Friday, March 28, 2025
HomeमहामुंबईOpen Library : पालिकेच्या नानालाल मेहता उद्यानात ‘मुक्त ग्रंथालय’

Open Library : पालिकेच्या नानालाल मेहता उद्यानात ‘मुक्त ग्रंथालय’

नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी नि:शुल्क पुस्तके उपलब्ध

मुंबई : पालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने नानालाल डी. मेहता पुलाखालील मोकळ्या जागेत नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ सुरू करण्यात आले आहे. या सुविधे अंतर्गत नागरिक तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाचनासाठी नि:शुल्क पुस्तके उपलब्ध असतील.

सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी गबुला फाऊंडेशन, इनरव्हील संस्था यांचे प्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने २०१६ मध्ये नानालाल डी. मेहता उद्यान हे नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. एखाद्या पुलाखालील जागेवर तयार करण्यात आलेले हे मुंबईतील पहिले उद्यान आहे. सुमारे ६ हजार ३४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानामध्ये नागरिकांसाठी ९०० मीटर लांबीचा पदपथ, योगाभ्यास आणि बसण्यासाठी विशिष्ट आसनव्यवस्था तसेच आसपास शोभिवंत झाडे लावण्यात आलेली आहेत. यासोबतच आता या ठिकाणी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्ये विविध साहित्य विषयक पुस्तके, महापुरुषांची आत्मचरित्रे, सामान्य ज्ञान, खेळ आदी विषयांवर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

सद्यस्थितीत या ठिकाणी एकूण १३२ पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. नागरिक ही पुस्तके कपाटातून घेऊन तिथेच बसून वाचू शकतात. हे ग्रंथालय सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

विरंगुळा आणि करमणुकीसोबतच ज्ञानार्जन आणि वाचनाची सवय वृद्धींगत होण्याच्या अनुषंगाने नानालाल डी. मेहता उद्यानात हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -