Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकाळधर्म निवारणारी भरणेची श्री काळकाई देवी

काळधर्म निवारणारी भरणेची श्री काळकाई देवी

काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून देवीचे नाव श्री काळकाई असल्याचे सांगतात. काळधर्म निवारणारी काळकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून, महामार्गावरून येणारे-जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करीत नाहीत. देवीच्या ठायी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊन मानसिक आधारही मिळतो.

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

खेड तालुक्यातील भरणेनाका येथे शेकडो वर्षांपूर्वी एक घनदाट जंगल होते. आजूबाजूच्या गावातील गुराखी आपली गुरे चरण्यासाठी या जंगलमय भागात घेऊन येत असत. या गुरांच्या कळपात एक गाय होती. ती गाय दर दिवशी या जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी एका दगडावर दुधाचा पान्हा सोडत असे व त्यानंतर आपल्या वासराला दूध देत असे. हा प्रकार होत असताना गुराखी जवळपास नसत. मात्र एक दिवस गुराख्याने हा प्रकार पाहिला. लागलीच घडला प्रकार त्या गुराख्याने गावातील सर्व ग्रामस्थांना सांगितला. गुराख्याच्या माहितीवरून ग्रामस्थांनी पाहणी केली असता या ठिकाणी दैवी वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला. या पाषाणाच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली. हा विचार सुरू असतानाच एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दिलेल्या दृष्टांतात एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे मंदिर उभारण्याची सूचना केली आणि त्या ग्रामस्थाने देवीचे मंदिर उभारले, अशी या भरणे येथील श्री काळकाई देवीची आख्यायिका आहे. काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून या देवीचे नाव श्री काळकाई असल्याचे जाणकार सांगतात.

पुराणातील कथांमध्ये खेडजाई, रेडजाई, पाथरजाई, वरदायिनी व काळकाई या पाच बहिणी होत्या, असा उल्लेख आहे. त्यानुसार खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये या चार देवींची मंदिरे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. दीडशे वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तांनी सुसज्ज बनवले.
१७ ऑक्टोबर २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. याचे प्रत्यंतर देणारे मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील श्री काळकाई देवीचे मंदिर. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या अर्थाने मनोकामना पूर्ण होऊन मानसिक आधारही मिळतो. काळधर्म निवारणारी काळकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून, महामार्गावरून येणारे-जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करीत नाहीत. महामार्गावरील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व काळकाई देवीचे मंदिर यामुळे भरणे प्रवाशांच्या चटकन नजरेस पडते. ही देवी नवसाला पावते, अशी भावाना जिल्ह्यातीलच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांची बनली आहे. नवरात्रोत्सवात मुंबई, पुणे, ठाणे तसेच घाटमाथ्यावरील अनेक भाविकांची पावले काळकाई मंदिराकडे वळतातच.

दूरवरच्या कोसावरूनही भाविक नवस करण्यासाठी येत असतात. यामुळे नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची झुंबड उडालेली असते. दीडशे वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तांनी सुसज्ज बनवले. या मंदिराच्या या जीर्णोद्धारासाठी मंदिर कार्यकारिणीदेखील स्थापन करण्यात आली आहे.

शेकडो वर्षांपूर्वीच्या या श्री काळकाई देवीच्या मंदिराने आता नवा साज घेतला असून, या मंदिराकडे जाण्यासाठी खासगी वाहने तसेच महामार्गावरून धावणाऱ्या एसटी बसने जाता येते. भरणेनाका येथे रिक्षाने उतरून देखील मंदिराकडे पायी चालत जाता येते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाक्याजवळच श्री काळकाईचे देखणे मंदिर आहे. खेडबाहेरून देवीच्या दर्शनाला एसटी बसने येणाऱ्यांना भाविकांना खेड स्थानकात जाण्याआधीच भरणेनाक्यावर उतरून चालत या मंदिरात जाता येते. रेल्वेने येणारे भाविक स्थानकावर उतरून रिक्षाने मंदिरापर्यंत जाऊ शकतात.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -