सोमय्या यांची अजित पवारांविरोधात ईडीकडे तक्रार

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबतचे कागदपत्र ईडीकडे सादर केले आहेत. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर बेनामी पद्धतीने ताबा मिळवला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यातील घोटाळ्याबाबतचा पुरावा सादर केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिली असून पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी नाव का दिले असा प्रश्न उपस्थित करतानाच, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाल्यापासून हजारो कोटींची माया गोळा केली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी दिलेल्या कागदपत्रांवर चौकशी करत असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमैया यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. मात्र किरीट सोमैया हे ईडी कार्यालयात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याआधीही किरीट सोमैया यांनी काही नेत्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार करणाऱ्यांपैकी बरेचसे नेते आज भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्या तक्रारींबाबत किरीट सोमैया यांनी काय केले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

राजकीय दबावामुळे आश्रय योजनेतील प्रस्ताव मागे

भाजपचा आक्षेप

मुंबई (प्रतिनिधी) : पुनर्विकासाच्या आश्रय योजनेअंतर्गत पालिकेतील सफाई कामगारांच्या माहिम आणि प्रभादेवी येथील वसाहतींचा प्रस्ताव बुधवारी प्रशासनाने स्थायी समितीतून मागे घेतला आहे. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यात १२पैकी केवळ एक कंपनी मराठी होती. नेमका तोच प्रस्ताव प्रशासनाने मागे का घ्यावा, असा प्रश्न भाजपने विचारला आहे.

आश्रय योजनेअंतर्गत माहिम आणि प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे कंत्राट बी.जी. शिर्के या कंपनीला देण्यात येणार होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र, या प्रस्तावातील त्रुटींवर आक्षेप घेत तो प्रस्ताव स्थायी समितीने पुन्हा प्रशासनाकडे पाठवला. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेवर भाजपने आक्षेप घेतला. प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी कोठतेही ठोस कारण दिले नाही. प्रशासकीय कारणामुळे प्रस्ताव मागे घेतला जात आहे असे सांगण्यात आले. यामुळे मराठी कंपनीचा प्रस्ताव मागे का घेतला जात आहे, त्याची ठोस कारणे देणे गरजेचे आहे, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

तर केवळ शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे आयुक्तनि प्रस्ताव मागे घेतला असल्याचे भाजप प्रवक्ता, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. कारण यात केवळ एकच कंपनी ही मराठी होती आणि असे असताना ही कोणतेही कारण न देता हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत निखिल भगतला तीन सुवर्ण

ठाणे (प्रतिनिधी) : अमेरिकेतील इल्लिनॉईस येथे झालेल्या एडब्लूपीसी २०२१ जागतिक स्तरावरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ठाण्याचा ३० वर्षीय पॉवरलिफ्टर निखिल हेमंत भगतने सलग दुसऱ्या वर्षी (२०२०-२०२१) तीन सुवर्णपदकांची कमाई केली.

७५ किलो वजनी गटात निखिल भगतने स्कॉटमध्ये १९०, बेंचप्रेसमध्ये ११० तसेच डेडलिफ्टमध्ये २०० असे एकूण ५०० किलो वजन उचलताना तिन्ही पदकांवर नाव कोरले. गतवर्षी, तिन्ही प्रकारात निखिलने अनुक्रमे १७५, १०५ आणि १९० किलो असे एकूण ४७० किलो वजन उचलले होते. यंदा त्याने त्याने स्वतःचेच विक्रम मोडीत काढले. माझ्या यशात विद्यमान प्रशिक्षक व्हिन्सेंट फालझेट्टा व जागतिक पॉवरलिफ्टिंग काँग्रेसच्या भारत शाखेचे अध्यक्ष दलजीत सिंग यांचे मौलिक मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. तिन्ही गटात सलग दुसऱ्या वर्षी तिरंगा फडकत ठेवला. याचा एक भारतीय म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो, असे निखिलने म्हटले.

धोनीसोबतच्या तुलनेवर ऋतुराजचे स्पष्टीकरण

पुणे (प्रतिनिधी) : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच्या केलेल्या तुलनेवर युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने स्पष्टीकरण दिले आहे. हे माझ्यासाठी आश्चर्यजनक आहे. त्याला त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवर रैना आणि उथप्पावर विश्वास ठेवायचा नाही. परंतु त्याने आतापर्यंत ज्यामुळे यश मिळवले आहे तेच करत राहण्याचा प्रयत्न करेल, यावर जोर दिला, असे चेन्नईच्या युवा स्टारने म्हटले आहे.

आयपीएल सामन्यादरम्यान, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पाने ऋतुराजच्या शांत स्वभावाची तुलना एमएस धोनीशी केली. आयपीएल २०२१ मध्ये चेन्नईच्या जेतेपदात महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड चमकला. त्याने पंजाब किंग्जच्या लोकेश राहुलला मागे टाकत या मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तसेच मानाची ऑरेंज कॅपही मिळवली. लोकेशने राहुलने या हंगामात ६२६ तर ऋतुराजने ६३५ धावा केल्या.कोलकाता नाट रायडर्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऋतुराजने झटपट ३२ धावा करताना राहुलवर मात केली. ऋतुराज ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

डहाणूखाडी पूल बनला मासे सुकवण्याचा ओटा

डहाणू (वार्ताहर) : डहाणू-पालघर तालुक्याला जोडणाऱ्या खोंडा खाडीवर असणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंकडील फुटपाथचा मासळी सुकवण्याचा ओटा केल्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय निर्माण झाली आहे.

डहाणू आणि पालघर तालुक्यांना जोडणाऱ्या धाकटी डहाणूच्या खोंडा खाडीवर ४०० मीटर लांबीचा दक्षिणोत्तर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंला जनतेला जाण्या-येण्यासाठी दीड मीटर रुंदीचा फूटपाथ आहे. पालघर हे जिल्हा मुख्यालय झाल्याने या पुलावरून हजारो मोठ-मोठ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय, डहाणूच्या रिलायन्स एनर्जीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राख भरून वीस वीस टन वजनाचे डंपर सतत येत जात असतात. त्यामुळे पुलालाच थोका निर्माण झाला आहे,असे असले तरी नागरिक वाहनांच्या भीतीने फुटपाथवरून प्रवास करत असतात.

धाकटी डहाणू येथील काही मच्छीमार महिला या फुटपाथवर बिनदिक्कत करंदी, जवळा, फुकट अशी लहान-लहान मच्छी सुकत टाकून फुटपाथ सतत भरलेला असतो. त्यामुळे सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची आणि संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यास येणाऱ्या पर्यटकांची फारच अटचण होते. शिवाय, काही लोकांना ह्या सुकत टाकलेल्या माशांचा वास सहन होत नसल्याने त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागतो.

आता तर पुलाच्या उत्तरेकडील तडीयाळे तलावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेवरच बोंबील मासे सुकवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बांबूच्या माळी (ओलाणी) घालून त्यावर बोंबील सुकवले जातात. मात्र, बोटीतून येणारे ओले बोंबीलाच्या राशी या रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे वाहनांना, प्रवाशांना त्रास होतोच, शिवाय सततच्या पाण्याने या रस्त्यावरही खड्डे पडत असतात याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरुस्ती सुरू

नीलेश कासाट

कासा : डहाणू-जव्हार या राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात खड्डे पडत असून मोठ्या रहदारीचा हा मार्ग असल्याने अनेक वाहनचालकांना यामुळे त्रास होत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झालेले आहेत. ह्या बाबतची बातमी ‘दै. प्रहार’ने प्रकाशित केली होती. अखेर दि. १९ ऑक्टोबरपासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार पडलेल्या पावसामुळे कासा ते डहाणू दरम्यान रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले होते तर, अनेक वाहनचालकांची वाहने नादुरुस्त झाली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून नागरिक व वाहनचालक या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत होते. अखेर मंगळवारी या मोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम खात्याने हाती घेतले. डंपर, रोलर व अनेक मजूरांच्या साहाय्याने त्यांनी डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.

डहाणू-नाशिक हा राज्यमार्ग असून मोठी रहदारी या नियमित रस्त्यावर असते. त्यात कासा ते डहाणू रस्त्यावर वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. डहाणू येथे मोठी बाजारपेठ असल्याने अनेक खेडोपाड्यातील नागरिक खरेदीसाठी या रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे या रस्तावर नेहमी वर्दळ असते.

गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या तक्रारी येत होत्या. सध्या मोठे खड्डे भरण्याचे काम सुरू असून लवकरच हा रस्ता पूर्ण डांबरीकरण केला जाणार आहे. यासाठीची निविदा काढली आहे. – धनंजय जाधव, अभियंता, बांधकाम विभाग डहाणू

अनेक दिवसांच्या मागणीने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले. नुसते खड्डे भरून चालणार नाही, तर हा पूर्ण रस्ताच डांबरीकरण केला पाहिजे. – अशोक भोईर, सामाजिक कार्यकर्ते

हे बोलघेवड्यांचे सरकार – देवेंद्र फडणवीस

ठाणे (वार्ताहर) : राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी महाविकास आघाडी सरकारच आहे. महाविकास आघाडी सरकार हे बोलघेवड्यांचे सरकार आहे. दररोज खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पद्धतीने मंत्र्यांकडून वक्तव्य केली जात आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढविला.

ओबीसी जागर अभियानाचा समारोप बुधवारी ठाण्यात करण्यात आला. त्यावेळी घेण्यात आलेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, किसन कथोरे, निरंजन डावखरे, कुमार ऐलानी, गणपत गायकवाड, प्रशांत ठाकूर, संजय कुटे, माजी मंत्री हंसराज अहिर, राम शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश उपाध्यक्ष माधवीताई नाईक, संदीप लेले, सचिन केदारी आदींची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाकडून १५ डिसेंबर २०१९ नंतर आठ वेळा राज्य सरकारच्या वकिलांना मागासवर्गीय आयोग निर्मितीबाबत सांगण्यात आले. मात्र, त्याची महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली नाही. या काळात १५ महिने खोटं बोलून राज्य सरकारचे मंत्री मोर्चे काढत होते. केंद्र सरकारकडे बोट दाखवत खोटं बोलण्याची मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. काही मंत्री, तथाकथित विचारवंत यांच्यामार्फत इको सिस्टीम तयार केली गेली. त्यातून अपप्रचार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाकडून केवळ राजकीय मागासलेपणाचा डेटा मागितला जात असताना मंत्र्यांनी खोटं बोलून ओबीसी समाजाची दिशाभूल केली.’

महाराष्ट्रातील ओबीसींवर राजकीय आरक्षणात अन्याय झाला. मात्र, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले. महाविकास आघाडीचे करंटेपण, नाकर्तेपण आणि दुर्लक्षामुळे ओबीसींचे आरक्षण हिरावले गेले, असा आरोप फडणवीस यांनी केला.
ओबीसींच्या हिताचा महाविकास आघाडी सरकार विचार करीत नाही. ओबीसींना न्याय मिळाल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

‘मंत्र्यांचे कोणीही ऐकत नाही’

ओबीसींच्या हितासाठी भाजपने सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. ओबीसीवरील अन्यायाबाबत महाविकास आघाडीमधील मंत्री गप्प आहेत. त्यांच्याकडून खासगीत ‘आमचे म्हणणे कोणीही ऐकत नाही’, अशी व्यथा सांगितली जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कचऱ्याबाबत जनजागृतीसाठी डोंबिवलीत पथनाट्य

प्रशांत जोशी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न जैसे थे असून, येथील कचऱ्यासंदर्भातील जनजागृतीसाठी सर्व सामाजिक संस्था आणि मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पथनाट्याचे सादरीकरण केले.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेकवेळा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी हा प्रश्न तसाच आहे. डोंबिवली पूर्व येथील पांडुरंग वाडी चौकात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात होता. हा परिसर स्वच्छ राहावा यासाठी विविध संस्थानी पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मार्शलची नेमणूक केली आहे. यावेळी महापालिका या परिसरात डांबरिकरण करून देईल, असे आश्वासन महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे यांनी यावेळी दिले

अनेक वेळा विविध उपक्रम राबवून देखील महापालिकेच्या उपक्रमांना यश येत नसल्याने डोंबिवलीतील सामाजिक संस्था कचरा प्रश्न सोडवण्यासाठी एकवटल्या आहेत. कचरा घंटा गाडीतच टाकावा, अशा सूचना देतानाच या परिसरात काही सुशोभीकरण व्हावे जेणेकरून नागरिक कचरा फेकणार नाहीत, अशी मागणी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि स्वच्छ डोंबिवली उपक्रमातील अनिल मोकल यांनी ग प्रभागाचे प्रभारी अधिकारी सुहास गुप्ते यांच्याकडे केली.

