Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदोन सुंगधी फुले

दोन सुंगधी फुले

इतक्या ममतेने त्याच्याशी कधी कोणी बोलले नसावे. तो आनंदला. तिने हात बधिर केला. थोडा वेळ जाऊ दिला. त्यात चांगले वागणे ही कशी जीवनाश्यक गोष्ट आहे याचे ‘मऊ शब्दांत’ धडे दिले. तोही ऐकत होता. सावधचित्त. नंतर शिवणकाम देखणे झाले. “डॉक्टर मॅडम, तुम्ही तर जादूगारच आहात.”

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

माझ्या दोघी मुली हा माझा गर्व आहे, अभिमान आहे. माणूस म्हणून वाढवताना मी कोणतीही कसर सोडली नाही. मोठी प्राजक्ता आणि दुसरी निशिगंधा.

मोठी डॉक्टर झाली. धाकली अभिनेत्री, लेखिका झाली. ‘अनुष्का’, ‘गोडम गाणी’ ही धाकलीची पुस्तके लोकप्रिय झाली.
मोठ्या मुलीने बारावी विज्ञान शाखेत तोडफोड गुण मिळविले. पीसीबी ९९%. पीसीएम ९९%, गणितात १००% घ्या! नंतर तिला डॉक्टर व्हायचे होते म्हणून तिला मेडिकलकडे प्रवेश घेतला. उत्कृष्ट सर्जन झाली. एकदाही नापास न होता. डॉ. रुबेरो हे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरकडे काही कारणाने तिला नेण्याची वेळ आली. “कोणते कॉलेज?” त्यांनी विचारले.“जी एस मेडिकल.” ती उत्तरली.
“ओह.” ते खूश झाले. कारण ते जीएसचेच विद्यार्थी! म्हणजे ९० पार! ते उत्तरले.
९९.३% तिने उत्तर दिले.
“इतके?”
“हो इतके!”
“तरीही मी तिसरी आले. मेरिट ऑर्डरमध्ये दोघांना १००% गुण मिळाले.”
“ती तर केईएमची खासियत आहे.” डॉ. रुबेरो उत्तरले. यथावकाश ती प्रेमात पडली. डॉ. अभिजीत देशपांडे याच्याशी विवाहबद्ध झाली नि अमेरिकेस निघून गेली. त्याला जायचे होते; केवळ म्हणून.

अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये काम करू लागली. डॉ. रसेल मायर ही त्यांना फार फार आवडे. कुशल डॉक्टर म्हणून.
एकदा एक पेशंट आला.
“प्राजक्ता याचा हात अपघातात कोपरापासून फाटला आहे बघ.”
“मारामारी केली का?” तिने न घाबरता पेशंटला विचारले.
“हो. चाकू-सुऱ्याने. पण घाबरू नका. आता मी नि:शस्त्र आहे.”
“हॉस्पिटल निरीक्षण परीक्षण करूनच पेशंटला ‘आत’ घेते.”
“हो ना!”
“आता आपण चाकू-सुरामुक्त आहात.”
“होय डॉक्टरसाहेब.” आता विशेषण जोडले गेले होते.
“मी हात बधिर करते. मग शिवते.”
“चालेल डॉक्टर मॅडम.” त्याने आनंदाने होकार भरला.
इतक्या ममतेने त्याच्याशी कधी कोणी बोलले नसावे. तो आनंदला. तिने हात बधिर केला. थोडा वेळ जाऊ दिला. त्यात चांगले वागणे ही कशी जीवनाश्यक गोष्ट आहे याचे ‘मऊ शब्दांत’ धडे दिले. तोही ऐकत होता. सावधचित्त.

नंतर शिवणकाम देखणे झाले.
“डॉक्टर मॅडम,
तुम्ही तर जादूगारच आहात.”
“होय रे. तुझ्यासाठी मी उत्कृष्ट टेलर आहे. शिंपी आहे.” डॉ. रसेल मायर ते शिलाईकाम बघून खूश झाले.
“डॉक्टर प्राजक्ता,
इट इज अ गुड सर्जन्स वर्क.”
“मी सर्जनच आहे. डॉ. मायर.”
“मी तुझी पाठ थोपटतो.” त्यांनी खरोखर तसे केले.
“या पूर्वी कधी बोलली नाहीस गं?”
“माझे काम ‘बोलावे’ अशी इच्छा होती माझी. अगदी मनापासून. आज ती काहीशी पूर्ण झाली.”
तिचे उत्तर तिच्या स्वभावास धरून होते.

दुसरी निशिगंधा. नावासारखीच सुगंधी.
११ व्या वर्षी तिने नाट्यशास्त्राची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविली आणि २० वर्षे वयाची होईपर्यंत, म्हणजे पूर्णकाळ, टिकविली. प्रतिवर्षी परीक्षा देत. दाजी भाटवडेकर यांना ती छोटुकली, धिटुकली फार फार आवडे.

तिने अनेक नाटकांत कामे केली. प्रेमाच्या गावा जावे, मदन बाधा ही त्यातली विशेष गाजली. सुलभा देशपांडे या तिच्या गुरू होत्या. मोहन वाघ यांनी तिला फार चांगली मुलीसारखी वागणूक दिली. तिचे ‘नाट्यशास्त्र’ या विषयावर पुण्यात एका प्रसिद्ध संस्थेत व्याख्यान होते. ‘बोलेस्लोव्हस्की आणि नाट्यशास्त्र’ असा काहीसा विषय होता. व्याख्यान इंग्रजीत होते. पोरगी उत्तम बोलत होती. विद्यार्थी कागद घेऊन पुढ्यात बसले होते. मला वाटले नोट्स घेत असतील. पण तिच्या लक्षात आले,
“हा कागद कशासाठी?”
विद्यार्थी एकमेकांकडे बघू लागले.
“सांगा! हा कागद कशासाठी?”
“वी आर गोईंग टु ग्रेड युवर लेक्चर!”
ती संतप्त झाली.

“मी ‘नाट्यशास्त्र’ या विषयाचा वर्षानुवर्षे अभ्यास केला आहे. तुम्ही कोण मला ग्रेड देणार? मी व्याख्यान संपवीत आहे. ही घ्या व्याख्यानाची फी परत.” तिने आयोजकांना पैसे परत केले. त्यांची ‘ततपप’ झाली.
मी शपथ सांगते, मला असा धीर कधीही झाला नसता.

‘उलट मी असे व्याख्यान देईन की, श्रोते मंत्रमुग्ध व्हावे.’ असेच मनाशी म्हटले असते नि व्याख्यान सुंदर दिले असते, तर अशा ‘दोघी’ तेजस्विनी, तपस्विनी! माझं सोनं…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -