न्यूझीलंडच्या दृष्टिक्षेपात आयसीसीचे सलग दुसरे जेतेपद

दुबई (वृत्तसंस्था) : यूएईत सुरू असलेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलेल्या न्यूझीलंडच्या दृष्टिक्षेपात वर्षभरातील आयसीसीचे सलग दुसरे जेतेपद आहे.

केन विल्यमसन आणि सहकाऱ्यांनी पहिल्यावहिल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. साउथम्पटनमध्ये (इंग्लंड) झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी भारतावर विजय मिळवला. त्यानंतर टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. त्यामुळे किवींच्या आवाक्यात वर्षभरात आणखी एक आयसीसी ट्रॉफी पटकावण्याची संधी आहे. न्यूझीलंडने तशी कामगिरी साकारली, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो एक मोठा विक्रम ठरेल.

शेवटच्या तीन ओव्हर्स निर्णायक

सध्या सुरू असलेल्या सातव्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरी पाहता उपांत्य फेरीत माजी विजेता इंग्लंडला सहज हरवणाऱ्या न्यूझीलंडने सर्व आघाड्यांवर चांगला खेळ केला आहे. सुपर-१२ फेरीतील पाचपैकी चार सामने जिंकून ग्रुप-२मध्ये दुसरे स्थान पटकावून किवींनी सेमीफायनल प्रवेश केला. सुपर-१२ फेरीत गोलंदाजांनी तारले तरी इंग्लंडविरुद्ध डॅरिल मिचेल (४७ चेंडूंत नाबाद ७२ धावा), डेवॉन कॉन्व्हे (३८ चेंडूंत ४६ धावा) आणि जेम्स नीशॅमने (११ चेंडूंत २७ धावा) दाखवलेली जिगर उल्लेखनीय आहे. न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी २४ चेंडूंत म्हणजे ४ षटकांत ५७ धावांची आवश्यकता होती. चेंडू आणि धावांमध्ये जवळपास दुपटीचा फरक असला तरी टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये एक-दोन ओव्हर्समध्ये जास्त धावा फटकावल्यास समीकरण बदलू शकते. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तेच केले. १७व्या षटकात वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनच्या ओव्हरमध्ये २३ धावा निघाल्या. यंदाच्या वर्ल्डकपमधील ही सर्वात महागडी ओव्हर ठरली. लेगस्पिनर अब्दुल रशीदच्या पुढील षटकांत १४ धावा मिळाल्या. १२ चेंडूंत जिंकण्यासाठी २० धावा असताना याच ओव्हरमध्ये विजयावर शिक्कामोर्तब करण्याचे किवींच्या फलंदाजांनी ठरवले. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने टाकलेल्या १९व्या षटकात डॅरिल मिचेलने तेच केले.

संयम शिकावा मिचेलकडून

इंग्लंडचे १६७ धावांचे आव्हान एक ओव्हर राखून पार करण्यात न्यूझीलंडला यश आले. त्यात सलामीवीर डॅरेल मिचेलचे मोठे योगदान राहिले. त्याने ४७ चेंडूंत नाबाद ७२ धावांची खेळी करताना सामनावीराचा पु्रस्कार पटकावला. मात्र, १६वे षटक संपले तेव्हा मिचेल हा ४० चेंडूंत ४६ धावांवर खेळत होता. पुढील ७ चेंडूंत त्याने २८ धावा फटकावल्या. त्याच्याआधी जेम्स नीशॅमने (११ चेंडूंत २७ धावा) फटकेबाजी केली. मात्र, तो बाद झाल्यानंतर शांत आणि संयमी मिचेलने टॉप गियर टाकला. अन्य फलंदाज खेळत असताना डॅरिलने एक बाजू लावून धरली. न्यूझीलंडला अशाच फलंदाजाची गरज होती.

विराट कोहली आणि रवी शास्त्री : भारतासाठी ठरली हिट जोडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते, तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपुष्टात आला. शास्त्री-कोहली यांचा कार्यकाळ भारतीय क्रिकेटसाठी लक्षणीय ठरला आहे.

शास्त्री-कोहली यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. २०१७ साली भारताने श्रीलंकेला ३-० असा क्लीन स्वीप दिला. तसेच पहिल्यांदाच वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकताना विंडीजला व्हाईटवॉश दिला. इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी ऐतिहासिक आघाडी घेतली.

इंग्लंडमधील आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. साखळी फेरीत सर्वोत्तम संघ ठरताना भारताने अव्वल स्थान मिळवले; परंतु उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्कारावा लागल्याने भारताला स्पर्धेबाहेर जावे लागले. शास्त्री यांच्या पदाची जबाबदारी घेण्यास राहुल द्रविड सज्ज झाले असून भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माकडे आली आहे.

कसोटी उपविजेतेपद

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे आव्हान मोडून काढत भारतीय क्रिकेट संघाने यावर्षी झालेल्या पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याचा पराक्रम भारतीय संघाने सलग दोनवेळा केला. शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने २०१८-१९मध्ये सर्वप्रथम बाजी मारली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला. यानंतर २०२०-२१ सत्रात पुन्हा भारताने कांगारुंना त्यांच्याच देशात धूळ चारली. यावेळी पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कोहलीने माघार घेतली. मात्र शास्त्री यांचे मार्गदर्शन आणि अजिंक्य रहाणेचे शांत नेतृत्व या जोरावर भारताने सलग दुसऱ्यांदा कांगारुंचा पराभव करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली.

राणीबागेत १० दिवसांत ५१ हजार पर्यटकांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले. त्यातच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणी बाग पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. दरम्यान १० दिवसांत ५० हजार ७९६ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली आहे.

कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर १ नोव्हेंबरपासून राणी बाग सुरू करण्यात आली आहे. १ ते १० नोव्हेंबर या १० दिवसांत तब्बल ५० हजार ७९६ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. या १० दिवसांत मुंबई महापालिकेच्या तिजोरीत पर्यटकांच्या माध्यमातून तब्बल २१ लाख १८ हजार ३७५ रुपयांचा महसूल जमा झाल्याचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

गेल्यावर्षी २३ मार्च २०२० पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर १५ फेब्रुवारी २०२१पासून उद्यान पर्यटकांसाठी कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि ४ एप्रिलपासून पुन्हा उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. मात्र आता कोरोनाची दुसरी लाटही पूर्ण आटोक्यात आल्याने निर्बंधही शिथिल करण्यात आले असून उद्यान व प्राणिसंग्रहालय १ नोव्हेंबरपासून पुन्हा खुले करण्यात आले आहे.

पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर सकाळी ६ ते ८.३० पर्यंत मॉर्निंग वॉकसाठी उद्यान खुले राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे किंवा विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरसेवक वाढीच्या निर्णयावर अद्याप अध्यादेश नाही!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील नऊ प्रभाग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र याबाबत अद्यापही आदेश प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तसेच निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करता येऊ शकते. यामुळे पुन्हा सर्व आखणी नव्याने करावी लागणार असल्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बुधवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबईतील महानगर पालिकेचे नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ वर जाणार आहे. यात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्यापही राज्य सरकारकडून अध्यादेश प्रसिध्द केलेला नाही. अध्यादेश प्रसिद्ध झाल्याशिवाय इतर निर्णय घेता येणार नाही.

तसेच अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबईतील प्रभागांची रचना, आखणी कशी करायची? याबाबतच्या सूचना निवडणूक आयोग करणार आहे. त्यानंतर पालिका प्रत्यक्ष कामाला लागेल. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

वांद्रे रेल्वे स्थानक सुशोभीकरणात फेरीवाल्यांचा अडथळा

मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच पुन्हा फेरीवाल्यांनी स्थानकाला वेढा घातला आहे. मात्र यामुळे स्थानिकांची आणि प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. यासाठी भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला.

सध्या वांद्रे परिसरात रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र याच वेळी फेरीवाल्यांकडून पुन्हा एकदा स्थानकाला वेढा घालण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. हे लक्षात येताच भाजप आमदार आशीष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली असून याबाबत लवकरच पालिका, अधिकृत फेरीवाले, रिक्षा आणि रेल्वे याची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.

वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक आमदार अॅड. आशीष शेलार यांनी पाठपुरावा सुरु केला होता. रेल्वे, पालिका जागेच्या हद्दीचे वाद, फेरीवाल्यांनी घातलेला वेढा, त्यामुळे अपुरी जागा, त्याच ठिकाणी असलेला बस स्टॉप, रिक्षा स्टँड या सर्व विषयांवर मार्ग काढत या सुशोभीकरणाचा प्लॅन तयार करण्यात आला होता. त्यांनतर अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई देखील करण्यात आली होती. त्यातून मार्ग काढून २०१९ ला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली; मात्र कोरोना काळात पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण सुरु केले असून रिक्षा आणि बस यामुळे स्थानकातून बाहेर पडणे पुन्हा त्रासदायक होऊ लागले. त्यातच रेल्वे आपल्या हद्दीत पादचारी पुलाचे काम करत असून त्या कामातील भंगाराचे गोडाऊन याच परिसरात बांधण्यात आले आहे. तर एकच मार्ग स्थानकात जाण्यास उपलब्ध ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने शेलार यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त मसुरकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्याच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

कंटेनर थिएटर डिसेंबरमध्ये सुरू होईल

आमदार नितेश राणे यांची ग्वाही

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपालिकेवर २२ वर्षे सत्ता उपभोगून देखील शहराचा विकास करू न शकलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून सावंतवाडीकर नागरिकांनी पालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिली. त्यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. आम्ही सावंतवाडीकरांना दिलेले सगळे शब्द पूर्ण करणार असून येत्या डिसेंबरमध्ये कंटेनर थिएटर सुरू होईल, अशी ग्वाही आ. नितेश राणे यांनी दिली.

सावंतवाडी शहराच्या दौऱ्यावर आलेल्या आमदार नितेश राणे यांनी केसरकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर केले. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत आम्ही सावंतवाडीकर जनतेकडे ७२० दिवस मागितले होते. त्याला प्रतिसाद देत सावंतवाडीकरांनी आमचा नगराध्यक्ष निवडून देत सत्ता भाजपच्या ताब्यात दिली. त्यामुळे त्या निवडणुकीत सावंतवाडीकरांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. आम्हाला दिलेल्या कालावधीत कोरोना महामारीचे संकट असूनदेखील नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व बंद प्रकल्प पुन्हा मार्गी लावले.

कोरोनामुळे सिनेमा व नाट्यगृह यांना बंदी होती. ही बंदी आता उठली आहे. त्यामुळे कंटेनर थिएटरचा आम्ही दिलेला शब्द देखील पूर्ण होणार असून येत्या डिसेंबरमध्ये कंटेनर थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद सावंतवाडीकर नागरिक घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दुरुस्ती कामानिमित्त वर्सोवा पूल तीन दिवस बंद

अनिकेत देशमुख

भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदरजवळील वरसावे नाका येथील जुन्या खाडी पूलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्सोवा पुलावर दुरुस्तीचे काम करायचे असल्याने १३ ते १५ नोव्हेंबर असे तीन दिवस वर्सोवा पुलावरून जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडून यादरम्यान वाहतूक नियमनाचे नियोजन करण्यात आले आहे.

वर्सोवा पुलावरील वाहतूक बंद असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिक, पर्यटकांनी या भागातील प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.

पुलावरून जाण्याकरिता वाहनांना एकच लेन शिल्लक असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. जुन्या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने गुजरातच्या दिशेने जात असतात. यामुळे अवजड वाहनांना वरसावे पुलावरून मार्गस्थ होऊ न देता दुसऱ्या पर्यायी मार्गाने मार्गस्थ केल्यास बहुतांश वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल.

दहिसर – सुरत मार्गावरील पहिली मार्गिका ३ दिवस बंद असल्याने लगतच्या दुसऱ्या मार्गिकेवरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जुन्या पुलावरून काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाणे शहर हद्दीतून वरसावे मार्गे पालघरकडे येणारी वाहने पर्यायी मार्ग म्हणून मुंब्रा खरेगाव टोल नाका मानकोली अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.

आश्रमशाळेच्या बांधकामात अफरातफर?

पालघर जिल्हा विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपोषण

जव्हार (वार्ताहर) : जव्हारसारख्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षित करून या भागाचा विकास होईल यासाठी राज्य शासनाच्या वतीने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार कार्यलयाच्या माध्यमातून अनेक शासकीय आश्रम शाळांचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामामध्ये प्रचंड अनियमितता असतानाही ठेकेदाराला आदिवासी विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या अधिकारी वर्गाने संगनमताने चार कोटी रुपये इमारत बांधकाम पूर्ण होताच अदा केले आहे. ही बाब पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी संघटनेने उचलून धरत दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल करा आणि रक्कम वसुली करा, यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हा सर्व पदाधिकारी एकत्र येऊन लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे.

कोरोनापश्चात आता शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण देण्याच्या कामात शासकीय आश्रम शाळांमध्ये सुरुवात झाली आहे. प्रकल्पामध्ये वाडा तालुक्यातील गुहीर आश्रम शाळेत इमारत बांधकाम करण्याच्या नावाखाली चार कोटी रुपयांचा अवास्तव खर्च करूनही इमारत बांधकाम अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने त्या ठिकाणची शिक्षणव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ठोस उपाययोजना होऊन आदिवासींना शिक्षण मिळावे, हा उद्देश साध्य होण्यासाठी या प्रकरणात दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे मनसे सचिव सतीश जाधव यांनी सांगितले.

प्रकल्प अधिकारी आज करणार चर्चा

दरम्यान, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रकल्प अधिकारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले असून उद्या (शुक्रवारी) आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात चर्चा केली जाणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत जे दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. – ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष, मनविसे, पालघर जिल्हा

भिवंडी फेणेपाडा येथील रहिवासी पाण्यापासून वंचित

मोनिश गायकवाड

भिवंडी : भिवंडी फेणेपाडा मनपा शाळेजवळील दिवंगत पैलवान बाळू ठाकूर चाळीतील रहिवाशांना गेले अनेक महिने पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी सकाळी उठून दूर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे.

भिवंडी महानगरपालिका हद्दीतील फेणेपाडा या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील महिलांना अनेक ठिकाणी जाऊन जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पाणी आणावे लागत आहे. पिण्यासाठी दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. महानगर पालिका हद्दीतील या भागातील रहिवाशांकडून महानगरपालिका कर आकारणी करते; परंतु त्यांना आजही ज्या मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, त्यापासून हे आजही वंचित राहिले आहेत. पैलवान बाळू ठाकरे चाळीतील व परिसरातील रहिवासी हे गरीब असल्याने त्यांना या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भिवंडी महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने या नागरिकांनी अनेक अर्ज व निवेदने महानगरपालिकेच्या विविध विभागात व आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांना देऊनदेखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

दरम्यान पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर महानगरपालिकेवर मोर्चा काढणार, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

कोरोना काळातील खरेदी, ‘श्वेत पत्रिका’ हवीच

अचानक उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या भीषण संकटाच्या काळात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. उद्योग – व्यवसायासह सर्वच क्षेत्रात लॉकडाऊनमुळे मोठे शैथिल्य आल्याने लोकांचे व्यवसाय ठप्प झाले. रोजगार बुडाले. कोरोनाचे संकट आणि दहशतच एव्हढी भीषण होती की, स्वत:चा आणि संपर्कात येणाऱ्या सर्वांचाच जीव वाचावा यासाठी निर्बंधांचे पालन करीत प्रत्येकजण आपापल्या घरात बंदी झाला. यावेळी सर्वात मोठी आणि महत्त्वाची कामगिरी ही आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य सेवकांनी, स्वच्छतादूतांनी बजावली. या सर्वांनी जीवावर उदार होत समाजासाठी फार मोठे योगदान दिले. अशा प्रकारे कोरोना महामारीच्या संकट काळात अनेकांनी झोकून देऊन कामगिरी केली. त्या सर्वांचेच समाजावर फार मोठे ऋण आहेत आणि ते सारेच कौतुकासही पात्र आहेत. मात्र त्याचवेळी या संकटाकडे गैरमार्गाने कमाई करण्याची एक संधी म्हणून ज्यांनी पाहिले आणि हात धुवून घेतले त्यांचा पर्दाफाश झालाच पाहिजे. तर काहींनी कर्तव्यात कसूर करत कोरोना संकट गहिरे होण्यास जणू हातभार लावला असेच म्हणावे लागेल.

अशीच काहीशी घटना कोकणातील सिंधुदुर्गात घडल्याचे वृत्त आहे. कोरोनाचा धोका आता हळूहळू कमी होत चालला असून बरेचसे व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी रेड झोनमध्ये असलेला सिंधुदुर्ग जिल्हाही आता पूर्वपदावर येत असून येथील व्यवहार आता गती घेऊ लागले आहेत. अशातच जिल्ह्यात ३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत २ हजार ‘आरटीपीसीआर टेस्ट’चे सॅम्पल असेच पडून आहेत व त्याचे रिपोर्ट अद्याप मिळाले नसल्याचा गौप्यस्फोट स्थानिक भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे.

