Wednesday, June 26, 2024
Homeदेशएनडीए सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग

एनडीए सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग

केंद्रातील महत्वाची खाती भाजपाकडेच!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर यामध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. २०२४ च्या निकालात भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमतापासून भाजपाला ३२ जागांनी दूर आहे. मात्र भाजपा प्रणित एनडीएला बहुमत मिळाल्याने पुन्हा इकदा देशात एनडीए सरकार बनण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु मोदींच्या तिसऱ्या सरकारमध्ये भाजपाला मित्रपक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. प्रत्येकी ४ खासदारांमागे एक मंत्रिपद असे हे सूत्र ठरल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने व मोदी मंत्रिमंडळातील एका मातब्बर माजी मंत्र्यांनी दिली आहे.

नितीश कुमार यांच्या जेडीयूला ३ मंत्रिपदे, चिराग पासवान यांना १ कॅबिनेट मंत्रिपद, जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला १ मंत्रिपद, चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला ४ कॅबिनेट मंत्रिपदे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद मिळणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ कॅबिनेट मंत्रिपद, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलला १ मंत्रिपद तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला १ मंत्रिपद आणि पवन कल्याण यांच्या जनसेनेला १ मंत्रिपद देणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपा एनडीए सरकारमध्ये महत्त्वाची ४ खाती स्वत:कडे ठेवणार आहे.

भाजपा स्वत:कडे गृह, वित्त आणि संरक्षण मंत्रालयासह आणखी एक महत्त्वाचे खाते ठेवणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाची खाती या राज्यांना दिली जाणार आहेत. एनडीएच्या वाटाघाटीत लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, गृह आणि रेल्वे मंत्रालयात या खात्यावरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र गृह आणि अर्थ खाते भाजपा सोडणार नाही. रेल्वे खाते मित्रपक्षांना दिले जाऊ शकते. नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयासाठी आग्रह धरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला रेल्वे मंत्रालय जाते का हे पाहणे गरजेचे आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपाची पिछेहाट झाल्याचे पाहून एनडीएतील घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक पक्ष अधिकची मंत्रिपदे मागत आहे. एनडीएला २९३ जागांसह बहुमत मिळाले आहे. त्यात भाजपाला २४० जागा, तेलुगु देसम पार्टीला १६ आणि जनता दल यूनाइटेडला १२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे जेडीयू आणि टीडीपी हे किंगमेकर बनले आहेत.

२८० नवनिर्वाचित खासदार हे पहिल्यांदाच ठेवणार संसदेत पाऊल

अठराव्या लोकसभेत देशातील तब्बल २८० नवनिर्वाचित खासदार हे पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ३३ सदस्यांचा समावेश आहे. चित्रपट अभिनेता, अभिनेत्री, क्रिकेटपटू, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि माजी न्यायाधीश, अशा समाजातील सर्वच क्षेत्रातील मंडळींना जनतेने आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. ‘झांशी की राणी’ या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणारी प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणौत हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल मेरठमधून विजयी झाले आहेत. अभिनेता सुरेश गोपी केरळच्या त्रिशूर येथून निवडून आले आहेत. किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांना धूळ चारली आहे. पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदारसंघातून क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी कॉग्रेसचे अधीररंजन चौधरी यांना मात दिली आहे. तालमूक येथून कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय हे देखील संसदेत पोहोचले आहेत. उत्तरप्रदेशातून सर्वाधिक ४५ खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. महाराष्ट्रातून ३३ खासदार पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणार आहेत.

मोदींच्या शपथविधीसाठी शेजारील देशांना निमंत्रण पाठवणार

श्रीलंका-बांगलादेशसह ५ देशांचे नेते सहभागी होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदी ८ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शकता आहे. या सोहळ्यासाठी भारताच्या शेजारी देशांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे.

यामध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान प्रचंड आणि मॉरिशस आणि भूतानच्या नेत्यांचा समावेश असेल. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या मीडिया विभागानेही याला दुजोरा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला २४० जागा मिळाल्या. याआधी २०१४ मध्ये आपल्या पहिल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी सार्क देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. याअंतर्गत पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.

श्रीलंकेच अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. या कॉलदरम्यान मोदींनी त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले, जे विक्रमसिंघे यांनी स्वीकारले. बांगलादेशच्या पंतप्रधानांशी फोनवर झालेल्या संभाषणात मोदींनी त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.

सरकार स्थापनेपूर्वीच नितीशकुमार तीन मंत्रालयांसाठी आग्रही

रेल्वे, कृषी, अर्थ खात्यावर जनता दल युनायटेडचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मलाईदार खाते मिळवण्यासाठी दबावतंत्राचे राजकारण सुरू झाले आहे. एनडीएमधील सहकारी पक्ष आता केंद्रातील सरकारमध्ये मोठ्या मंत्रालयाची मागणी करत आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल युनायटेड यात आघाडीवर आहे. नितीश कुमार यांनी भाजपाकडे ३ मंत्रालयाची मागणी केली आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. मात्र त्यांना कोणते मंत्रालय मिळणार हे एनडीए ठरवणार आहे.

जनता दल युनायटेडमधील सूत्रांनुसार, नितीश कुमार यांना ३ मंत्रालय हवेत. ४ खासदारांमागे एक मंत्रालय या फॉर्म्युल्यानुसार जनता दल युनायटेड त्यांच्या वाट्याला ३ मंत्रालय मागत आहे. जेडीयूचे १२ खासदार आहेत. त्यासाठी ३ मंत्रालयाची मागणी करण्यात आली आहे. या ३ मंत्रालयामध्ये रेल्वे, कृषी आणि अर्थ खाते यांचा समावेश आहे. त्यातील रेल्वे मंत्रालयासाठी नितीश कुमार यांचे प्राधान्य आहे.

याआधी नितीश कुमारांकडे रेल्वे खाते होते, त्यामुळे त्यांना पुन्हा रेल्वे मंत्रालय हवे आहे. रेल्वे मंत्रालय असा विभाग आहे, जो सर्वाधिक जनतेशी निगडीत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट होता येईल यासाठी जेडीयूने रेल्वे मंत्रालयाला प्राधान्य दिले आहे. त्याशिवाय जेडीयूला अर्थ खाते हवे आहे. त्यातून आर्थिक कायद्यात बदल करून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देत विशेष पॅकेज मिळवून राज्याचा विकास वेगाने केला जाऊ शकतो.

राज्यात २०२५ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे जर हे खाते मिळाले तर त्यातून बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल आणि विकासकामे करता येतील. त्यातून लोकांमध्ये चांगला मेसेज जाईल असे जेडीयूला वाटते. नितीश कुमार यांना कृषी मंत्रालयही हवे आहे. कारण ते कृषी मंत्रीही राहिले आहेत. शेतकऱ्यांशी निगडीत हे खाते असल्याने त्यातून शेतकऱ्यांसाठी मोठे काम करता येईल. कृषी धोरणे अवलंबता येतील, असे जेडीयूला वाटते. त्यामुळे ही ३ महत्वाची खाती जेडीयूने नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वी मागितली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -