्या राहात असताना येथील भूमिपुत्रांना नोकर भरतीची मोठी आमिषे दिली गेली, मात्र सद्यस्थितीत भूमिपुत्रांना येथे नोकऱ्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या वेळेला आश्वासने दिली व आता भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेली आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांमधूनही संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९६० ते १९७० च्या कालावधीत येथील स्थानिकांकडून कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या. त्यामुळे औद्योगिक वसाहत उभी राहिली असली तरी त्याचा कणभरही फायदा स्थानिकांना झालेला नाही. औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था प्रदूषण कामगार सुरक्षा अशा अनेक प्रश्नांमुळेही वसाहत दरदिवशी चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी मूलभूत सुविधा घेऊन अनेक मागण्यांची निवेदने औद्योगिक कार्यालयात दिलेली आहेत. त्यानंतरही त्यांची कुठलीही दखल घेतली गेली नाही.

आजही बोईसर औद्योगिक वसाहतीत नियोजनशून्य कारभार पाहावयास मिळतो. रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांच्या साईड पट्ट्या नाहीत, रस्त्याच्या बाजूला पाणी निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था नाही, कारखानदार आपला कचरा थेट उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी टाकत आहेत. काही औद्योगिक परिसरात तर अग्निशमन दलाची गाडी किंवा बंब जाण्यासाठीही रस्ता नाही. त्यामुळे सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. एखाद्या ठिकाणी गंभीर अपघात किंवा घटना घडली तर त्या ठिकाणी अग्निशमन प्रशासनासह पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

औद्योगिक वसाहतींसह औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे कार्यालयही बोईसर परिसरात नाही. त्यामुळे इतर ठिकाणांहून कारभार हाकताना किंवा एखादी घटना घडताना या अधिकाऱ्यांना येण्यास बराच वेळ होतो. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहत भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची कामगिरी बजावत असली तरी या वसाहतीमध्ये अनेक समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस उभा राहत आहे. त्यामुळे या समस्यांचा त्रास कामगारांसह स्थानिक नागरिक व शेतकरीवर्गाला सोसावा लागत आहे.

डेब्रिजचे डोंगर

एमआयडीसीतील अनेक रस्त्यांच्या बाजूच्या मोकळ्या भूखंडांवर कचरा तसेच बांधकाम साहित्याचे डेब्रिज टाकले जाते. ते उचलले जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग आहेत. सरावली ग्रामपंचायत हद्दीतील डीसी कंपनीच्या बाजूला, सालवड ग्रामपंचायत हद्दीतील आरती ड्रग कंपनीच्या गेट समोर, एकलारे रोड याठिकाणी ही समस्या गंभीर आहे.

रस्त्यावर चिखल आणि सांडपाणी

करमतारा कंपनीकडून कॅमालिन नाक्याकडे जाणाऱ्या वळणावरील वाहतुकीच्या रस्त्यावर गटारातील दूषित चिखल आणि दूषित सांडपाणी साचले होते. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांप्रमाणे प्रवाशांना तसेच चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

फेरीवाल्यांचा सुळसुळाट

तारापूर एमआयडीसीतील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट सुरू असूनही एमआयडीसीच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याची येथील नोकरवर्गाची तक्रार आहे.

खड्डेमय रस्ते मृत्यूचे सापळे

औद्योगिक वसाहतीमध्ये वाहतूक नियमावली केलेली नाही. त्यामुळे दररोज औद्योगिक वसाहतींच्या रस्त्यावरून अवजड वाहने धडधडत असतात. परिणामी अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय होऊन त्यांची चाळण झालेली आहे. याचा नाहक त्रास वाहनचालकांना व कामगारांना होत आहे. अनेकदा मोठे अपघातही घडलेले आहेत, तर काही घटनांमध्ये वाहनचालकांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली

बोईसर – चिल्हार रस्त्यासाठी जे भूसंपादन केले त्याचे आजतायागत प्रकल्पग्रस्तांना ना मोबदला दिला, ना साधे प्रकल्प दाखले. त्यामुळे आजही बोईसर-चिल्हार रस्ता समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. इतकेच नव्हे तर दुपदरीकरणावेळीही प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत.

वाहने पार्किंगची असुविधा

बोईसर-चिल्हार रस्ता, थुंगा हॉस्पिटल ते टाकीनाका, सत्तर बंगला, टाकी नाका ते कॅमलिन नाका, शिवाजी नगर रोड, लुपिन कंपनी परिसर आणि मुकट पंप ते गोमटे नाका, करमतारा कंपनी या एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था एमआयडीसीने केली नसल्याने वर्षाचे बाराही महिने येथे ज्वलनशील रसायनांनी भरलेले कंटेनर व एमआयडीसीत पार्किंगची समस्या आजही कायम आहे. अनधिकृत पार्किंग फोफावल्याने एमआयडीसीत पार्किंगची दैना उडाली आहे.

विष्णुदास भावे नाट्यगृहात आजपासून तिसरी घंटा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह हे नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नव्याने सज्ज झाले आहे. या नाट्यगृहाचे रंगमंच व प्रेक्षागृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासून पुन्हा वाजणार आहे.

कोविडची पहिला लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून नाट्यगृहामध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये प्रयोगांना सुरुवात झाली होती. तथापि कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर एप्रिल महिन्यापासून प्रयोग बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा आजपासून नियंत्रित स्वरूपात नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता विष्णुदास भावे नाट्यगृह एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत कोविड नियमावलीचे पालन करून रसिकांच्या उत्साही प्रतिसादात सुरू होणार आहे.

प्लास्टिक बंद मोहिमेला ‘ब्रेक’

देवा पेरवी

पेण : दोन वर्षांहून अधिक काळ प्रभाव दाखवलेल्या कोरोनाने सामाजिक घडी अक्षरशः विस्कळीत केली आहे. अनेकांचे रोजगार गेले, व्यवसाय बुडाला. याउलट विविध प्रकारचे व्यवहार ठप्प झाल्याने ध्वनी, वायू प्रदूषणही कमी झाले. दुसरीकडे, लॉकडाऊन शिथिल होताच प्लास्टिक बंदी मोहिमेचा पेण नगरपरिषदेसह बहुतांश सर्वच विभागातील प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागाची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या पेण शहरातील बहुतेक दुकानदार, हातगाडी, मच्छी, मटण, फळे विक्रेते बिनधास्तपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी मोहिमेला ब्रेक लागल्याचे सर्वश्रुत आहे.

प्रारंभी काळात प्रभावी ठरलेली प्लास्टिक बंदी मोहिमेला सैलपणा आला. मुख्यतः पेण शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याने पेण नगरपरिषद प्रशासन कमालीचे अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पेण शहरासह तालुक्यातील सर्वच भागांत प्लास्टिकने जोरदर डोके वर काढले आहे. प्लास्टिकचा वापर रोखण्यात जिल्हा प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनही पूर्णत: अपयशी ठरले आहे. अशात संपूर्ण जगावर आलेल्या महाभयंकर संकट कोरोनाने प्लास्टिकला उभारी दिली की काय, असेच चित्र सध्या पेणमध्ये पाहायला मिळत आहे.

कोरोनाचे जाचक निर्बंध सध्या शिथिल झाल्याने या काळात प्लास्टिक बंदी मोहिमेला मोठी खिळ बसली. सर्व प्रकारचे प्लास्टिक किती धोकादायक आहे, हे नुकत्याच आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीने वारंवार दाखवून दिले. अनेक नाले, ओढे प्लास्टिकच्या साठ्यांनी चक्काजाम झाले. त्यातून पाण्याने मार्ग बदलत आपली अधिक ताकद दाखवून दिली. प्लास्टिक कचऱ्याने जमीन नापीक होत आहे. आज सर्वच रस्त्याच्या दुतर्फा, कालवा, गटारे, मैदाने प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांनी अक्षरश: विद्रुप झाले आहेत. ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांनी पाणी अडले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. महाड व इतर ठिकाणच्या महापुरात निसर्गाचे ‘टिट फॉर टिट’ रूप पाहायला मिळाले. फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पुन्हा त्याच जागी आल्या.

प्लास्टिकचा धोका रोखण्यासाठी शासनाने त्यावेळी जोरदार प्लास्टिक मुक्त मोहीम सुरू केली. मोहिम अंशतः यशस्वी ठरली खरी, मात्र कोरोना काळापासून आजपर्यंत मोहिमेत पुन्हा खंड पडला आहे. अशात सध्याच्या काळात प्लास्टिकचा वापर खूपच वाढला आहे. मुख्य बाजारपेठ पेण शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेला हरताळ फासला गेला. आधीच रस्त्यावर पडलेले खड्डे, विविध अर्धवट विकासकामे, भुयारी गटार योजना कामात पेण न.प. प्रशासन प्लास्टिक मोहीम नव्याने राबवण्यात अपयशी ठरली. आता नगरपरिषदेला पूर्णवेळ जीवन पाटील हे मुख्याधिकारी लाभले आहेत. त्यामुळे मुख्यत: प्लास्टिक बंदी मोहीम अधिक क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षा असतानाच मोहिमेला ब्रेक दिला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, नवे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. यापुढे आपण शहर प्लास्टिक मुक्त मोहीम अधिक प्रभावी करणार आहोत. याअगोदर अनेकदा कारवाई केली. अजूनही प्लास्टिक विक्री व वापर सुरू आहे, त्यावरही कारवाई सुरू करू, असे पाटील यांनी सांगितले.

कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणावर हातोडा

कर्जत (वार्ताहर) : मुरबाड राज्यमार्गावरील चारफाटा येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवावीत यासाठी नारी शक्ती संघटनेने आमरण उपोषण केले होते. तसेच, त्यानंतर पाठपुरावाही सुरूच ठेवल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने या दुकानांवर हातोडा फिरवला. त्यामुळे कर्जतकरांनी समाधान व्यक्त केले.

सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अक्षय चौधरी चारफाटा येथे कारवाईसाठी आले असता राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते जमवत अतिक्रमण कारवाईला जोरदार विरोध दर्शवला. दुसरीकडे काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या कारवाईचे समर्थन करत अतिक्रमण हटवली गेली पाहिजेत, अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह दिसून आले.

कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कर्जत चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणात बेकायदा हॉटेल्स, दुकाने उभारण्यात आली आहेत. येथून ये-जा करणारे वाहनधारक नाश्त्यासाठी, खरेदी करण्यासाठी रस्त्यातच वाहने उभी करत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते. अगदी रुग्णवाहिकेलाही या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. त्यामुळे सदर अतिक्रमण हटवण्याची मागणी कर्जतकरांच्या वतीने नारी शक्ती संघटनेने आमरण उपोषण करून केली होती. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे हटवण्यास चारफाटा येथे आले असता राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकत अतिक्रमण तोडण्यास तीव्र विरोध केला. घारे यांच्या कृतीवर कर्जतकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वाहतुकीस अडथळा 

कर्जत चारफाटा हा चौक असून येथून कर्जत-मुरबाड, कर्जत-नेरळ-माथेरान, कर्जत-भिसेगाव रेल्वेस्थानक, कर्जत-चौकमार्गे मुंबई, पुणे महामार्गाला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यात मुरबाड एमआयडीसीकडे जाणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे हे अतिक्रमणे वाहतुकीस अडथळा ठरत आहे.

कर्जत राष्ट्रवादीतच दोन गट?

माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी नारी शक्तीच्या उपोषणाला पाठिंबा देत अतिक्रमण हटवण्यास जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मात्र, त्यांच्याच पक्षाचे सुधाकर घारे यांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध करत दबाव टाकल्याने घारे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला सुरू झाल्या.

२०१८ पासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. आज (गुरुवारी) जी कारवाई करण्यात येत आहेत ती फक्त चारफाटा येथील ब्लॅक स्पॉट लिस्टमध्ये नावे असणाऱ्या अतिक्रमणधारकांवरच करण्यात येणार आहे. – अक्षय चौधरी, उपअभियंता, सा. बां. विभाग कर्जत

कर्जत हे पर्यटक केंद्र म्हणून विकसित होत आहे. तसेच, चारफाटा हे कर्जतचे मुख्य प्रवेशद्वार आहे. भविष्यात कर्जत हे पर्यटन केंद्र म्हणून अधिक नावारूपाला येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत. त्यामुळे कर्जत शहरात प्रवेश करणारा तसेच नेरळ-माथेरानकडे जाणारा रस्ता प्रशस्त खुला असावा. – महेंद्र थोरवे, आमदार, कर्जत विधानसभा मतदार संघ