यावेळी सुहास गुप्ते यांनी पथनाट्य करणारे २० विद्यार्थी असून असे १००० विद्यार्थी तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करून रस्त्यात थुंकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा इतस्ततः फेकू नका असा संदेश दिला. यावेळी प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाई वाले स्वच्छ डोंबिवली अभियानाचे अनिल मोकल, आजूबाजूच्या परिसरात राहणारे रहिवासी उपस्थित होते.

मीरा-भाईंदर सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सहापैकी सहा जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत ९५ नगरसेवक असून त्यात भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेसचे १२ असे संख्याबळ आहे. तर ६ प्रभाग समिती आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने सर्व समिती सभापतीपदी भाजपचे उमेदवार निवडून येतील, असे संख्याबळ प्रत्येक समितीत होते.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन निवडणूक पार पडली. त्यात प्रभाग समिती क्र.१ मध्ये नयना म्हात्रे, प्रभाग २ मध्ये पंकज पांडे, ३ मध्ये गणेश शेट्टी, ४ मध्ये डॉ. प्रीती पाटील, ५ मध्ये अनिल विराणी, तर ६ मध्ये मोहन म्हात्रे असे सहा भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे पिठासन अधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केले. त्यात पंकज पांडे आणि अनिल विराणी बिनविरोध निवडून आले.

आशा सेविकांचा कल्याण-डोंबिवली मनपावर मोर्चा

कुणाल म्हात्रे

कल्याण : आपल्या विविध मागण्यांसाठी गट प्रवर्तक व आशा सेविकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर धडक देत मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या माध्यमातून हा मोर्चा काढत शासनाच्यावतीने देण्यात आलेली थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना मध्यवर्ती सरकारकडून देण्यात येणारे माहिती अहवाल अचूक संकलनाचे दरमहा दोन हजार रुपये एप्रिल २०२९ पासून दिले गेले नाहीत, ते त्वरित देण्यात यावेत. राज्य सरकारने १७ जुलै २०च्या शासन आदेशानुसार गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये व आशा स्वयसेविकांना दोन हजार रुपये मानधनवाढ केली आहे. एप्रिल २०२१ पासून ही मानधनवाढ आजपर्यंत दिली नाही. ती ताबडतोब देण्यात यावी.

राज्य सरकारने ९ सप्टेंबर २०२१च्या शासन आदेशानुसार १ जुलै २०२१ पासून गटप्रवर्तकांच्या मानधनात बाराशे रुपये व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ केली आहे. कोरोना महामारी असेपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दरमहा ५०० रुपये कोरोना भत्ता देण्याचे मान्य केले आहे. ही रक्कम गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना ताबडतोब देण्यात यावी.

कल्याण-डोंबिवलीमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मागील वर्षी दिवाळी भाऊबीज दोन हजार रुपये महानगरपालिकेने जाहीर केले होते, ती रक्कम आजपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना देण्यात आली नाही. ही रक्कमही आशा स्वयंसेविकांना यावर्षी देण्यात यावी व या दिवाळीला गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना १० हजार रुपये दिवाळी भाऊबीज (बोनस) देण्यात यावेत. तसेच मोबाईल रिचार्जचे पैसे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दिले गेले नाही, ते थकबाकीसह देण्यात यावेत.

आशा स्वयंसेविकांना ज्या कामाचा मोबदला नाही, ते काम सांगू नये किंवा मोबदल्याविना काम देऊ नये. या व इतर मागण्यांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर मोर्चा काढला असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष भगवान दवणे यांनी सांगितले.