Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजवाचनाची गोडी...

वाचनाची गोडी…

प्रासंगिक – रेश्मा मिरकुटे

पुस्तके ही माणसाची मित्रच नाहीत, तर गुरूही आहेत. कारण पुस्तकांतून मिळालेले ज्ञान भविष्यातील वाट दाखवते. याची सुरुवात लहानपणापासूनच होते; परंतु आजच्या काळात बालसाहित्य आणि साहित्य यांच्यातील अंतर वाढत आहे. लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी म्हणून २ एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन साजरा केला जातो. काही दशकांपूर्वीपर्यंत मुलांच्या हातात पुस्तके असायची, आता ते मोबाइल, टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर रमताना दिसतात. सध्या परिस्थिती अशी आहे की, मुले अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय काहीच वाचत नाहीत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

मुलांच्या वाचनाच्या सवयीच्या दृष्टीने ८० आणि नव्वदचे दशक हा सुवर्णकाळ म्हणता येईल. त्यावेळी टीव्ही आणि कार्टून चॅनल्स कमी होते. तंत्रज्ञानामुळे मुलांच्या सर्जनशीलतेवर परिणाम झाला आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं कॉमिक्स खरेदी करण्याचा हट्ट धरायची. कालांतराने मोबाइल फोन्सकडे कल वाढला आणि आताची मुले पुस्तकांपासून दूर जाऊ लागली.

खरं तर ही ८०-९० च्या दशकातील मुले म्हणजेच आताचे पालक. पण आता तेही सतत मोबाइलमध्ये गढलेले असतात. आजकालच्या आया मुलांना काही महिनाभराचेच असताना मोबाइल हातात देऊन गप्प करत असतात नि मग म्हणतात, ‘काय करणार मोबाइल दिल्याशिवाय काही खातच नाही हो!’ बाबा I mean पप्पाही त्रास नको म्हणून मुलांना मोबाइल हातात देतात. म्हणूनच जर मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावायची असेल, तर त्याआधी या पालकांना वाचनाची सवय लावावी लागेल. कारण, मुले घरात जे पाहतात तेच करतात, कुटुंबात पुस्तक वाचण्याचे वातावरण असेल, तर नक्कीच मुलेही तेच करतील. पालकच जर दिवसभर मोबाइल फोन किंवा गॅझेटमध्ये मग्न राहिले, तर मुलांनी पुस्तके वाचावीत अशी अपेक्षा तरी कशी करणार?

बालसाहित्याशिवाय सुदृढ बालक किंवा सुदृढ समाजाची कल्पनाच होऊ शकत नाही, म्हणूनच जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये बालसाहित्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बालसाहित्याची सर्वाधिक गरज आहे.

एकत्रित कुटुंबांत रामायण, महाभारत, पंचतंत्र, अकबर बिरबलाच्या कथा, मालगुडी डेजच्या कथा मोठ्यांकडून ऐकत मुले मोठी झाली. प्रत्येक कथा मुलांना भारतीय संस्कृतीच्या जवळ नेणारी, आदर्शांचा धडा शिकवणारी, मनावर कोणतेही दडपण न ठेवता योग्य-अयोग्य यातील फरक दाखवणारी होती, पण तंत्रज्ञानाने मुलांना अशा पुस्तकांपासून दूर नेले. बालसाहित्याचे उद्दिष्ट हे बालकांमध्ये काहीतरी प्रेरणादायक करण्याची भावना निर्माण करणे हा आहे. यासाठी प्रथम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.

चला तर मग या आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिनानिमित्त आपण शपथ घेऊया की, मोबाइल, गॅझेट्स किंवा महागडी भेटवस्तू याऐवजी आपण मुलांना पुस्तके भेट देऊ, जेणेकरून त्यांची सर्जनशीलता तर वाढेलच अन् त्यांना वाचनाची गोडीही लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -