मृणालिनी कुलकर्णी
मुंबईकरांनो आता तब्येती सांभाळा! अति उकाडा आणि सर्वत्र चाललेल्या बांधकामामुळे हवा प्रदूषित झालेली आहे. उष्णतेच्या लाटेत यूरोप होरपळला. ग्रीसमध्ये पेटलेला वणवा… मिळालेल्या माहितीनुसार हवामान बदलाच्या २०२३ मधील तीन घटना – १) जगभरातल्या महासागरांत उष्णतेचा उच्चांक. २) अंटार्टिकामधील बर्फाच्या आवरणाचा नीच्चांक.
३) आजवरचा सर्वात उष्ण महिना जून…
“एल निनोला ही पॉसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहाची एक विशिष्ट स्थिती आहे. साधारणपणे एल निनोलाला सुरुवात झाली की जगभरांत तापमानात वाढ दिसून येते. हा परिणाम ५/ ६ महिन्यांनंतर दिसतो. अशा दुर्घटनेत स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलाशी असतो. हवामान बदलाचे हे प्रश्न ग्लोबल जरी असले तरी उपाययोजना स्थानिक स्वरूपात होतात. ग्लोबल वार्मिंग हा हवामान बदलाचा एक पैलू आहे. जागतिक हवामान बदल म्हणजे तापमान आणि हवामानातील दीर्घकालीन बदल होय. सूर्याच्या क्रियाकलापातील बदलामुळे, ज्वालामुखीचा उद्रेक या नैसर्गिक क्रिया आणि मानवाकडून जाळल्या जाणाऱ्या जीवाष्म इंधनाच्या हरितवायूमुळे तापमान वाढते. हवामान बदलाचा सकारात्मक – नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था २३ मार्च १९५० मध्ये स्थापन झाली. या संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या ३१ देशांत भारत होता. या संघटनेचे १९१ देश सदस्य असून मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हात आहे. ही संस्था प्रत्येक राष्ट्राकडून हवामान बदलाच्या सांख्यिकीचा अहवाल गोळा करते आणि नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेत, होणारी जीवित हानी वाचवते. तसेच समाजाच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी तसेच सार्वजनिक, आर्थिक सुरक्षा, पर्यावरणाचे रक्षण या सेवेच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. याशिवाय पृथ्वीवरील विविध समस्येकडे लक्ष केंद्रित करत, मानवाचा शाश्वत विकासासाठी प्रयत्न करते. हवामान किंवा वातावरण बदल कुठल्याही राष्ट्राच्या, धार्मिक, राजकीय सीमा पाळत नाही. उलट हवामान अनुकूल राहण्यासाठी हवामान बदलाची कारणे समजून घेऊन काय दक्षता घ्यावी, कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याकडे संस्था लक्ष वेधते. यासाठी ‘२३ मार्च १९६१ पासून सुरू झालेला जागतिक हवामान दिन’ खूप महत्त्वाचा दिवस आहे.
हवामान दिन २०२५ ची दोन घोषवाक्य माझ्या वाचनांत आली. १ “हवामान बदल नाही, हवामान कृती” : हवामान कृती ही आपली नैतिक जबादारी आहे. हवामान बदलावर उपाययोजना करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दैनंदिन जीवनांत सामान्यांच्या लहान-लहान कृती देखील मोठा महत्त्वपूर्ण बदल घडवितात. २. लवकर इशारा देण्यामधील अंतर (तफावत) कमी करणे. म्हणजेच सर्वांसाठी हवामान बदलाच्या विपरीत परिणामाचा लवकर इशारा दिला जावा. जितके अंतर कमी तेवढे सगळ्यांना लवकर सूचना गेल्यास कारवाई लगेच सुरू होईल. एखाद्या ठिकाणी, विशिष्ट वेळेला वातावरणाची स्थिती म्हणजे हवा! हवा हे वायूंचे मिश्रण असून वातावरण हे वायूंचे बनलेले असते. यात नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑरगॉन या मुख्य घटकांबरोबर कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि ओझोन हे प्रारणशील घटक उष्णतेच्या प्रारणाचे शोषण किंवा उत्सर्जन करतात.
हवामान बदल – एखाद्या ठरावीक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातील बदल (किमान ३० वर्षांची सरासरी) म्हणजे हवामान बदल. हवामान शास्त्रांत वातावरण, जमीन आणि महासागर हे या प्रणालीचे भाग आहेत. हवामान शास्त्रांत वायुमंडळीय भौतिकशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास केला जातो. मेट्रोलॉजी म्हणजे मोजमापांचा अभ्यास. ‘ल्युक हावर्ड’ हे हवामानशास्त्राचे जनक आहेत. सतराव्या शतकांत थर्मामीटर आणि बॅरोमीटरचा शोध लागल्यानंतर वातावरणातील वायूच्या वर्तनासंबंधी माहिती समोर आली. उपनिषदात हवामानशास्त्र, सूर्य आणि पाऊस यांचा संबंध आहे. भारताच्या ‘पृथ्वी’ विज्ञान मंत्रालयाअंतर्गत हवामानाची माहिती पुरवली जाते. वेधशाळेत उपग्रह, रडारप्रणाली, सुपर कॉम्प्युटर ही आधुनिक उपकरणामुळे अचूकतेसाठी, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर नेटवर्कमुळे या अचूक माहिती मिळते. जेणेकरून शेती, विमान वाहतूक, सागरी उद्योग यांना मदत होते. बाहेर जाण्याआधी हवामान अपडेट पाहावे.
हवामान बदलाची कारणे – बऱ्याच वर्षांपूर्वी होणारी तापमान वाढ ही पूर्णतः नैसर्गिक होती. (भूकंप, वणवा) १९७० च्या दशकानंतर होणारी तापमान वाढ ही मानवनिर्मित आहे. औद्योगिक क्रांती, घरातील भौतिक साधने, वाढलेली वाहनांची संख्या म्हणजेच मानवाकडून घरी, बाहेर जीवाश्म इंधनाचा वापर वाढला. वाढती लोकसंख्या, जंगलतोड, हवेत पसरलेले धूलिकण, सर्व देशांकडून वाढलेला ऊर्जेचा अनिर्बंध वापर, वाढलेले सर्व प्रकारचे प्रदूषण, सूर्यकिरणांची दाहकता या साऱ्यांमुळे निर्माण होणारे हरितगृह वायू सूर्याच्या किरणांपासूनची उष्णता अडवितात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. परिणामी चक्रीवादळे, दुष्काळ होतात. वाढलेले तापमान मौसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन दुष्काळ पडतो. वेगवेगळ्या भूभागाचे हवामान वेगवेगळे असते. तिथे राहणाऱ्या लोकांना त्याची सवय होते. प्रदेशाचे हवामान त्याच्या भौगोलिक स्थानानुसार विशिष्ट असते.
हवामान बदलाचे परिणाम – वाढलेल्या तापमानाचा शेतीवर, पिकाच्या उत्पादनांवर परिणाम होतो. मातीची सुपीकता पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. नाहीतर ती जमीन रेताड बनते. हे बदल प्रादेशिक नसून जागतिक आहेत. वाढत्या तापमानामुळे फक्त पृथ्वीचं उष्ण होत नाही तर पावसाचे प्रमाणही बदलते. जलवायू परिवर्तनानुसार जून, जुलैचा पाऊस ऑक्टोबर, नोव्हेंबरला पडतो. हिमनद्या वितळतात. ध्रुवीय अस्वलासारख्या अनेक प्राण्याचे अधिवास, वनस्पतीच्या प्रजाती धोक्यात आहेत. समुद्राची पाण्याची पातळी वाढून किनाऱ्यालगत पूर येतो. जमिनीची धूप वाढल्याने किनारपट्टीचे नुकसान होते. अन्न, पाणीटंचाई निर्माण होते.समुद्र अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असल्यामुळे, समुद्र आम्लधर्मी होतो. त्यामुळे समुद्र अन्न साखळीतील प्रवाळ हा पहिला दुवा नष्ट होत आहे. जंगले कार्बन डायऑक्साइड वायू शोषून महत्त्वाची भूमिका बजावतात. मोठ्या प्रमाणांत जंगलतोड होत असल्याने जैवविविधता नष्ट होत आहे.
हवामान बदलावर उपाय – १. सध्याची जंगलाखालची भूमी तीन ते चार पट वाढवायला हवी. २. सागरात प्लवकांची वाढ व्हावी. ३. कोळसा ऐवजी सौर ऊर्जेचा वापर. ४. ज्वलन असे हवे ज्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडला जाणार नाही. मुख्यतः कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखले पाहिजे. ५. आपल्याला निसर्गाची गरज आहे. निसर्ग आणि पृथ्वी वाचवा. जे आपले एकमेव घर आहे. ६. प्लास्टिकचा वापर कमी करा. ७. सर्वांनी एकत्र येऊन समूहाने कार्य करावे. ८. सोशल मीडियातून चर्चा, परिसंवाद, पोस्टर प्रदर्शन यातून लोकांमध्ये जागरूकता वाढवा. जागतिक स्तरावर हवामान बदल रोखण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत. आपल्याकडे ८० टक्के शेतकरी पावसावर अवलंबून आहे. शेती आणि हवामान बदल यांचा संबंध या मुलाखतीत तज्ज्ञ आकाश बडवे सांगतात, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी साठवायला पाहिजे. तसेच देशी वाणातून (कडधान्य, बाजरी, गहू, भात, पालेभाज्या) मिळणारे उत्पादन कमी असलं तरी अशा वाणांमध्ये दुष्काळाशी सामना करण्याची क्षमता असते. बांगलादेशात खाऱ्या पाण्यात भाताचे पीक घेतले जाते. दक्षिण आफ्रिकेत कोरड्या जमिनीत मक्याचे पीक घेतले जाते, असे संशोधन भारतात व्हायला हवे. २३ मार्च जागतिक हवामान दिवस पृथ्वीचे महत्त्व, लोकांचे वर्तन, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध अधोरेखित करतात. पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग म्हणाल्या, ‘तुमच्या घराला आग लागल्यासारखे वागा. कारण आग लागल्यावरच त्वरित कारवाई होते. “पुढील पिढीला सुंदर जग द्यायचे असेल तर, वर्तन बदला नि निसर्ग वाचवा”. श्वास घ्यायला शुद्ध हवा हवी असेल तर त्यासाठी सवयी बदलणे गरजेचे आहे.
[email protected]