कारण जिल्हा प्रशासनाकडून दररोज कोरोना टेस्टबाबतचा दिला जाणारा आकडा बोगस असल्याचे त्यावरून दिसत आहे. ‘आरटीपीसीआर टेस्ट’बाबतचे हे वृत्त खरे असेल, तर त्यामुळे धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता अधिक आहे. कारण २ हजार टेस्टचे रिपोर्ट जर संबंधितांना मिळाले नाहीत, म्हणजेच सिंधुदुर्गात सॅम्पल घेतलेले २ हजार नागरिक सध्या समाजात बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यातील ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील आणि त्यांचा संसर्ग जर इतरांना झाला, तर कोरोनाबािधतांची संख्या आणि काहींच्या जीवाला धोकाही वाढू शकतो. या सर्व प्रकरणाला जबाबदार कोण? असा सवालही आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तथापि, कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट मिळालेले नाहीत, असे एक कारण येथे पुढे आले आहे. म्हणजेच सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार सुरू आहे.सत्ताधारी केवळ राजकारण करण्यात मश्गुल आहेत, असेच दिसते. त्यातूनच प्रशासनाकडून दररोज कोरोना टेस्टचा दिला जाणारा आकडाही बोगसच असणार आहे. आता या प्रकरणी कुठलीही लपवाछपवी न करता या २ हजार टेस्ट रिपोर्टबाबत सत्य माहिती प्रशासनाने जनतेसमोर ठेवावी, अशी समर्पक मागणीही आमदार नितेश राणे यांनी केली आहे. इतकेच नव्हे, तर कोरोनाच्या काळात आरोग्य क्षेत्रासाठी जी जी म्हणून खरेदी झाली आहे त्याचे ऑडिट हे झालेच पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याला कारण म्हणजे अहमदनगरमधील रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीची घटना होय.

कारण कोरोना काळात जी खरेदी झाली आहे, ती सदोष असण्याची शक्यता आगीसारख्या किंवा अन्य घटनांवरून दिसत आहे. म्हणूनच अहमदनगरसारख्या घटना भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये होण्याची भीती वर्तविली जात आहे. या काळात १६ कोटी, २० कोटी किंवा २२ कोटी अशी जी काही खरेदी झाली आहे, त्यातील बहुतेक गोष्टी फक्त कागदावरच दिसत आहेत व प्रत्यक्षात साधनसामग्री त्या त्या ठिकाणी आहेत, असे दिसत नाही. त्यामुळे कोरोना काळात राज्यभरात जी काही खरेदी झाली आहे त्याची एक ‘श्वेत पत्रिका’ निघालीच पाहिजे आणि त्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतःहून ही श्वेत पत्रिका जाहीर करावी, असे आव्हानच आमदार नितेश राणे यांनी दिल्याने ज्यांनी कोणी घोटाळे केले असतील किंवा गैरव्यवहार कोले असतील त्यांची दातखिळीच बसेल यात वाद नाही. कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात आमदारांच्या निधीसह इतरही निधी आरोग्य क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. त्या निधीचा योग्य प्रकारे वापर झाला असेल, तर प्रश्नच नाही. मात्र काही शंकास्पद व्यवहार असतील, तर त्याबाबतची चौकशी होणेही क्रमप्राप्त आहे. तो निधी आणि शासनाने दिलेला निधी यांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या अनेक वस्तू, यंत्रसामूग्री यांची तपासणी करून त्यांचा ताळेबंद लावणे गरजेचे आहे. मात्र काही काळेबेरे झाले असल्यास हे प्रशासन आणि सत्ताधारी असा पारदर्शक कारभार दाखवू शकणार नाहीत. पण कोरोनासारख्या अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या महत्त्वाच्या आणि चिंताजनक कालखंडात आरोग्य क्षेत्रात जे काही व्यवहार झाले, ते सर्व काटेकोर आणि स्वच्छच आहेत हे सिद्ध करण्याची सत्ताधाऱ्यांचीच आहे आणि त्यासाठी त्यांनी एक ‘श्वेत पत्रिका’ ही काढायलाच हवी.