Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणप्लास्टिक बंद मोहिमेला ‘ब्रेक’

प्लास्टिक बंद मोहिमेला ‘ब्रेक’

पेण न. प. प्रशासन अपयशी की कोरोनामुळे प्लास्टिकला उभारी?

देवा पेरवी

पेण : दोन वर्षांहून अधिक काळ प्रभाव दाखवलेल्या कोरोनाने सामाजिक घडी अक्षरशः विस्कळीत केली आहे. अनेकांचे रोजगार गेले, व्यवसाय बुडाला. याउलट विविध प्रकारचे व्यवहार ठप्प झाल्याने ध्वनी, वायू प्रदूषणही कमी झाले. दुसरीकडे, लॉकडाऊन शिथिल होताच प्लास्टिक बंदी मोहिमेचा पेण नगरपरिषदेसह बहुतांश सर्वच विभागातील प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागाची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या पेण शहरातील बहुतेक दुकानदार, हातगाडी, मच्छी, मटण, फळे विक्रेते बिनधास्तपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी मोहिमेला ब्रेक लागल्याचे सर्वश्रुत आहे.

प्रारंभी काळात प्रभावी ठरलेली प्लास्टिक बंदी मोहिमेला सैलपणा आला. मुख्यतः पेण शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याने पेण नगरपरिषद प्रशासन कमालीचे अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पेण शहरासह तालुक्यातील सर्वच भागांत प्लास्टिकने जोरदर डोके वर काढले आहे. प्लास्टिकचा वापर रोखण्यात जिल्हा प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनही पूर्णत: अपयशी ठरले आहे. अशात संपूर्ण जगावर आलेल्या महाभयंकर संकट कोरोनाने प्लास्टिकला उभारी दिली की काय, असेच चित्र सध्या पेणमध्ये पाहायला मिळत आहे.

कोरोनाचे जाचक निर्बंध सध्या शिथिल झाल्याने या काळात प्लास्टिक बंदी मोहिमेला मोठी खिळ बसली. सर्व प्रकारचे प्लास्टिक किती धोकादायक आहे, हे नुकत्याच आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीने वारंवार दाखवून दिले. अनेक नाले, ओढे प्लास्टिकच्या साठ्यांनी चक्काजाम झाले. त्यातून पाण्याने मार्ग बदलत आपली अधिक ताकद दाखवून दिली. प्लास्टिक कचऱ्याने जमीन नापीक होत आहे. आज सर्वच रस्त्याच्या दुतर्फा, कालवा, गटारे, मैदाने प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांनी अक्षरश: विद्रुप झाले आहेत. ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांनी पाणी अडले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. महाड व इतर ठिकाणच्या महापुरात निसर्गाचे ‘टिट फॉर टिट’ रूप पाहायला मिळाले. फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पुन्हा त्याच जागी आल्या.

प्लास्टिकचा धोका रोखण्यासाठी शासनाने त्यावेळी जोरदार प्लास्टिक मुक्त मोहीम सुरू केली. मोहिम अंशतः यशस्वी ठरली खरी, मात्र कोरोना काळापासून आजपर्यंत मोहिमेत पुन्हा खंड पडला आहे. अशात सध्याच्या काळात प्लास्टिकचा वापर खूपच वाढला आहे. मुख्य बाजारपेठ पेण शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेला हरताळ फासला गेला. आधीच रस्त्यावर पडलेले खड्डे, विविध अर्धवट विकासकामे, भुयारी गटार योजना कामात पेण न.प. प्रशासन प्लास्टिक मोहीम नव्याने राबवण्यात अपयशी ठरली. आता नगरपरिषदेला पूर्णवेळ जीवन पाटील हे मुख्याधिकारी लाभले आहेत. त्यामुळे मुख्यत: प्लास्टिक बंदी मोहीम अधिक क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षा असतानाच मोहिमेला ब्रेक दिला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, नवे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. यापुढे आपण शहर प्लास्टिक मुक्त मोहीम अधिक प्रभावी करणार आहोत. याअगोदर अनेकदा कारवाई केली. अजूनही प्लास्टिक विक्री व वापर सुरू आहे, त्यावरही कारवाई सुरू करू, असे पाटील यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -